कन्टेन्शियस मॅरेज, इलोपिंग कपल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कन्टेन्शियस मॅरेजेस, इलोपिंग कपल्स : जेन्डर, कास्ट ॲन्ड पॅट्रिआर्की इन नॉर्दर्न इंडिया हे प्रेम चौधरी यांनी लिहिलेले पुस्तक आहे. प्रेम चौधरी या सामाजिक शास्त्रज्ञ, इतिहासकार आणि स्त्रीवादी अभ्यासक आहेत. हे पुस्तक भारतातील ऑक्सफर्ड पब्लिशिंग हाउसने २००७ मध्ये प्रकाशित केले आहे.[१]

प्रस्तावना[संपादन]

कन्टेन्शियस मॅरेजेस, इलोपिंग कपल्स या पुस्तकामध्ये प्रेम चौधरी उत्तर भारतातील उत्तर वसाहतिक काळापासून ते सद्यकाळातील विवाहातील बदलत्या व्यवहारांचे परीक्षण करतात. लेखिकेने ऐतिहासिक, मानववंशशास्त्रीय, समाजशास्त्रीय, लोकसंख्याशास्त्रीय व कायदाविषयक साहित्ये या गोष्ठी लोकप्रिय संस्कृती पासून ते सद्य काळातील नियम आणि रूढी-परंपरांमधील सत्ता संबंधातील स्थित्यंतरे यांच्याशी जोडल्या आहेत. कुटुंब, जात, समुदाय, परंपरागत सत्ता या गोष्टींमुळे तथाकथित नियमबाह्य विवाहांवर चालणारी हुकुमशाही व होणारा तीव्र विरोध यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

ठळक मुद्दे[संपादन]

उत्तर भारत कृषक समाजामध्ये होत असलेली स्थित्यंतरे समजून घेण्यासाठी लेखिका हरियाणाचा खूप वर्षांपासून अभ्यास करत आहेत. व्यापक अशा मुलाखती, संभाषणे, लोकगीते, लोककथा, पुराणकथा, म्हणी, विवाहाच्या भोवती होणारी हिंसा याविषयकचे व्यष्टी अध्ययन यातून लेखिका समाजातील परंपरागत बदल समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक प्रकरणामधून लेखिकेने वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपरा, नियम आणि विवाहाचे प्रकार हे उत्तर भारताचे खरे निर्विवाद असे क्षेत्र, व्यष्टी अध्ययनातून आणि कथांमधून उघडकीस आणले आहे.

विवाह ही संस्था नातेसंबंधामध्ये महत्त्वाची मानली जाते, जात व्यवस्थेला अधिमान्यता देते, समाजाची सामाजिक रचना जतन करून ठेवते. उत्पादन आणि पुनरुत्पादन हे विवाहाशी संबंधित आहेत; समुदायाच्या राजकीय अर्थकारणाशी संबंध जोडण्यासाठी विवाह ही वैयक्तिक कृती न राहता ती सामाजिक कृती बनवली जाते. विवाह या संस्थेपासून इच्छा, निवड आणि प्रेम वेगळ्या आहेत. ही उपयुक्ततावादी समज लक्षात ठेवून ग्रामीण आणि शहरी भारतामध्ये विवाह हा वरिष्ठ नातेवाईकांकडून ठरवला जातो आणि कुटुंबातील सदस्य हे पितृसत्ता, नातेसंबंध आणि जात यांच्या विचारसरणीतून व्यापले जातात.

पहिल्या दोन प्रकरणामध्ये लेखिकेने वसाहतिक आणि उत्तर वसाहतिक काळातील विवाह व्यवहारांची माहिती देऊन त्यांचा मुख्य मुद्दा मांडला आहे.

वासाहतिक पंजाबमध्ये कमी लोकसंख्या वाढ आणि पुरुषांचे वाढते स्थलांतर यामुळे इंग्रजांनी उत्पादन आणि पुनरुत्पादनासाठी विवाहाची गरज ओळखली होती. विवाह ही संस्था वारसा, दुरावलेपणा, जमिनीमधून मिळणारी मिळकत यांच्या केंद्रस्थानी आहे. पंजाब मधील हिंदू आणि मुस्लिम जातीतल्या जातीत विवाह करतात. एकाच गोत्रामध्ये विवाह करण्यास मनाई आहे. समुदायाचे नियम आणि कायदे हे पंचायतीने कायम ठेवले आहेत हे इंग्रजांनी ओळखले होते. इंग्रजांनी अंमलात आणलेले परंपरागत कायदे आणि सांस्कृतिक सर्वश्रेष्ठता यानुसार घरातील पुरुषाला स्त्रीचा विवाह ठरविण्याचा अधिकार हा जातिअंतर्गत विवाह आणि पितृसत्तेला बळकटी देण्यासाठी देण्यात आला. त्याचबरोबर परंपरागत कायद्यानुसार हरियाणामध्ये आंतरजातीय विवाहाला मान्यता देण्यात आली. जेथे उच्च जातीय पुरुष अनेक कनिष्ठ जातीय स्त्रियांशी विवाह करत, विधवांचे पुनर्विवाह करत, बहुपत्नीत्व, वधू मूल्य, स्त्रियांची विक्री, रखेल ठेवणे असे व्यवहार करत असत. वासाहतिक राज्याने केलेल्या या मध्यस्थीने आंतरजातीय विवाहांना आव्हान दिले. तेव्हा स्त्रियांनी त्यांच्या सामाजिक आणि कायदेशीर अधिकारांविषयक मागणी करण्यास सुरुवात केली. आंतरजातीय विवाहाविषयकच्या सामाजिक मान्यतेमुळे हक्कांवरचा दावा सांगणे शक्य झाले असते परंतु तसे न होता उच्च जातीय स्त्री पुरुष आणि कनिष्ठ जातीय स्त्री पुरुष यांच्यातील सामाजिक फरक आणि सामाजिक दर्जा अधिक घट्ट होत आहेत आणि त्यामुळे कनिष्ठ जातीय स्त्रियांचा दर्जा खालावत आहे त्याचबरोबर लिंगभाव आणि पितृसत्तेच्या उतरंडेची पुनर्घघडवणूक केली जात आहे. चौधरी उत्तर वासाहतिक हरियाणातील आंतरजातीय विवाहांना असलेल्या अमान्यतेमागची कारणे शोधतात आणि समजून घेतात. अनेक केसेसच्या माध्यमांतून कशा प्रकारे अनेक विवाह आणि त्यात ही ठरवून केलेले विवाह हेसुद्धा जात पंचायतीने वादग्रस्त ठरविले आहे याविषयी चर्चा करते. प्रकरणामध्ये जेव्हा स्त्रियांनी विवाह ठरविलेला असतो तेव्हा कशा प्रकारे या प्रकारचा विरोध सामाजिकरीत्या मान्य होतो यावर चर्चा केली आहे. विवाहाच्या संदर्भात राज्याने नियम केले असून देखील विवाह हा मूलतः राजकीय परिस्थिती आणि पितृसत्ताक प्रभुत्व याच्याशी जोडला गेला आहे; असे असले तरी पंचायतींकडून राज्याने केलेले नियम मोडले जातात.

कायद्यामध्ये बदल, शिक्षण, शहराकडे स्थलांतर व सामाजिक गतिशीलता यांमुळे व महत्त्वाकांक्षेमुळे अनेक कनिष्ठ जातीतील लोकांच्या सामाजिक स्थानामध्ये श्रेणीवृद्धी होते. त्यामुळे दलितांमधील ही सामाजिक गतिशीलता आणि महत्त्वाकांक्षा हरियाणातील जात व्यवस्थेसाठी मोठा धोका म्हणून बघितली जाते. चौधरी यांनी पळून जाऊन विवाह केलेल्या केसेसच्या न्यायिक संदर्भातील भूमिका दर्शविताना कशाप्रकारे पितृसत्ता, कौटुंबिक विचारसरणी आणि लिंगभावी कल यांचे पुन:साचीकरण केले जाते याचे विश्लेषण केले आहे.

विधवांचे पुनर्विवाहांकडेसुद्धा वादग्रस्त चष्म्यातून बघितले जाते. ग्रामीण हरियाणामध्ये विधवांचे पुनर्विवाह केला जातो तो त्यांचा स्वतःचा निर्णय नसतो. त्यांचा विवाह हा कनिष्ठ जातीमध्ये नाही तर जमीनधारक जातीमधील लोकांशी विवाह ठरवले जातात. उत्तर वासाहतिक काळामध्ये विधवा पुनर्विवाहाची परंपरा हिच्याकडे विधवा स्त्रियांवर नियंत्रण मिळवण्याचा एक मार्ग म्हणून बघितले जाते. हिंदू वारसा हक्कामुळे स्त्रियांना जमिनीवर अधिकार मिळाला, त्यामुळे विधवा स्त्रियांना नियंत्रित करण्याची गरज निर्माण झाली आणि करेवा सारख्या व्यवहारांना सामाजिक मान्यता मिळाली. अशा प्रक्रारे आंतरजातीय विवाहांनी सांस्कृतिक नियमांना आव्हान दिले. पितृसत्ताक नियंत्रणाला आव्हान दिल्यामुळे अनेक स्त्रियांनी आपल्या निवडीनुसार विवाह करण्यास पसंती दिली. तर दुसऱ्या बाजूला लेखिका अनेक करेवा संदर्भातील व्यष्टी अध्ययनामधून दाखवून देतात की, नवऱ्याच्या भावाशी विवाह केल्याने त्या स्त्रीला सामाजिक आणि सांस्कृतिक स्वीकृती मिळते आणि ज्या घरात ती विवाह करून आलेली होती त्याच घरात राहण्याची परवानगी देखील मिळते. जरी तिच्याकडे जमिनीची मालकी जरी नसली तरी त्यात ती भागीदार असते. ग्रामीण सामाजिक परिस्थितीमध्ये स्त्रिया करेवा सारख्या विवाहाकडे हिंसा आणि त्यांच्या नात्यातील पुरुषांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचार यांपासून वाचण्याकरिताचा तरणोपाय म्हणून बघतात. आणि तसेच तिला जर मुलगा नसेल तर वारसाहक्काने मिळणारी जमीन तिला मिळते. करेवा मधून स्त्रियांच्या प्रश्नांची काळजी घेतली जाते तसेच आधीच अस्तित्वात असलेल्या नातेसंबंधाना औपचारिकता मिळते. पुनर्विवाहावर पितृसत्ताक नियंत्रण असावे म्हणून करेवा सारखा विवाह प्रकार एक नियम म्हणून मानला जातो.

सहाव्या प्रकरणामध्ये जातिअंतर्गत विवाह हा आंतरजातीय विवाहाला असलेला विरोध कशा प्रकारे समजून घेतो याविषयक भाष्य केले आहे. या प्रकरणामध्ये विवाहाच्या संदर्भातील अनेक समजांवर प्रकाश टाकला आहे. आपल्या निवडीनुसार विवाह केल्याने जातींची विभागणी कमी होईल, लोक एकत्र येतील आणि सार्वजनिक ठिकाणी यापूर्वी भागांमध्ये न ऐकलेले स्त्रियांचे आवाज आणि त्यांची मते वगैरे स्थानांकित करता येतील हे लक्षात आल्याने तरुण पुरुष आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करत नाहीत.

त्यांचे हे न ऐकलेले आवाज वर्चस्ववादी सांस्कृतिक अपेक्षांच्या विरोधात विध्वंसक स्थान केंद्रस्थानी मिळवतात. बरेचसे हे न ऐकलेले आवाज त्यांच्या अवकाशात जी गाणी गायली जातात त्यातून पुढे येतात. कनिष्ठ जातीय पुरुषांबद्दलच्या स्त्रियांच्या इच्छा त्यातून पुढे येतात. कनिष्ठ जातीय पुरुषांचे पुरुषत्व उच्च जातीय पुरुषांकडून धिक्कारले जाते. लोकप्रिय लोकसाहित्यातून वर्ग, जात, लिंगभाव, पुरुषत्व, सत्तासंबंध याविषयकच्या वर्चस्ववादी विचारसरणीला आव्हान दिले जाते.

शेवटच्या प्रकरणामध्ये पुस्तकातील नंतरच्या भागात प्रस्तुत केलेल्या प्रश्नांचा संबंध दर्शविला आहे. जातिअंतर्गत किंवा आंतरजातीय वादग्रस्त विवाह हे पूर्वीच्या काळी अस्तित्वात होते आणि सद्यकाळामध्ये त्यात वाढ होत आहे; तरीसुद्धा सुशिक्षित शहरी भागांमध्ये बदल होत आहेत. उत्तर वासाहतिक काळामध्ये जातीबाहेर किंवा गावाबाहेर विवाह करण्याची प्रक्रिया कमी होती. त्यामुळे तीव्र घटते लिंग गुणोत्तर आणि उदारीकरण आणि बेरोजगारी यामुळे अविवाहित पुरुषांची संख्या वाढली. यामुळे पुरुषत्वाचे अरिष्ट तीव्र होत आहे ज्याला पारंपरिक पंचायत प्रमुखांकडून सवाल केले जात आहेत. आणि त्यांनी अशा तरुणांची 'आधुनिक-पाश्चात्त्य' गुन्हा करून मन दुखावणारे अशी परिभाषा केली आहे.

चौधरी त्यांच्या उपसंहारातून दावा करतात की, सध्याचे (existing) सामाजिक, कायदेशीर, राजकीय, सांस्कृतिक व्यवहार विवाहाच्या संदर्भातील नियमांच्या बदलामध्ये असलेल्या गुंतागुंतींचा प्रतिकार करत आहेत. त्यांच्या मते सांस्कृतिक आणि वैचारिक नियमांनी अाच्छादलेले विवाहाचे राजकीय अर्थकारण संशोधनासाठीचे नवे अवकाश खुले करण्यासाठी समजून घेणे गरजेचे आहे. [२][३]

प्रतिसाद किंवा योगदान[संपादन]

जे लोक समकालीन ग्रामीण उत्तर भारताशी आणि त्यातील शहरी समाजाशी असलेले गुंतागुंतीचे नाते याच्याशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी हे पुस्तक अमूल्य, अत्यंत स्पष्ट आणि उघडपणे मांडणी करणारे आहे, असे दिल्ली विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथील अनुजा अगरवाल यांचे मत आहे. हे पुस्तक ज्यांनी हिंदी चित्रपटामध्ये ग्रामीण भागाचे जसे चित्रीकरण केले जाते त्याच्या पलीकडे ग्रामीण भाग पाहिलेलाच नाही अशांसाठी डोळे उघडणी करणारे आहे. [४]

संदर्भ सूची[संपादन]