कौषीतकि ब्राह्मणोपनिषद
हे उपनिषद ऋग्वेदाच्या कौषीतकी ब्राह्मणाचा एक भाग आहे. याच्यात एकूण चार अध्याय आहेत. पहिल्या अध्यायात गौतम (उद्दालक) आणि चित्र यांच्या संवादाद्वारे अग्निहोत्र आणि त्याच्या फलश्रुतीवर प्रकाश टाकून अग्निहोत्र साधकाच्या मरणानंतर “त्याचा जीवात्मा कोणकोणत्या लोकांमध्ये फिरून ब्रह्मलोकात पोहोचतो जिथे अप्सरा त्याचे स्वागत करतात, तिथे एका विचित्र पलंगावर ब्रह्माजी विराजमान असतात, ब्रह्माजी अग्निहोत्र साधकांशी बोलतात, शेवटी तो साधक ब्रह्माजींच्या विशेष विभूतीमुळे त्यांच्यासारखाच होतो” इत्यादी गोष्टींचे वर्णन केलेले आहे. यालाच पर्यंकविद्या असेही म्हणतात. दुसऱ्या अध्यायात प्राणोपासना, आध्यात्मिक-अग्निहोत्र, विविध उपासना, दैवपरिमरातील प्राणोपासना, मोक्षासाठी सर्वश्रेष्ठ प्राणोपासना आणि प्राणोपासनेच्या संप्रदान कर्माचे वर्णन आहे. तिसऱ्या अध्यायात इंद्र-प्रतर्दन संवादाद्वारे प्रज्ञास्वरूप प्राणाच्या श्रेष्ठत्वाचे वर्णन केलेले आहे. चौथ्या अध्यायात अजातशत्रू आणि गार्ग्य यांच्या संवादाद्वारे सर्वप्रथम सूर्य-चंद्र, विद्युत, मेघ, आकाश, वायू, अग्नी, जल, दर्पण, प्रतिध्वनी इत्यादींमध्ये विद्यमान असलेल्या चैतन्यतत्त्वाच्या उपासनेची गोष्ट सांगितलेली आहे आणि शेवटी आत्मतत्त्वाचे स्वरूप आणि त्याच्या उपासनेच्या फलश्रुतीचे प्रतिपादन केलेले आहे.