Jump to content

काष्ठशिल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काष्ठशिल्प : लाकडी कलाकृती. शिल्पकलेच्या दगड व धातू या दोन माध्यमांप्रमाणेच लाकूड किंवा काष्ठ हेही एक महत्त्वाचे माध्यमआहे. हस्तव्यवसाय व इतर उपयुक्त कला इत्यादींत जसा लाकूडकामाचा अंतर्भाव होतो, त्याचप्रमाणे उच्च प्रकारची शिल्पकला म्हणूनही काष्ठशिल्प गणले जाते.

काष्ठशिल्पे अनेक जातींच्या लाकडांमध्ये करतात. काष्ठशिल्पांसाठी भारतात मॅहॉगनी, साग, एबनी, पेरू, शिसवी वगैरे जातींचे लाकूड वापरात आहे. यूरोपमध्ये सीडार, ओक, बाल्सावुड, बॉक्सवुड इत्यादींचे लाकूड वापरले जाते. काष्ठशिल्पे सर्वसाधारणपणे दोन पद्धतींनी करतात. मातीचे किंवा प्लॅस्टरचे आकृतिनिर्देशक असे लहान नमुने तयार करणे आणि त्याप्रमाणे लाकडांमध्ये कोरणे, ही एक पद्धत. अशा शिल्पांत लाकडामधील अंगभूत तंतुरेषा कोठेही येऊ शकतात. कलावंताच्या पूर्वनियोजित कल्पनेनुसार आकृती कोरली जात असल्याने त्यांत मूळ लाकडाच्या पाेताचा वा गुणवत्तेचा विचार केलेला असतो. दुसऱ्या पद्धतीत लाकडाचा ओंडका बारकाईने निरखून त्यातील रेषा व गाठी यांचा अभ्यास करून शिल्पकार त्यात मानवाकृतींचे, प्राण्याचे किंवा अप्रतिरूप आकार उत्स्फूर्तपणे कोरतो. पुष्कळ वेळा लाकडाच्या सालीचाही उपयोग केला जातो. लाकूड जर मध्येच सडलेले किंवा खराब निघाले अथवा दुसरी एखादी अधिक मनोवेधक कल्पना त्या लाकडामध्ये दिसू लागली, तर कलाकार आपली मूळची कल्पना बदलून नवीन घनाकार शोधू लागतो. अशा पद्धतीत तंतुरेषा व गाठी यांच्या आकृतीशी एकजीव साधला जातो.