कुसुमाग्रज प्रतिष्ठान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुसुमाग्रजांना गरजू व गरीब लोकांबद्दल खूप कळवळा होता. आदिवासी लोकांबद्दल जी माया होती, ती त्यांच्या कार्यातून दिसून येते. यातूनच कुसुमाग्रज प्रतिष्ठानची योजना साकारली. ज्यासाठी त्यांनी १ लाख रुपये दिले. अनेक स्वंयसेवक उभे करून त्यांनी अनेक योजना उभ्या केल्या. त्यात प्रौढ शिक्षण, आरोग्यसुविधा, सांस्कृतिक व क्रीडा शिबिरे यांचा समावेश असे. प्रतिष्ठानचे नाशिकच्या आसपासची ७ खेडी घेऊन हे उपक्रम राबवले. या सर्व ठिकाणी कुसुमाग्रज वाचनालय उभे करण्यास साहाय्य दिले.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ह्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर कुसुमाग्रजांना अभिप्रेत असलेले सामाजिक सांस्कृतिक प्रकल्प उभे करणे व अशा प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, ह्या प्रेरणेांतून २६ मार्च १९९० रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना नाशिक येथे झाली. तेव्हापासून कुसुमाग्रजांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी प्रतिष्ठान कार्य करीत आहे.

प्रतिष्ठानची प्रमुख उद्दिष्टे[संपादन]

सामाजिक स्तरावरील सर्व भेद ओलांडून समाजजीवनाचा सांस्कृतिक स्तर उंचावण्यासाठी साहित्य, विज्ञान, शिक्षण, क्रीडा कला आदि क्षेत्रातील सामाजिक कार्यास प्रोत्साहन देणे.

कुसुमाग्रज यांनी वेळोवेळी आपल्या साहित्यातून आणि आचरणातून ध्येय धोरणंचा पुरस्कार आणि प्रचार, प्रसार करणे. त्यासाठी त्यांचे साहित्य जतन करणे आणि जीवन दर्शनाचे संस्कार करणे त्यांच्या साहित्याचा प्रसार सर्व माध्यमांतून करणे.

कुसुमाग्रज स्मारक[संपादन]

कुसुमाग्रजांचे स्मारक उभारले जाऊन त्याद्वारे प्रतिष्ठानची व्याप्ती वाढावी महाराष्ट्र शासन आणि नाशिक महानगरपालिका ह्यांनी ९००० चौ.मी. जागा उपलब्ध करून दिली असून, तेथे अंदाजे साडेतीन कोटी रुपयाचेचे भव्य स्मारक उभारले गेले आहे. त्यातील २५०० चौरस मीटरचे बांधकाम झाले असून ६००० चौरस मीटर जागेत उद्यान झाले आहे.

हिरव्यागार जमिनीने आच्छादित असलेली दालने आणि त्यांतून विविध वृक्षराजीसह डाक बंगल्याच्या कौलारू प्रवेशद्वारातून दिसणारे स्मारक रसिक वाचकांचा आणि पर्यटकांचा प्रशंसेचा विषय झाले आहे. दोन्ही बाजूस असलेली दालने आणि दोघांना जोडणाऱ्या कमानी लक्ष वेधून घेतात.

स्मारकाच्या वास्तूतील सुविधा व उपयोग[संपादन]

जीवन दर्शन दालन - या दालनात कुसुमाग्रजांची साहित्यसंपदा, त्यांचा जीवनपट, नामवंत कलाकार, साहित्यिक, समाजसेवक इत्यादींसह काढली गेलेली त्यांची छायाचित्रे यांचे मोठ्या पडद्यावर दर्शन घडत राहते. तसेच नामवंत कलाकारांच्या आवाजात कुसुमाग्रजांच्या कविता, नाट्यपदे, नाटकातील प्रवेश ऐकता येण्याची सोय केली गेली आहे. याखेरीज, कुसुमाग्रजांच्या हस्ताक्षरातील मूळ पत्रे, सूचना, साहित्य, त्यांना प्राप्त झालेले पुरस्कार, मानपत्रे इत्यादींचा जतन केलेला संग्रह आहे.

विशाखा दालन - व्याख्याने, काव्यवाचन, अभिवाचन, मुलाखत, संगीताच्या मैफिली इत्यादींसाठी प्रोजेक्टर, ध्वनि-चित्र मुद्रण यांसह ३०० प्रेक्षकांसाठी, बहूपयोगी वातानुकूलित असे हे सभागृह आहे.

जीवन लहरी दालन - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका आहे. हिच्यात एकाच वेळी ५० विद्यार्थी अभ्यास करू शकतात.

वरील दालने सुसज्ज, विकसित झाली असून अद्याप परिसंवाद, चर्चा-सत्रे, कला-कार्यशाळा, नाट्य व संगीतासाठी ३० ते १५० व्यक्ती मावतील अशी आणखी ४ दालने व कलादालन (आर्ट गॅलरी) उभारून तयार आहेत व त्यांचे सुसज्जीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. (१४ नोव्हेंबर २०१९ची स्थिती.) (तथापि, आजमितीस त्या दालनांमध्ये तुटपुंज्या साधनांसह संगीत, नृत्य या कलांचे वर्ग, कार्यशळा, परिसंवाद काव्यवाचन इत्यादींचे आयेजन होतच आहे. तसेच हिरवळीवर मुक्त सामाजिक बैठका आयेजिल्या जातात.) या खेरीज खुले नाट्यमंच व प्रेक्षागृह, अतिथी गृह व प्रतिष्ठानचे अद्यावत कार्यालय इत्यादी कामे सुरू करावयाची आहेत. (१४ नोव्हेंबर २०१९ची स्थिती.)

प्रेक्षकांच्या अपेक्षेनुसार ५० ते ३०० पर्यंत प्रेक्षक बघण्याची क्षमता असलेली विविध दालने, आज नाशिक महानगरीच्या मध्यवस्तीत सांस्कृतिक केंद्रे बनली आहे. ह्या दालनांमध्ये वर्षभर विविध विषयांमधील नामवंतांची व्याख्याने, मुलाखती, चर्चासत्रे, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

प्रतिष्ठानचे उद्दिष्टपूर्तीसाठीचे उपक्रम : जनस्थान पुरस्कार -

ज्ञानपीठाच्या धर्तीवर केवळ मराठीतील सृजनशील साहित्यिकांसाठी दर वर्षाआड 'जनस्थान' पुरस्कार सुप्रसिद्ध पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येतात. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारी. रोजी नाशिक येथे रुपये एक लाख व ब्रांझची सूर्यमूर्ती व सन्मानपत्र देऊन साहित्यिकांना सन्मानपूर्वक गौरविण्यात येते. आत्तापर्यंत पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या मान्यवरांपैकी काही नावे :

श्री. नारायण सुर्वे (२००५)

श्री. महेश एलकुंचवार (२०११).

श्री. विजय तेंडुलकर (१९९१)

श्री. विंदा करंदीकर (१९९३)

गोदावरी गौरव[संपादन]

साहित्येतर क्षेत्रांसाठी आपापल्या क्षेत्रात अखिल भारतीय पातळीवर संस्मरणीय कामगिरी करण-या आणि देशाची सांस्कृतिक उंची उंचावण्या-या ज्येष्ठांना केलेला "हा कृतज्ञतेचा नमस्कार आहे, पुरस्कार नाही' असे कुसुमाग्रजांनी जाणीवपूर्वक नोंदवून हा गौरव दरवर्षाआड देण्याचे निश्चित केले आहे. कुसुमाग्रजांच्या समृतिदिनी १० मार्च रोजी ज्ञान-विज्ञान, चित्रपट-नाट्य, क्रीडा-साहस, चित्र- शिल्प, संगीत-नृत्य व लोकसेवा ह्या क्षेत्रातील व्यक्तींना रुपये ११०००/- व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येते.

आजपर्यंत गोदावरी गौरव प्राप्त झालेल्या नामवंतांपैकी काही नावे :

लोकसेवा क्षेत्र -

अब्दुल जब्बार खान (२०१०)

डॉ. प्रकाश आमटे (१९९२)

बाबा आढाव (२००८)

डॉ. भिमराव गस्ती (२००६)

संगीत-नृत्य क्षेत्र -

श्रीमती गंगुबाई हनगल (१९९२),

सचिन शंकर (२००४),

आचार्य पार्वतीकुमार (२००८),

अब्दुल हलीम जाफर खान (२०१०), चित्रपट-नाट्य क्षेत्र -

अशोक कुमार (१९९२),

गुलझार (१९९४),

श्रीमती विजया मेहता (२००६),

शाहीर साबळे (२०१०)

ज्ञान-विज्ञान क्षेत्र -

अरविंद कुमार (२००६)

डॉ. जयंत नारळीकर (१९९४)

डॉ. रघुनाथ माशेलकर (२००४)

डॉ. वसंत गोवारीकर (१९९२)

क्रीडा-साहस क्षेत्र -

नंदू नाटेकर (२००२)

प्रवीण ठिपसे (२००८)

विजय हजारे (१९९२)

श्रीपती खंचनाळे (२००४)

चित्र-शिल्प क्षेत्र-

श्री. आर. के. लक्ष्मण (१९९८)

श्री. प्रभाकर कोलते (२०१०)

श्री. माधव सातवळेकर (१९९६)

श्री. रवी परांजपे (२००६),

आदिवासी विभाग[संपादन]

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागांसाठीत वैद्यकीय मदत देऊन आदिवासी पाड्यांवर रोगप्रतिबंध औषधे देणे. तेथील आदिवासींची नियमित आरोग्य तपासणी करून उपचार करणे. गंभीर आजारासाठी साहाय्य करणे. तेथील विकासात्मक कामांना चालना देणे. नैसर्गिक औषधांबाबत संशोधन संगोपन करणे. आदिवासी युवा-युवतींच्या क्रीडास्पर्धा व त्यांची क्रीडाशिबिरे घेणे.

नाशिकजवळच्या ४ गावांमध्ये असे काम चालू असते.

साहित्य विभाग[संपादन]

मराठी भाषा, साहित्य ह्यांबद्दल आस्था, आवड, निर्माण होण्यासाठी अभिरुपी संवर्धनासाठी “साहित्यभूषण' ह्या परीक्षेचे आणि "वि.वा. शिरवाडकर निबंध स्पर्धेचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते. साहित्यभूषण ही परीक्षा १९९६पासून सुरू असून महाराष्ट्रातली किंवा महाराष्ट्राबाहेरील कुठलीही व्यक्ती ह्या परीक्षेस बसू शकते. अभ्यासकाला पूर्व शिक्षणाची व वयाची अट नाही. मराठी व्यक्तीचे लक्ष वाचनाकडे केंद्रित व्हावे ह्यासाठी ही परीक्षा आहे. मराठी वाङ्मय प्रकारांतील विषयांवर अभ्यास पत्रिका, उत्तरपत्रिकांसह अभ्यासार्थींना घरीच सोडवून त्या प्रतिष्ठानकडे पाठवायच्या असतात. ह्या परीक्षेस पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्याला 'इंद्रायणी' पुरस्कार, दुसऱ्या क्रमांकासाठी गोदामाता व तिसऱ्या क्रमांकाला 'कृष्णमाई' पुरस्कार, असे तीन पुरस्कार दिले जातात. वि.वा. शिरवाडकर निबंध स्पर्धेत २९ वयावरील कोणतीही व कुठलीही व्यक्ती सहभागी होऊ शकते.

अ) के.ज. म्हात्रे संदर्भ ग्रंथालय व वाचनालय -

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या 'टिळकवाडी' येथील इमारतीत ग्रंथालय असून त्याला शासनाचा 'अ' दर्जा मिळाला अहे. तेथे २३००० च्या वर ग्रंथ तसेच संदर्भ ग्रंथालय असून ग्रंथालयाचे १५००हून अधिक वर्गणीदार आहेत. शासनाचा उत्कृष्ट वाचनालयाचा "डॉ. आंबेडकर पुरस्कार' या ग्रंथालयाला प्राप्त झाला आहे. आणखी एक वाचनालय कुसुमाग्रज स्मारक ह्या वास्तूत आहे. तेथेही १२००० पुस्तके आहेत.

ब) ग्रंथ तुमच्या दारी -

नाशिक महानगराचा विस्तार वाढल्याने वाचक दूर रहायला गेल्यावर वाचनालयात नियमित येणे शक्य होत नाही. अशावेळी ग्रंथच वाचकांच्या दारी विनामूल्य देण्याचा अभिनव उपक्रम प्रतिष्ठानने सुरू केला असून त्यात उदंड प्रतिसाद लाभला आहे. ग्रंथप्रेमींनी केलेल्या १०० पुस्तकांची पेटी शहरातील विविध ठिकाणच्या संकुलामध्ये/संस्थांमध्ये विनामूल्य उपलब्ध केली जाते. ही पुस्तके वाचून झाल्यावर नवीन ग्रंथपेटी उपलब्ध करून दिली जाते. नाशिकमध्ये अशा ३६ पेट्या वितरीत झाल्या असून, हजारो वाचक त्याचा लाभ घेत आहे. या योजनेद्वारे नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानसुद्धा वाचनसंस्कृतीशी जोडले गेले आहेत. नाशिक येथील औद्योगिक क्षेत्रात विविध कंपन्यांमध्ये ग्रंथ तुमच्या दारी ही योजना कार्यान्वित झाली आहे. ही योजना पुणे शहरातही यशस्वीरित्या सुरू आहे.

संगीत विभाग -

भारतीय संगीताचा प्रसार व अभिरुची वाढवण्यासाठी स्मारकातील दालनामध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन तसेच कला वादन, शिक्षणाचे वर्ग भरवले जातात. याशिवाय विख्यात व ज्ञानी संगीतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळाही भरवल्या जातात. (श्रीमती देवकी पंडित व कलापिनी कोमकली यांच्या मार्गदर्शनाखालच्या कार्यशाळा गेल्या दोन वर्षात (सन २०१८ व १९) आयोजित केल्या गेल्या व त्यांना संगीतार्थींकडून उदंड प्रतिसाद मिळाला.) दरवर्षी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांना संपूर्ण राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळतो.

नाट्य विभाग -

नाटक व अभिवाचन यांना चालना व प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम व कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच नाट्य शिक्षण व अभिनय शिक्षणाच्या कार्यशाळा घेतल्या जातात.