उत्क्रांती एक महानाट्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उत्क्रांती: एक महानाट्य हे वैज्ञानिक विषयाचा उहापोह करणारे माधव गाडगीळ लिखित पुस्तक आहे विश्वाच्या रंगमंचावर गेली पावणे चार अब्ज वर्षे एक सृष्टीच्या लीलांचे जे महानाट्य रंगले आहे त्याचा हे पुस्तक परामर्श घेते. निसर्गात सातत्याने विस्कळीतपणा वाढत असतो.. परंतु ऊर्जा आणि पदार्थांच्या प्रवाहातून सुरचित रचनाही घडवली जाते. जीवसृष्टी ही अशीच सुरक्षितता रेणूंचा एक महासंघ आहे. जीवांचे परस्परांशी वेगवेगळ्या प्रकारे संबंध प्रस्थापित होतात व यातून एक जीवजाल विकसित होते. निसर्ग निवडीच्या प्रक्रियेतून हे जीव अचेतन तसेच सचेतन परिस्थितीला सतत मिळवून जुळवून घेतात.यातून जीवांच्या सर्वात व्यामिश्र जातींची व्यामिश्रता वाढत राहते व ते नवनव्या परिसरांच्या प्रविष्ट होतात. या प्रक्रियेतून अखेरीस भाषा संपन्न आणि त्यातून सतत ज्ञानवृद्धी करणारी मानवजात निर्माण झालेली आहे.

पार्श्वभूमी[संपादन]

माधव गाडगीळ ने जीवशास्त्रात पदवी घेतली. नंतर १९६३ सालापासूनच्या पदव्युत्तर शिक्षणात  त्याने जीवशास्त्राच्या परिसरशास्त्र आणि उत्क्रांती या दोन शाखांवर संशोधन केले. १९५७ सालच्या शालेय जीवनापासून त्याने मराठी भाषेत वैज्ञानिक विषयांवर लेखन केलेले आहे. २०१६ साली त्याच्या विश्वविद्यालयीन शिक्षणानंतर उत्क्रांती या विषयाबद्दल झालेल्या प्रचंड प्रगतीला समजावून घेऊन लिहिण्याचा प्रयत्न करण्याचे त्याने ठरविले व त्यानुसार उत्क्रांती एक महानाट्य हे पुस्तक पुरे केले आणि राजहंस प्रकाशनाने २०२० साली प्रकाशित केले.उत्क्रांती: एक महानाट्य हे माधव गाडगीळ लिखित पुस्तक राजहंस प्रकाशनाने २०२० साली प्रकाशित केले.

प्रतिपादन[संपादन]

विश्वाच्या रंगमंचावर एक सृष्टीच्या लीलांचे जे महानाट्य रंगले आहे त्याचा हे पुस्तक परामर्श घेते. समुद्राच्या तळावर पृथ्वीवरचेआदिजीव पावणे चार अब्ज वर्षांपूर्वी अवतरले. आज आपण मानतो की सारे जीव अखेर एकाच आदिमायेची लेकरे आहेत.[./Https://en.wikipedia.org/wiki/Last%20universal%20common%20ancestor ह्याचा मुख्य पुरावा म्हणजे रसायनांच्या पातळीवर जीवसृष्टी एकसंध आहे. हे सर्व जीव आपापल्या शरीरांतून सतत ऊर्जेचा, पदार्थांचा प्रवाह चालू ठेवूनच आपली बांधणी टिकवत होते, स्वतः वाढत होते, नवी संतती निर्माण करत होते. जसजशी जीवसृष्टी विस्तारत होती, तसतशी ऊर्जा- पदार्थांची मागणी वाढत होती, त्यासाठी संघर्ष पेटत होता. संघर्षापोटी सतत स्पर्धा, हिंसा उफाळत होती. ही स्पर्धा वेगवेगळ्या पातळ्यांवर निरनिराळ्या रूपांत प्रगट होते.

सर्वच प्राणी परपुष्ट असतात, त्यांतले अनेक पोटपुजेसाठी तऱ्हतऱ्हेची हिंसा करतात. निसर्ग निवड म्हणजे काय? डार्विनने विशद केले की सजीवांच्या सर्व व्यापारांमागे दोन मुख्य प्रेरणा आहेत - आत्मसंरक्षण आणि प्रजो‍त्पादन. सगळे जीव आपला देह जपत, आपली संतती जगात यशस्वी करण्याच्या प्रयत्नांत गढलेले भासतात. जीवांच्या आनुवंशिकतेचा मूलाधार असलेल्या डीएनए स्थित जनुकांच्या प्रती बनतानाही अधूनमधून लाखात - दहा लाखात एखादी अशा चुका होतातच.https://en.wikipedia.org/wiki/Mutation अशा पूर्णपणे अपघातकी चुकांतून – म्यूटेशन्समधून - काही वेगळे गुणधर्म उपजू शकतात. अनेकदा ही वैगुण्ये ठरतात, पण मधूनच अधिक सरस, गुणवान अवस्थाही निर्माण होऊ शकतात. जर अशा वरचढ म्यूटेशन्समुळे तो जीव प्राप्त परिस्थितीत जास्त कार्यक्षम बनला, त्याची पैदास वाढली, तर अशी सरस म्यूटेशन्स असलेल्या जीवांचे एकूण समुच्चयातील प्रमाण वाढत जाते आणि हळूहळू, कदाचित शेकडो पिढ्यांनंतर सारा जीवसमुच्चय अशा गुणवान् परिवर्तित जनुकांनी संपन्न होतो. नव्याने पुढे आलेली आव्हाने हाताळायला अधिक सक्षम बनतो.

बॅक्टेरियांच्या जगात अ‍ॅन्टिबायॉटिकांना प्रतिरोध हे एक प्रगतिपर पाउल आहे. अशा प्रगत बॅक्टेरियांची जडण-घडण प्रतिरोध नसणाऱ्या पूर्वजांहून अधिक जटिल, अधिक गुंतागुंतीची आहे. अशी रचना साकारायला अधिक माहिती वापरणे आवश्यक आहे. तेव्हा हे प्रगतीचे पाऊल हे अधिकाधिक जटिलतेच्या, अधिकाधिक बोधसंपन्नतेच्या दिशेची वाटचाल आहे. निसर्ग निवडीच्या प्रक्रियेतून अशा रीतीने अधिकाधिक जटिल, अधिकाधिक बोधसंपन्न जीवांची निर्मिती साधते. अशा जटिलतेच्या, बोधसंपन्नतेच्या दिशेच्या प्रगतीला पुष्कळदा सहकाराचा आधार असतो. फुले आणि फुलपाखरे, रंगबिरंगी फुलांनी नटलेल्या वनस्पती व वैविध्य संपन्न कीटक हे सहकारातून जीवसृष्टी कशी अधिकाधिक व्यामिश्र, संपन्न होत गेली ह्याचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. परागीकरण हा ह्या सहकारी परस्पर-संबंधांचा मूलाधार आहे. मुंग्यांसारख्याच समाजप्रिय मधमाशा समग्र कीटकसृष्टीत परागीकरणात अग्रेसर आहेत. त्यांच्यातल्या महाकाय आग्या माशा मध, पराग गोळा करण्यासाठी लांब-लांब जायला तयार असतात; एखादे झाड कित्येक किलोमीटर दूर अंतरावरही फुलले तरी तिकडे धावतात. असे घबाड सापडल्यावर ते कुठे आहे हे व्यवस्थित सांगता आले तर चट्कन तिथे मोठ्या संख्येने पोचून मध-पराग गोळा करणे फारच लाभदायक ठरणार. अशी माहिती एकमेकींना पुरवण्यासाठी मधमाशांनी बसवला आहे एक बोलका, उत्क्रान्तीच्या ओघातला नेटकी माहिती पुरवणारा आदिम नाच. सामान्यतः प्राण्यांचे संदेश ‘इथे आणि आत्ता’ पुरते मर्यादित असतात, त्यांच्यात जास्त खोलवर अर्थ फार क्वचित दिसून येतो. पण मधमाशांच्या नाचबोलीतून त्या बऱ्याच वेळापूर्वी सापडलेल्या, दूरवरच्या मध-परागांच्या स्रोताची माहिती नेटकेपणे एकमेकींना पुरवतात. हे साधू शकते कारण मानवी भाषेप्रमाणेच मधमाशांची नाचबोली ही एक सांकेतिक भाषा आहे.[१]

मानवाच्या भाषांत वेगवेगळे आवाज आणि अर्थ यांचा असाच सांकेतिक संबंध जोडलेला असतो. कानडीत हागु म्हणजे ‘तसेच’, तर मराठीत ‘विष्ठा’. सगळे ध्वनी केवळ चिन्हे, खुणा, निशाण्या आहेत. रूढीने त्यांना वेगवेगळे अर्थ चिकटतात. मधमाशांचे नाचबोलीतील संवाद जरी अशा प्रकारे संकेताधिष्ठित असले, तरी हे सारे संकेत ठरीव आहेत, त्यांच्या मेंदूत उपजतच ठसलेले आहेत. बोधयात्रेतील ह्याचे पुढचे, अधिकच माहितीपूर्ण पाऊल आहे  अनुकरणातून, शिकून बदलत जाणारे आचरण, अथवा कल्पिते. मानवाने प्राणिजगतातील मर्यादित कल्पितांना एका नव्याच पातळीवर पोचवले आहे. जीवसृष्टीचे अचाट वैविध्य डीएनएच्या चार वेगवेगळ्या न्यूक्लिओटाइड्सना निरनिराळ्या क्रमांच्या जुळणीतून साधलेले आहे. मानवी भाषा पण दीड-एकशे वेगवेगळे ध्वनी विविध प्रकारे जुळवून अगणित संदेश घडवतात. ह्या संदेशांना निरनिराळे अर्थ जोडून एक आगळी ज्ञानसंपदा निर्माण करतात. मानवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे रक्ताच्या संबंधांवर अवलंबून नसलेले, एकमेकांना सहाय्य करत पोसलेले समूह. टोळधाडीत रक्ताचे संबंध नसलेले लक्षावधि टोळ असू शकतात, कावळ्यांच्या शाळांत असेच हजारो कावळे एकत्र येऊ शकतात. तरी त्यांचे एकमेकांशी काहीच खास देणे-घेणे नसते. पण मनुष्यप्राणी मोठ्या संख्येने, रक्ताच्या नव्हे तर सहकाराच्या नात्याने बांधलेले संघ घडवू शकतो.[२] आज लक्षावधि शास्त्रज्ञ एकमेकांपासून, आधीच्या पिढ्यांतल्या शास्त्रज्ञांकडून शिकत-शिकत, शिकवत-शिकवत विज्ञानसाधनेमध्ये मग्न आहेत. ह्या ज्ञानभांडाराच्या बळावर मानवजातीने सगळ्या जगावर बळकट पकड घेतली आहे. आज आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या सामर्थ्यातून हे प्रचंड ज्ञानभांडार सर्व मानवाना सहज, विनामूल्य उपलब्ध होणे शक्य झाले आहे. इंटरनेटसारख्या सर्वसमावेशक, सहकारी माध्यमातून आपण सर्व जण ह्या ज्ञान क्रांतीत सहभागी होऊ शकतो. हे आहे आपल्या प्रत्यक्ष अनुभवातले उत्क्रांतीतील दहावे स्थित्यंतर.[३]

जीवसृष्टीच्या उत्क्रान्तीतील आतापावेतोची नऊ व सध्या घडत असलेले दहावे अशी लक्षणीय संक्रमणे
अनुक्रम पूर्वस्थिति उत्तर स्थिति किती वर्षांपूर्वी
पुनरुत्पत्तीक्षम रेणू आदिम पेशीतले  रेणुगण ~ चार ते पावणे चार अब्ज
जनुक व विकर अशा दोनही भूमिकांत आरएनए  डीएनए जनुक ते प्रथिन विकर ~ चार ते पावणे चार अब्ज
स्वतंत्र, सुटे सुटे पुनरुत्पादक रंगसूत्रे ~ पावणे चार अब्ज
अलैंगिक पुनरुत्पादन लैंगिक पुनरुत्पादन अडीच अब्ज
आदिपेशी प्रपेशी १.६ अब्ज
एकपेशी बहुपेशी ८० कोटी
मज्जासंस्थारहित प्राणी मज्जासंस्थायुक्त प्राणी ६० कोटी
एकांडे प्राणी श्रमविभागणी असलेले समाजप्रिय प्राणी १५ कोटी
समाजप्रिय प्राणी अमर्याद विकास होऊ शकणारी भाषा वापरणारे मानव ५० हजार
१० सांकेतिक भाषा वापरणारे मानव सर्व मानवी ज्ञानाची सर्वांना उपलब्धी सध्या

प्रतिसाद[संपादन]

या पुस्तकास अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२० आणि मराठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान पुस्तक पुरस्कार २०२१ असे दोन पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या ग्रंथाचा हिंदी अनुवाद “जीवन की बहार” या नावाखाली एकलव्य प्रतिष्ठानने २०२० साली प्रकाशित केला आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Frisch, Karl von (1993). The Dance Language and Orientation of Bees (इंग्रजी भाषेत). Harvard University Press. ISBN 978-0-674-19050-4.
  2. ^ Trivers, R.L. (1971). "Evolution of reciprocal altruism". Quarterly Review of Biology. 46(1) – https://doi.org/10.1086/406755 द्वारे.
  3. ^ Okasha, Samir (2022). "The Major Transitions in Evolution—A Philosophy-of-Science Perspective". Frontiers in Ecology and Evolution. 10. doi:10.3389/fevo.2022.793824/full. ISSN 2296-701X.