Jump to content

केनकाथा गाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केनकाथा गाय
केनकाथा बैल

केनकाथा/केनकथा किंवा केंकाथा हा शुद्ध भारतीय गोवंश असून उत्तरप्रदेश राज्यातील महत्त्वपुर्ण गोवंश आहे. उत्तर प्रदेश मधील बुंदेलखंड प्रांतातील केन नदीच्या काठावर उगमस्थानामुळेच या गोवंशास केनकाथा असे नाव पडले आहे.

या गोवंशास काही ठिकाणी केनवारीया असेही म्हणतात. हा गोवंश डोंगराळ भाग व उग्र वातावरणात टिकून राहणारा गोवंश म्हणून ओळखला जातो. हा गोवंश मध्यम दूधारू आहे. या गोवंशचे बैल लहान परंतु अत्यंत बळकट असतात, तसेच ते जडकामासाठी फार उपयुक्त असतात. या गोवंशाच्या गायीचे दुधाचे उत्पादन १ ते ३ लिटर प्रतिदिन पर्यंत असते.

हा गोवंश मध्य प्रदेशातील विंध्या पर्वताच्या परिसरात, पन्ना, छतरपूर आणि टीकमगड जिल्ह्यात हा गोवंश मोठ्या प्रमाणात आढळतो. तसेच उत्तर प्रदेशमधील ललितपूर, हमीरपूर आणि बांदा जिल्ह्यात केन नदीच्या काठावर देखील हा गोवंश मोठ्या प्रमाणावर आढळतो.

शारीरिक रचना-
हा गोवंश उंचीने लहान परंतु मजबूत व काम करण्यात पटाईत आहे. या गोवंशाचा रंग राखाडी आणि काळा असतो. कधीकधी हा पांढऱ्या रंगात पण आढळतो. डोके लहान आणि रुंद, कान तीक्ष्ण व लक्ष वेधक असतात. या गोवंशाची शिंगे ही बाह्य कोनातून पुढील दिशेने आणि एका टोकाला समाप्त होतात. या गोवंशाचे पाय लहान परंतु काटक असतात. गळ्याची पोळी ही काहीशी लोंबकळत असते आणि काळ्या छटेत/ठिपक्यांची असते. शेपटी मध्यम जाडीची व लांब झुपकेदार असते. बैलाचा खांदा उंच असतो.

या गोवंशाच्या बैलाची उंची १२७ सेमी आणि वजन ३५० किलो, तर गायीची उंची १२० सेमी आणि वजन २५० किलो आढळते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]