Jump to content

एल्विन सी. स्टॅकमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एल्व्हिन चार्ल्स स्टॅकमन हे अमेरिकन वनस्पतिरोगवैज्ञानिक व शिक्षणतज्ञ होते. त्यांचा जन्म १७ मे १८८५ रोजी झाला. गहू व इतर अन्नधान्य पिकांवरील तांबेरा रोग ओळखण्याच्या व त्यास प्रतिबंध करण्याच्या पद्धती यांवरील स्टॅकमन यांचे संशोधन विशेष महत्त्वाचे मानले जाते.

स्टॅकमन यांचा जन्म अमेरिकेतील अल्गोमा ( विस्कॉन्सिन ) येथेझाला. त्यांनी बी.ए. (१९०६), एम्.ए. (१९१०) व  पीएच्.डी. (१९१३) या पदव्या मिनेसोटा विद्यापीठातून प्राप्त केल्या. १९०९ मध्ये याचविद्यापीठात नवीनच स्थापन झालेल्या वनस्पतिरोगविज्ञान विभागात त्यांची निर्देशक म्हणून नेमणूक झाली. त्याच ठिकाणी ते विभाग प्रमुख होते (१९४० — ५३). सदर पदावर काम करीत असतानाच त्यांनी अमेरिकन सरकारच्या शेती विभागात सल्लागार म्हणून पद भूषविले. तेथे त्यांनीफेडरल सिरल रस्ट लॅबोरेटरीमध्ये संशोधन विषयक संघटन व संचलन केले. त्यावरून तृणधान्यांच्या पानांवरील तांबेरा रोगास कारणीभूत कवकाचे (  बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींचे ) वर्तन व  नियंत्रण यांविषयीची स्टॅकमन यांची अपार जिज्ञासा व विपुल संशोधन याचा प्रत्यय येतो.

अन्नधान्यांच्या, पिकांसंबंधीच्या स्टॅकमन यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक कार्यक्रमांत सक्रिय भाग घेण्यासाठी बोलाविण्यात आले. अन्नधान्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी मेक्सिकन शासन व रॉकफेलर प्रतिष्ठान यांच्यातील परस्पर सहकार्याबद्दल सल्ला देणाऱ्या मंडळाचे १९४१ मध्ये स्टॅकमन हे एक सदस्य होते. या मंडळाच्या सूचनेनुसार १९४३ मध्ये मक्यामध्ये सुधारणा ( उत्पादनात वाढ ) करण्यासाठी ‘रिसर्च स्टेशन फॉर इम्प्रुव्हमेंट ऑफ कॉर्न’ या प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली. तिचेच पुढे ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कॉर्न अँड व्हिट इम्प्रुव्हमेंट’ या संशोधन केंद्रात रूपांतर झाले. याच्या विद्यमाने अशी संशोधन केंद्रे संपूर्ण जगामध्ये विविध भागांत स्थापन करण्यात आली. या केंद्रांनी विकसनशील देशांत अन्न-धान्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले आहे. स्टॅकमन यांनी रॉकफेलर प्रतिष्ठान संस्थेसोबत अनेक वर्षे काम केले.

स्टॅकमन यांनी बरेच संशोधनात्मक लेखन केले आहे. त्यांनी प्रिन्सिपल्स ऑफ प्लँट पॅथॉलॉजी हा ग्रंथ जे. जी. हारर यांच्या सहकार्याने १९५७ मध्ये लिहिला, तर १९६७ मध्ये कॅम्पेन अगेन्स्ट हंगर हा ग्रंथ आर्. ब्रॅडफिल्ड आणि पी. मंगेल्सडॉर्फ या रॉकफेलर प्रतिष्ठानमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने लिहिला.

स्टॅकमन यांचे सेंट पॉल ( मिनेसोटा ) येथे २२ जानेवारी १९७९ रोजी निधन झाले.