आपत्ती व्यवस्थापन चक्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


अनंत काळापासून पृथ्वीतलावर आपत्ती कोसळत आल्या आहेत. वारंवार येणाऱ्या आपत्तींपैकी काही नैसर्गिक असतात, तर काही मानवनिर्मित असतात. आपत्तींमुळे होणारी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी किंवा त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची प्रणाली अलीकडे सगळ्याच देशांनी कार्यरत केली आहे. आपत्ती व्यवस्थापन चक्र हे आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रणालीमधील एक महत्त्वाचे आणि मूलभूत तत्त्व आहे. आपत्तींमुळे होणारी हानी टाळायची असेल, तर आपत्ती उद्भवायच्या अगोदरपासूनच आपत्तींचा अंदाज घेणे, आपत्तींविरोधी प्रतिबंधात्मक उपाय योजणे, आपत्तींचे उपशमन आणि आपत्तिदरम्यान योग्य बचावासाठी कार्यवाही हाती घेणे इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. या सर्व कार्यवाहींची कल्पना खाली दर्शविलेल्या ‘आपत्ती व्यवस्थापन चक्रा’वरून (‘आपत्ती व्यवस्थापन मालिके’वरून) येईल.

सोबतच्या आकृतीवरून हे स्पष्ट दिसून येते की, आपत्ती व्यवस्थापन चक्रातील कार्यवाहीचे तीन प्रमुख भाग आहेत : १) आपत्तिपूर्व कार्यवाही, २) आपत्तिदरम्यानची कार्यवाही आणि ३) आपत्तीनंतरची कार्यवाही.

  • आपत्तिपूर्व कार्यवाही : या भागांत खालील कार्यवाही अपेक्षित आहे :

(अ) संभाव्य धोक्यांचा आढावा घेऊन त्या धोक्यांची हानिकारकता आणि स्वरूप यांचा आढावा घेणे.

(ब) धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे.

(क) जिथे प्रतिबंधात्मक कार्यवाही शक्य नसेल, तिथे हानीची प्रवणता कमी होईल असे उपाय योजून तिचे उपशमन करणे.

(ड) पूर्वतयारी करणे (सुसज्ज होणे) – यांत सरकारी यंत्रणा, धोक्याचे इशारे देणारी यंत्रणा, आपत्तिदरम्यान लागणारी सामग्री, बिगरसरकारी यंत्रणा आणि सामान्य नागरिक या सर्वांच्या सुसज्जतेचा अंतर्भाव होतो.

  • आपत्तिदरम्यानची कार्यवाही : यांत खालील गोष्टींचा समावेश होतो :

(अ) धोक्याचा इशारा देणे.

(ब) जीविताचे रक्षण आणि बचावकार्य करणे, लोकांना आणि जनावरांना सुरक्षित स्थानी पोहोचवणे.

(क) मालमत्तेची सुरक्षा आणि तात्काळ वैद्यकीय आणि इतर मदत पोहोचवणे.

  • आपत्तीनंतरची कार्यवाही : यांत खालील गोष्टी समाविष्ट आहेत :

(अ) विस्थापितांचे पुनर्वसन आणि त्यांचे जीवन पूर्ववत सुरळीत व्हावे म्हणून त्यांचे पुनरूत्थान करणे, नुकसानभरपाई देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात संलग्न करून घेणे आणि त्यांच्या निर्वाहाची सोय करून देणे.

(ब)  आपत्तींमुळे क्षती पोहोचलेल्या सर्व बांधकामांची/इमारतींची पुनर्बांधणी आणि विकास करणे.

(क)  विकासकामे करीत असताना भविष्यातील धोक्यांमुळे परत हानी होऊ नये, याची काळजी घेणे.

वरील आपत्ती व्यवस्थापन चक्र आणि त्यात अंतर्भाव केलेली कार्यप्रणाली ही सातत्याने अमलात आणणे अपेक्षित असते. सरकारी यंत्रणा ह्या आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाच्या वाटेकरी असतात; पण सामान्यजनांची जबाबदारी तेवढीच महत्त्वाची असते. थोडक्यात, आपत्ती व्यवस्थापन ही समाजाच्या सर्व घटकांचा समावेश असलेली सुनियोजित संघटनात्मक कृती आणि समन्वय साधून आपत्तींना समर्थपणे तोंड देण्यास कटिबद्ध असलेली प्रणाली आहे.