आणंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
येथील अमूल डेरी प्रकल्प

आणंद हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर व आणंद जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर मध्य गुजरातमध्ये मुंबईच्या उत्तरेस ४२७ किमी. व अहमदाबादच्या दक्षिणेस ६५ किमी. अंतरावर स्थित आहे. आणंद रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक असून अणंदहून खंबायत; गोध्रा व वडताळ-स्वामीनारायण इकडे रेल्वे-फाटे जातात. बाजरी, गहू, तांदूळ, कापूस, तंबाखू व इतर शेतमालाची ही बाजारपेठ असून येथे कापूस पिंजणे, हातमाग, आगपेट्या इ. उद्योग चालतात. तथापि दुग्धव्यवसायाकरिता याचा विशेष लैकिक आहे. सहकारी व सरकारी क्षेत्रांद्वारे दुधाची भुकटी व विविध पदार्थ बनविले जातात. या व्यवसायातील प्रशिक्षण देण्याची सोय येथील कृषिसंस्थेत करण्यात आलेली आहे. याशिवाय येथे तंबाखू संशोधनाचे कार्यही चालते. येथून सहा किमी. वर वल्लभ विद्यानगर असून तेथे सरदार वल्लभभाई विद्यापीठ आहे.

येथील अमूल डेरी ही जगातील सगळ्यात मोठी सहकारी दूध वितरण संस्था आहे.