एडवर्ड दुसरा, इंग्लंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दुसरा एडवर्ड (२५ एप्रिल, १२८४ - २१ सप्टेंबर, १३२७) हा चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्लंडचा राजा होता. हा पहिल्या एडवर्डचा चौथा मुलगा होता व आपल्या मोठ्या भावांच्या मृत्युपश्चात तो युवराज झाला. १३०६ साली त्याला सरदारपद बहाल केले गेले. १३०७मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्युनंतर तो राजा झाला.

१३०८ साली त्याने फ्रांसचा राजा फिलिप चौथ्याची मुलगी इसाबेलाशी लग्न केले. या लग्नाद्वारे इंग्लंड आणि फ्रांसमधील वितुष्ट संपविण्याचा त्याचा हेतू होता. त्याच्या उत्तरकाली १३२५मध्ये एडवर्डने इसाबेलाला फ्रांसशी तहाची बोलणी करण्यासाठी पॅरिसला पाठविले. इसाबेलाने तेथे जाउन आपल्या प्रेमी रॉजर मॉर्टिमरशी संधान बांधले व सैन्यानिशी तिने १३२६ साली इंग्लंडवर चढाई केली. मोडकळीस आलेली एडवर्डची राज्यव्यवस्था कोलमडून पडली आणि इसाबेला आणि मॉर्टिमरने तिचा १४ वर्षांचा मुलगा एडवर्ड तिसऱ्याला राजा केले.

त्याच वर्षी एडवर्ड बर्कली महालात मृत्यू पावला. इसाबेला व मॉर्टिमरने त्याची हत्या घडवून आणल्याची शंका इतिहासकार व्यक्त करतात.