औषधसतर्कता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रतिकूल परिणामांचा, विशेषतः औषधांच्या दीर्घकालिक व अल्पकालिक अनुषंगिक परिणामांचा शोध, निर्धारण, आकलन आणि प्रतिबंधन यांच्याशी संबंधित औषधशास्त्राची शाखा म्हणजे औषधसतर्कता होय.[१] साधारणतः औषधे, जैविक साधने, वानस्पतिक उपचार व पारंपरिक उपचार यांच्या प्रतिकूल परिणामांबद्दल वैद्यकव्यवसायींकडून व रुग्णांकडून माहिती गोळा करण्याचे, देखरेखीचे, संशोधनाचे, निर्धारणाचे आणि मूल्यांकनाचे काम या शास्त्रात केले जाते. या कार्याचे दोन उद्देश असतात :

  • औषधांशी संबंधित धोक्यांबद्दल नवी माहिती मिळविणे
  • रुग्णांना होणारी इजा टाळणे.

औषधसतर्कता चिकित्साशास्त्रीय अवस्थेपासून सुरू होते आणि औषधाच्या उत्पादन आयुष्यचक्रात सुरूच राहते. पणनपूर्व औषधसतर्कता (चिकित्साशास्त्रीय अवस्थेतील) आणि पणनोत्तर औषधसतर्कता अशा दोन भागांमध्ये ही सतर्कता विभागली जाते. औषधाला मान्यता मिळण्यापूर्वी, चिकित्साशास्त्रीय संपरीक्षणाच्या पहिल्या टप्प्यातच सतर्कतेबद्दल माहिती गोळा करण्याचे काम सुरू होते आणि मान्यनेनंतरही ही प्रक्रिया सुरू राहिते. जगभरातील अनेक औषध नियंत्रण संस्थांनी अनेक पणनोत्तर सुरक्षितता अभ्यास अनिवार्य केलेले आहेत.

प्रतिकूल औषध प्रतिक्रियांवर सतर्कतेत विशेष लक्ष दिले जाते. प्रतिकूल औषध प्रतिक्रियेची अधिकृत व्याख्या "सामान्यतः प्रतिबंधासाठी, निदानासाठी, उपचारासाठी किंवा शरीरक्रियाशास्त्रीय सुधारणेसाठी वापरल्या जाणाऱ्या सामान्य मात्रेतच औषधाला मिळालेला अपायकारक व अवांछित प्रतिसाद, ज्यात गुणकारितेच्या अभावाचाही समावेश होतो. यात अतिमात्रेचा व गैरवापचाराही समावेश होतो." अशी आहे.

चिकित्साशास्त्रीय संपरीक्षणांमध्ये काही हजार रुग्णांचाच समावेश होत असल्याने औषधाचा जेव्हा बाजारात प्रवेश होतो तेव्हा त्याचे काही अनुषंगिक परिणाम आणि प्रतिकूल प्रतिक्रिया अज्ञात असतात. अभ्यासातील लोकसंख्या मर्यादित असल्याने यकृत इजेसारख्या गंभीर प्रतिक्रियाही लक्षात आलेल्या नसतात. पणनोत्तर संनिरीक्षण उत्स्फूर्त निवेदन पद्धतीतून आणि रुग्ण निबंधणीतून माहिती खोदून काढणे आणि औषधे व प्रतिकूल प्रतिक्रियांमधील संबंध ठरविण्यासाठी रुग्ण अहवालांची चौकशी करणे अशा साधनांचा वापर करते.

वैद्यकीय उपचारांमधील जोखिमा[संपादन]

  • व्याधींचे उपचार व नियंत्रण यामध्ये औषधांनी मोठी सुधारणा घडवून आणलेली असली तरी मानवी शरीरावर वेळोवेळी ती प्रतिकूल प्रभाव निर्माण करतात.
  • अनेक औषधे रोगाच्या कारणांना नेमकेपणाने लक्ष्य करीत असली तरी शरीराच्या इतर अवयवांवर त्यांचे गौण किंवा दबावात्मक प्रभाव पडतात, रुग्णाच्या शरीरब्व्यवस्थांशी किंवा रुग्ण घेत असलेल्या इतर पदार्थांशी किंवा औषधांशी ही औषधे नकारात्मक प्रभाव टाकू शकतात किंवा आजारी असणाऱ्या सर्वांमध्येच ती इच्छित परिणाम घडवून आणत नाहीत.
  • मानवी शरीरावर केलेल्या प्रत्येक रासायनिक वा शल्यचिकित्सीय हस्तक्षेपांमध्ये काही जोखिमा असतात. रसायने व मानवी शरीर यांच्यामधील आंतरक्रिया आश्चर्यजनक गोष्टी घडवून आणू शकत असल्यामुळे या क्षेत्रात संपूर्ण भाकित कधीही करता येत नाही.

औषध सुरक्षिततेत वापरल्या जाणाऱ्या संज्ञा[संपादन]

  • लाभ : लाभांमध्ये औषधाच्या सिद्ध झालेल्या उपचारात्मक फायद्यांचा समावेश होतो.
  • धोका : इजा होण्याची शक्यता. धोका बहुधा टक्केवारीच्या किंवा उपचारित लोकसंख्येशी गुणोत्तराच्या स्वरूपात व्यक्त केला जातो.
  • इजा : होऊ शकणाऱ्या अपायाचे स्वरूप व व्याप्ती. याची धोक्याशी गल्लत केली जाऊ नये.
  • प्रभावक्षमता : प्रत्यक्ष व्यवहारात (संपरीक्षणांमध्ये नव्हे) औषध कसे कार्य करते याचा निदेशक.
  • गुणकारिता : आदर्श स्थितीमध्ये औषध कसे कार्य करते याचा निदेशक.

औषधांचे धोके शोधणे[संपादन]

नवी औषधे सर्वत्र उपलब्ध करण्याआधी औषधनिर्माण कंपन्यांना कायद्याने चिकित्साशास्त्रीय चाचण्या (संपरीक्षणे) कराव्या लागतात. तुलनीय नियंत्रण गटासोबतच निर्माते किंवा त्यांचे हस्तक ज्यांच्यासाठी औषध बनविले जात आहे अशा रुग्णांचा प्रातिनिधिक गट - याच्यात जास्तीत जास्त काही हजार रुग्ण असू शकतात - निवडतात. नियंत्रक गटाला तोषक आणि/किंवा संबंधित रोगासाठी आधीच मान्य झालेले अन्य औषध दिले जाते.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ Source: The Importance of Pharmacovigilance, WHO 2002