आवरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आवरण ही डॉ. एस एल भैरप्पा यांनी लिहिलेली कन्नड कादंबरी फेब्रुवारी २००७ मध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीची मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती, तामिळ, इंग्रजी, मल्याळी अशा विविध भाषेत भाषांतरे केली गेली. 'आवरण' च्या चार वर्षांत ३४ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या असून हा भारतीय कादंबरीविश्वातला विक्रम एक समजला जातो. या कादंबरीचा मराठी अनुवाद सौ उमा कुलकर्णी यांनी केला आहे.


विषय : या कादंबरीत हिंदू-मुसलमान संबंध, आंतरधर्मीय विवाह, डाव्या विचारसरणीच्या कमालीच्या पगड्याखाली असलेली भारतीय शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्र, मुगलकालीन इतिहास, धर्मांतरे, धार्मिक युद्धे अशा अनेक स्फोटक विषयांवर धीट भाष्य करण्यात आलेले आहे.  


प्रमुख पात्रे :

लक्ष्मी उपाख्य रझिया

आमीर (लक्ष्मीचा पती)

नाझीर (लक्ष्मीचा पुत्र)

नरसिंहशास्त्री (लक्ष्मीचे पिता)

प्राध्यापक शास्त्री


कथानक :

अतिशय कर्मठ घराण्यात जन्मलेली पण मुक्त विचारांची नरसिंहशास्त्रींची कन्या लक्ष्मी ही अमीर या कलाकाराच्या कलेवर भुलून त्याच्याशी विवाहबद्ध होते. सुरुवातीला मुक्त विचारांचा भासणारा अमीर लक्ष्मीवर हळूहळू इस्लामचे आचारविचार पाळण्याची सक्ती करायला लागतो. त्याला न जुमानता लक्ष्मी स्वतःच्या विचारांशी तडजोड करत नाही. हळूहळू त्यांच्या नात्यात कडवटपणा यायला लागतो. दरम्यान लक्ष्मीचे वडील नरसिंहशास्त्री यांचे वृद्धापकाळाने निधन होते. त्यावेळी ते एका महत्वपूर्ण ग्रंथावर काम करत असतात. लक्ष्मी गावाला येऊन त्या अर्धवट झालेल्या ग्रंथाचा आणि त्या ग्रंथासाठी तिच्या वडिलांनी काढलेल्या असंख्य टिपणांचा आणि संदर्भग्रंथांचा अभ्यास करायला घेते. आणि हा अभ्यास करता करता तिच्यासमोर औरंगजेबाच्या काळात हिंदू प्रजेवर झालेले नृशंस अत्याचार, धर्मांतरं, खुद्द काशीविश्वनाथ मंदिराचा विध्वंस इत्यादी सगळ्यांचे तपशील संदर्भासहित उभे राहतात. या साऱ्याची सांगड आजच्या काळातले हिंदू-मुस्लिम संबंध तसेच  तिचे व तिच्या पतीचे आणि मुलाचे संबंध या सगळ्याशी घातली जाते आणि तिला धक्के बसत जातात. समाजात आढळणाऱ्या डाव्या विचारांच्या दुतोंडी लोकांचे प्रतिनिधी म्हणून प्राध्यापक लक्ष्मीनारायण शास्त्री नावाच्या एका महत्वाच्या पात्राचीही ओळख आपल्याला करून दिली जाते. अखेरीस सर्व पुरावे आणि संदर्भ असूनही डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी विरोधामुळे लक्ष्मीने तिच्या वडिलांचा पूर्ण केलेला ग्रंथ प्रकाशित होऊ शकत नाही. याउलट तिच्यावर न्यायालयात खटला दाखल केला जातो. अंतिमतः पुरावे म्हणून वडिलांनी टिपण काढलेल्या समग्र संदर्भग्रंथांची सूची लक्ष्मी देते आणि पुस्तक संपते.


टीका :

कादंबरीत वर्णन केलेली पात्रे आणि प्रसंग यामुळे डॉ भैरप्पा यांच्यावर देशभरात आणि प्रामुख्याने कर्नाटकात प्रचंड टीका झाली. ते कट्टर हिंदुत्ववादी असून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न करत आहेत असे आरोप केले गेले. कन्नड साहित्यिक यु आर अनंतमूर्ती, गिरीश कर्नाड, चंद्रशेखर पाटील इत्यादी व्यक्ती डॉ भैरप्पांवर टीका करण्यात आघाडीवर होत्या.


डॉ भैरप्पा यांचे प्रत्युत्तर :

टीकेला उत्तर  देताना डॉ भैरप्पा यांनी आपल्या कादंबरीत मांडलेली मते पुनश्च उद्धृत केली. ते म्हणाले "मी शेकडो ऐतिहासिक पुस्तकांचा अभ्यास करून माझी निरीक्षणे कादंबरीत नोंदवली आहेत. टीकाकारांनी कादंबरीवर आक्षेप घेण्यापूर्वी मी दिलेल्या संदर्भग्रंथांच्या यादीतील पुस्तके नजरेखालून घालावीत. यापुढे या वादविवादात मला काहीएक स्वारस्य नाही."

टीप : ही माहिती ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी, डोंबिवली या संस्थेच्या ज्ञानबोली प्रकल्पांतर्गत हेरंब ओक यांनी प्रकाशित केली आहे.


संदर्भ : [१][२]

  1. ^ भैरप्पा, डॉ. एस एल (२००९). आवरण. मेहता प्रकाशन.
  2. ^ "Aavarana".