एकनाथ केशव ठाकूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एकनाथ केशव ठाकूर (जन्म : म्हापण-वेंगुर्ले तालुका, १५ फेब्रुवारी १९४१; मृत्यू : ७ ऑगस्ट २०१४) हे सारस्वत बँकेचे अध्यक्ष होते.

एकनाथ ठाकूर एक वर्षाचे असताना त्यांची आईचे तर दोन वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या भावंडांना जास्त शिक्षण घेता आले नाही. सर्व भावंडांत लहान असलेले एकनाथ जन्मत:च हुशार असल्याने त्यांनी पुढे शिकावे, अशी सर्व भावंडांची इच्छा होती. त्याप्रमाणे कुडाळ गावी राहणाऱ्या मोठया बहिणीच्या घरी शिक्षणासाठी येऊन, कुडाळ हायस्कूलमधून एकनाथ एसएससी परीक्षा उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले. पण बहिणीच्या घरची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने त्यांनी कुडाळमधील दुकानात ९ वर्षे काम केले. कुडाळ हायस्कूलमधील इंग्रजीचे अध्यापक अप्पा आंगचेकर यांच्यामुळे एकनाथ ठाकूर यांना इंग्रजी विषयाची गोडी निर्माण झाली व इंग्रजी विषयाचा सातवीपासूनच त्यांनी विशेष अभ्यास केला. पुढे पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून प्रामुख्याने इंग्रजी हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून बी. ए. पदवी प्राप्त केली. त्यांच्या शालेय शिक्षणासाठी समाजाच्या विद्यावृद्धी संस्थेतून त्यांना अकरावीपर्यंत शिष्यवृत्ती मिळत होती. पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पुणे शहरात शेतकी खात्यात नोकरी करून पूर्ण केले. त्यानंतर एम.ए. करीत असताना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अखिल भारतीय स्तरावरील प्रोबेशनरी ऑफिसर या पदाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवून बँकेत १९६६ साली थेट अधिकारी पदावर नियुक्त झाले.

पुढे ते स्टेट बँकेचे सचिव झाले; नंतर अध्यक्ष झाले. भारतीय बँकिंग क्षेत्रातही त्यांच्या नावाचा बोलबाला झाला. आणीबाणीच्या निषेधार्थ त्यांनी स्टेट बँकेचा राजीनामा दिला व मुंबईत दादरला `नॅशनल स्कूल ऑफ बँकिंग’ सुरू केले. या बँकिंग स्कूलच्या महाराष्ट्रात २० शाखा होत्या. त्यांच्या बँकिंग स्कूलमधून शिक्षण घेऊन अनेकजण विविध बँकांमध्ये मोठ्या हुद्यावर नोकरीला लागले. ठाकूर यांच्यातील नेतृत्वगुण आणि त्यांचे कर्तृत्व हेरून शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठविले. तेथे त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने संसद गाजवली. विविध संसदीय समित्यांच्या माध्यमातून अनेक देशांचे दौरे केले. विदेशातील आधुनिक ज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा उपयोग त्यांनी देशातील बँकांमध्ये सुरू केला. २००१मध्ये एकनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सारस्वत बँकेचे नवे पॅनेल निवडून आले.(अपूर्ण)