Jump to content

कुंतला कुमारी साबत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुंतला कुमारी साबत
जन्म छत्तीसगढ
पेशा वैद्य
ख्याती ओडिया लेखिका
धर्म ख्रिस्ती


कुंतला कुमारी साबत ही एक ओडिया लेखिका आहे.तिचा जन्म बस्तर (छत्तीसगढ) संस्थानात एका ख्रिस्ती कुटुंबात झाला.तिचे वडील ब्रह्मदेशात (सध्याचे म्यानमार) सरकारी सेवेत डॉक्टर होते. कुंतला कुमारीचे बालपण तेथेच गेले.

तिचे प्रारंभीचे शालेय शिक्षण घरीच झाले. तिच्या आईने तिला ओडिया, बंगाली, हिंदी या भाषा शिकविल्या. वयाच्या तेराव्या वर्षी ती ओदिशाला गेली व कटक येथील रॅव्हनशा कन्या विद्यालयातून १९१७ मध्ये प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यानंतर तिने वैद्यकाचा अभ्यास केला.ती १९२१ मध्ये एल्. एम्. पी. परीक्षा उत्तीर्ण झाली. पुढे सु. पाच वर्षे कटक येथील ‘रेडक्रॉस सोसायटी’ मध्ये तिने डॉक्टर म्हणून नोकरी केली. त्यानंतर ती दिल्ली येथे गेली व तिने स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय केला. डॉक्टर म्हणून नावारूपाला येत असतानाच तिने तत्कालीन धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक जीवनात रस घेऊन सामाजिक चळवळीत भागही घेतला.आर्य समाजाकडून दीक्षा घेऊन तिने हिंदू धर्म स्वीकारला व एका आर्य समाजी कार्यकर्त्याशी लग्नही केले. दिल्लीला येण्यापूर्वीच एक कवयित्री म्हणून तिचा नावलौकिक झाला होता. ओडिया नियतकालिकांतून तिचे साहित्य नियमितपणे व सातत्याने प्रकाशित होत होते. ओडिया भाषेतील तिच्या अनेक कविता व रघु-अरखिता ही कादंबरी दिल्ली येथे असतानाच प्रकाशित झाली. १९२०–३० या दशकात तिने विपुल लेखन केले. तिच्या कवितांचे चार खंड व काही कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. तिच्या ‘अंजली’, ‘उच्छ्‌वास’, ‘अर्चना’, ‘स्फुल्लिंग’, ‘प्रेम चिंतामणी’ इ. कविता आणि भ्रांती, पारसमणी, नअतुंडी, काली बोहू इ. कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय आहेत. दिल्लीच्या वास्तव्यात ती हिंदी भाषेतही कविता लिहू लागली.तसेच महाबीर, जीवन, नारी  आदी नियतकालिकांचे संपादनही तिने केले. अल्पावधीतच हिंदी लेखिका म्हणूनही तिला मान-मान्यता मिळाली. ओडिया कवयित्री व कादंबरीकर्त्री म्हणून तिला त्याआधीच प्रतिष्ठा लाभली होती. ओडिया वाङ्‌मयाला उत्तेजन देण्यासाठी व स्वतःचे वाङ्‌मय प्रकाशित करण्यासाठी तिने कटक येथे ‘भारती तपोबन संघ’ स्थापन केला. १९२९–३८ या कालावधीत दिल्ली येथील वास्तव्यात तेथील सांस्कृतिक जीवनात तिने सक्रिय सहभाग घेतला. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य आंदोलनाचा गाढा प्रभाव तिच्यावर पडला होता. त्यातून लिहिलेल्या ‘आव्हान’ या दीर्घकाव्यात तिच्या प्रखर राष्ट्रभक्तीचे दर्शन घडते. हे काव्य प्रकाशित होताच, ब्रिटिश सरकारने त्यावर बंदी आणली.

कुंतला कुमारीचा गीति-कवयित्री म्हणून विशेष लौकिक होता. भावकाव्यातील तिचे योगदान फार मोलाचे आहे. तिच्या कविता जे तीर्वोत्कट भाव व्यक्त करतात, त्यांत देशभक्तिपर व धार्मिक भावनांचे चित्रण जास्त प्रकर्षाने आढळते.संकुचित धर्मवादाच्या पलीकडे जाणाऱ्या उच्च आध्यात्मिक विचारसरणीचे दर्शन तिच्या काव्यातून घडते, कारण ती जन्माने ख्रिश्चन होती, तिने हिंदू धर्माचा स्वीकार केला होता व आर्य समाजी व्यक्तीशी तिने लग्न केले होते.निसर्गप्रेमही तिच्या कवितांतून व्यक्त झाले आहे. शोषित व पददलित जनांविषयी तिला वाटणारी आत्मीयता तिच्या काव्यातून प्रकट झाली आहे. उदा., ‘ओडियां का कंदना’ व ‘गदजात कृशका’ ह्या कविता. तिने ओडिया भाषेत काही उत्कृष्ट उद्देशिकाही रचल्या. कणखर आशावाद व मानवजातीच्या उन्नयनाची तीव्र तळमळ हे तिच्या काव्यातून व्यक्त होणारे गुणविशेष होत. तिच्या कादंबऱ्याही दर्जेदार असून त्यांतून मध्यमवर्गीयांचे वास्तववादी चित्रण व सुधारणावादी दृष्टिकोन यांची प्रचिती येते. तत्कालीन समाजजीवनावर वर्चस्व गाजविणाऱ्या अंधश्रद्घा व दडपशाही यांविरूद्घ बंड करणाऱ्या, प्रागतिक दृष्टिकोनाच्या समाजसुधारकांची व्यक्तिचित्रे तिने आपल्या कादंबऱ्यांतून रंगवली.