इश्तार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इश्तार हे ॲसिरिया व बॅबिलोनिया येथील एक प्राचीन प्रमुख देवता आहे. तेथे तिचे स्वरूप सिंहारूढ व शस्त्रधारी होते. सुमेरियन काळापासून ख्रिस्ती धर्माच्या उदयापर्यंत, या देवतेचे नाव व स्वरूप यांत बदल होत गेल्याचे दिसून येते. पश्चिम आशियातील विविध प्रदेशांत या देवतेची अत्तार, अश्तार, अश्तार्त, इनान्ना, निना अशी विविध नावे रूढ होती.


इश्तारचे नाव तसेच तिच्याविषयीच्या मिथ्यकथा व विधी यांचे मूळ ‘निन्नी ’ या प्राचीन सुमेरियन देवतेत असावे. आदिमाता अथवा मातृदेवता, धरतीमाता, प्रेमदेवता, निसर्गातील सर्जनशक्ती इ. रूपांतही तिची उपासना होत असे. ॲसिरियनांनी मात्र तिला युद्धदेवता मानले. शुक्रतारा आणि इश्तार एकरूप मानली जात. सुफलतेची देवता म्हणून तिच्या मंदिरात धार्मिक वेश्याव्यवसायही चाले. इश्तार, सिन आणि शमश अशी त्रिमूर्तीही उपासनेत होती. इश्तारची प्रमुख देवालये ऊरूक, अक्कड, निनेव्ह आणि आरबिला या ठिकाणी होती. आपला प्रियकर ताम्मुझ यास तिने ठार केले, अशी एक मिथ्यकथा फार प्रसिद्ध आहे. त्याच्या शोधार्थ पुढे तिने जे रूप घेतले, त्यास धरतीमाता म्हणून लोक देवता मानू लागले. तिची पश्चिम आशियात याच स्वरूपात उपासना होत होती. निनेव्ह येथून तिच्या उपासनेचा संप्रदाय हुरियन आणि हिटाइट लोकांनी ईजिप्तमध्ये नेला. आशिया मायनरच्या वायव्येसही तो पसरला. प्राचीन ग्रीक धर्मातही इश्तारचे आदिमातारूपच आढळते. प्राचीन रोमन साम्राज्यात एक प्रभावी देवता म्हणून तिचे महत्त्व ख्रिस्ती धर्माच्या उदयापर्यंत टिकून होते.

संदर्भ[संपादन]

  1. https://vishwakosh.marathi.gov.in/24593/