चिकित्साशास्त्रीय संपरीक्षण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिकित्साशास्त्रीय संपरीक्षण (क्लिनिकल ट्रायल) हा वैद्यकीय संशोधनातील आणि औषधाच्या विकासातील चाचण्यांचा संच असतो. या चाचण्यांमधून आरोग्यशास्त्रीय हस्तक्षेपांच्या (उदा., औषधे, नैदानिके, उपकरणे, उपचार मसुदे) सुरक्षिततेची आणि गुणकारितेची (किंवा विशिष्टपणे, प्रतिकूल औषध प्रतिक्रियांबद्दलची व इतर उपचारांच्या प्रतिकूल परिणामांची) माहिती निर्माण होते. बिगरचिकित्साशास्त्रीय सुरक्षिततेच्या दर्जाबद्दल समाधानकारक माहिती गोळा झाल्यानंतर आणि ज्या देशात औषध किंवा उपकरणाला मान्यता मिळवावयाची आहे त्या देशातील आरोग्य प्राधिकारी/नीतिमत्ता समितीकडून यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतरच संपरीक्षणे पार पाडली जातात.

उत्पादिताचा प्रकार व विकासातील त्याची अवस्था ध्यानात घेऊन संशोधक आधी स्वयंसेवक आणि/किंवा रुग्णांच्या छोट्या गटांमध्ये मार्गदर्शी अभ्यास करतात आणि तद्नंतर विद्यमान मान्यताप्राप्त उत्पादितांशी तुलना करणारे मोठे अभ्यास जास्त रुग्णांमध्ये केले जातात. सुरक्षितता व गुणकारिता याबद्दल सकारात्मक माहिती मिळाल्यावर सामान्यतः रुग्णांची संख्या वाढते. चिकित्साशास्त्रीय संपरीक्षणांच्या आकारांमध्ये वैविध्य आढळते आणि त्यांमध्ये एकाच देशातील एकाच संशोधन घटकाचा किंवा अनेक देशांमधील बहुविध घटकांचा समावेश असू शकतो.

संपरीक्षणांच्या पूर्ण मालिकेला बराच खर्च येतो आणि सर्व आवश्यक मनुष्यांचा व सुविधांचा खर्च सामान्यतः पुरस्कर्ता करतो. पुरस्कर्ता एखादी शासकीय संस्था किंवा औषधनिर्माती वा जैवतंत्रज्ञानातील कंपनी असू शकते.