Jump to content

आचार्य पार्वतीकुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आचार्य पार्वतीकुमार तथा गजानन महादेव कांबळी (जन्म : २७ फेब्रुवारी १९२१[]-मृत्यू : २९ नोव्हेंबर २०१२) हे नर्तक, नृत्यगुरू, नृत्यरचनाकार आणि संशोधक म्हणून प्रसिद्ध होते. भरतनाट्यम् ह्या नृत्यशैलीचे गुरू म्हणून ते प्रसिद्ध होते. तंजावूर येथील भोसले राजांनी भरतनाट्यम् शैलीत केलेल्या विविध रचनांविषयी त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे मानण्यात येते.

जीवनपट

[संपादन]

कोकणातील मालवणमधील कट्टा हे पार्वतीकुमार ह्यांचे मूळ गाव होय. त्यांचे वडील महादेव कांबळी हे मुंबईत गिरणीत कामाला होते[]. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते.

शिक्षण

[संपादन]

पार्वतीकुमार ह्यांचे औपचारिक शिक्षण इयत्ता चौथीपर्यंतच झाले[]. त्यांना नृत्याची स्वाभाविक आवड लहानपणापासून असली तरी शांताराम येरळकर ह्या त्यांच्या मित्रामुळे ते नृत्याकडे खऱ्या अर्थी वळले. येरळकरांनी त्यांना मुंबईतील परळ येथील संगीत नृत्य कलामंदिर येथे नेले आणि तेथे रतिकांत आर्य ह्यांच्याकडे त्यांनी कथक नृत्यशैलीचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला[]. कथक नृत्यशैली आत्मसात केल्यावर त्यासंदर्भातील शिकवण्या घेत असताना गिरगावातील देवधर संगीत-नृत्य-वर्गात कथकलीचे नृत्यगुरू कर्णाकर पण्णीकर ह्यांच्याशी त्यांचा परिचय झाला आणि पार्वतीकुमार कथकलीचे शिक्षण घेऊ लागले[].

पार्वतीकुमार यांनी दिग्दर्शित केलेले बॅले आणि चित्रपट

[संपादन]

मनीताईची फजिती, बिल्ली मौसी की फजेती, स्नो व्हाईट अँड सेवन ड्वार्फस्, पंचतंत्र, अपना हाथ जगन्नाथ आदी मुलांचे बॅलेही त्यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली गाजले.

गवना, दाग, बदमाश, विश्वामित्र मेनका, हम हिंदोस्थानी, एक मुसाफिर एक हसिना, दिल देके देखो, तुमसा नहीं देखा, काले-गोरे, मिस्टर एक्स, ढोला मारू, राज मुकुट, जय महालक्ष्मी (हिंदी), पोस्टातील मुलगी, प्रेम आंधळं असतं (मराठी), सुदी गुंटालू (तेलगू) आदी चित्रपटांतही त्यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून भूमिका बजावली. त्यांनी ‘तंजावूर नृत्यशाळा’ ही भरतनाट्यम् शिकवणारी संस्था स्थापन केली होती.

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]

राज्य सरकारचा सांस्कृतिक विभाग पुरस्कार, एफआयई फाऊंडेशन पुरस्कार, अखिल भारतीय नाटय़ परिषदेचा पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, मराठी नाट्य परिषद मुंबईचा पुरस्कार, शारंगदेव शिष्यवृत्ती, महाराष्ट्र गौरव पुरस्कार आदी सन्मान त्यांना मिळाले आहेत. त्याखेरिज कला छाया, बाल रंगभूमी, लिटल थिएटर, साहित्य संघ मंदिर, युवक बिरादरी, गान कला भारती, गणेश प्रसाद सोशल फोरम, रंगश्री बॅले ट्रुप, कला परिचय, कोकण कला मंडळ आदी संस्थांचेही पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली या संस्थेचेही ते कार्यकारिणी सदस्य होते.

संदर्भ

[संपादन]

संदर्भसूची

[संपादन]
  • "गुरु पार्वती कुमार यांचे निधन". प्रहार. २९ नोव्हेंबर २०१२. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.[permanent dead link]
  • तारदाळकर, रत्नाकर (१५ डिसेंबर २०१२). "नृत्याचार्य". लोकसत्ता. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  • पार्वतीकुमार (१० एप्रिल २०११). "गेले शिकायचे राहून!". महाराष्ट्र टाइम्स. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
  • पुरेचा, संध्या (१ मार्च २०२०). "नृत्यतपस्वी". महाराष्ट्र टाइम्स. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]