Jump to content

कटक मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कटक मंडळ हे सैनिकी वास्तव्य असलेल्या प्रदेशाचा स्थानिक कारभार पाहण्यासाठी असतात. कॅन्टॉन्मेंट म्हणजेच कटक याचा अर्थ सैनिक तुकड्यांचे तात्पुरते मुक्कामस्थान होय. सैनिकांना सोयीसुविधा पुरविणाऱ्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या इतर नागरी लोकांचा समावेशही यात केला जातो. भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशातही कटक मंडळ हा स्थानिक स्वशासनाचा एक भाग मानण्यात आलेला आहे. कटक मंडळाला छावणी मंडळ असेही म्हणले जाते.

ब्रिटिशांनी इ.स. १९२४ साली संमत केलेल्या कॅन्टॉन्मेंट अधिनियमानुसारच कटक मंडळांचा कारभार चालतो. ही मंडळे सैनिकी प्रशासनाचा भाग म्हणूनच कार्यरत असतात व ती स्वायत्त असतात. भारतातील कटक मंडळांचे नियमन भारत सरकारच्या संरक्षण खात्याकडून केले जाते. कटक मंडळांना स्वतःची मालमत्ता प्राप्त करता येते, सांभाळता येते व तिची विल्हेवाटही लावता येते.

स्वातंत्र्यपूर्व काळात या मंडळांमध्ये ब्रिटिश सदस्यांचेच पूर्ण वर्चस्व होते. स्वातंत्र्यानंतर या मंडळांचा आढावा घेण्यासाठी भारत सरकारने इ.स. १९५३ साली एस.के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीच्या शिफारशींवरून सध्या छावणी मंडळामध्ये सैनिकी व नागरी सदस्यांचे समसमान प्रमाण करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात देहू, खडकी, पुणे कॅम्प, भिंगार (अहमदनगर), देवळाली (नाशिक), छत्रपती संभाजीनगर आणि कामठी (नागपूर) अशा सात ठिकाणी व अठवे कटक मंडल हे सतारा येथे आहेत. लोकसंख्येच्या आधारे कटक मंडळाचे तीन प्रकार पाडले जातात. 50 हजार पेक्षा जास्त नागरी लोकसंख्या असणारी प्रथम श्रेणी कटक मंडळे (30 सदस्य), किमान 10,000 आणि कमाल 50,000 हजार नागरी लोकसंख्या असणारी द्वितिय श्रेणी कटक मंडळे (19 सदस्य), व २५०० ते 10,000पेक्षा कमी नागरी लोकसंख्या असणाऱ्या क्षेत्रासाठी तृतीय श्रेणी कटक मंडळे (13 सदस्य) असतात तर 2500 पेक्षा कमी चतुर्थ श्रेणी कटक मंडळे असतात

कटक मंडळांची रचना

[संपादन]

कटक मंडळांच्या रचनेत लष्करी व नागरी सदस्यांचे समसमान प्रमाण साधलेले असते तथापि कटक मंडळांच्या श्रेणीनुसार त्यातील सदस्यांची संख्या बदलते. साधारणपणे प्रथम श्रेणी कटक मंडळात १५ सदस्य असतात. त्यापैकी ८ सदस्य नामनिर्देशित तर ७ सदस्य निर्वाचित असतात.

नामनिर्देशित सदस्य

[संपादन]

छावणीचा मुख्य लष्करी अधिकारी, जिल्हाधिकाऱ्याकडून नामनिर्देशित प्रथम वर्ग दंडाधिकारी, छावणीचा आरोग्य अधिकारी, छावणीचा कार्यकारी अभियंता, याशिवाय मुख्य लष्करी अधिकाऱ्याकडून चार सैनिक अधिकारी नामनिर्देशित केले जातात.

निर्वाचित सदस्य

[संपादन]

प्रौढ व गुप्त मतदानाद्वारे मतदारांकडून सात सदस्य निवडले जातात.

नामनिर्देशित सदस्यांमधला लष्कराचा मुख्य अधिकारी हा मंडळाचा अध्यक्ष असतो तर निर्वाचित सदस्यातून एकाची उपाध्यक्षपदी निवड केली जाते. नामनिर्देशित सदस्य जोपर्यंत त्या क्षेत्रात पदावर कार्यरत असतात तोपर्यंत ते मंडळावर कार्यरत असतात. निर्वाचित सदस्यांचा कार्यकाळ मात्र तीन वर्षांचा असतो.