ॲन बुलिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अ‍ॅन बुलिन या पानावरून पुनर्निर्देशित)
अ‍ॅन बुलिन

अ‍ॅन बुलिन (इंग्लिश: Anne Boleyn ;) (इ.स. १५०१/इ.स. १५०७ - मे १९, इ.स. १५३६) ही इंग्लंडचा राजा आठवा हेन्री याची द्वितीय पत्नी व पहिली एलिझाबेथ हिची आई होती. तसेच ती पेंब्रोकाची पहिली मार्क्वेस असून तिच्या वंशजांनाही तो अधिकार होता. आठव्या हेन्रीचा अ‍ॅनेबरोबर झालेला विवाह आणि पुढे तिला देण्यात आलेल्या मृत्युदंडामुळे ती इंग्लिश सुधारणांच्या मुळाशी असलेल्या राजकीय आणि धार्मिक उठावांतील महत्त्वाची व्यक्तिरेखा ठरली.

जीवन[संपादन]

अ‍ॅन ही विल्टशर परगण्याचा पहिला अर्ल थॉमस बुलिन आणि विल्टशराची काउंटेस एलिझाबेथ बुलिन या दांपत्याची मुलगी होती. क्लोद ऑफ फ्रान्साची 'मेड ऑफ ऑनर' म्हणून तिचे शिक्षण नेदरलंड्स्फ्रान्स येथे झाले. इ.स. १५२२ सालच्या सुरुवातीला अ‍ॅन इंग्लंडास परतली. तिच्या नात्यातील ऑर्मंडाचा ९वा अर्ल जेम्स बटलर याच्याशी तिचे लग्न होणार होते. परंतु, हा विवाहसंबंध फिसकटला व अ‍ॅन आठव्या हेन्रीची राणी आरागॉनाची कॅथरिन हिच्या सेवेत 'मेड ऑफ ऑनर' म्हणून रुजू झाली.

इ.स. १५२५च्या सुमारास आठव्या हेन्रीला तिची भूल पडली आणि त्याने तिचा अनुनय सुरू केला. सुरुवातीला त्याच्या तिला मोहवण्याच्या प्रयत्नांना तसेच आपली बहीण मेरी हिच्याप्रमाणे त्याचे अंगवस्त्र बनण्याच्या प्रस्तावाला तिने धुडकावून लावले. आठव्या हेन्रीची तिच्याशी लग्न करण्याचा विचार आत्यंतिक बळावल्याने त्याने राणी कॅथरिनेशी घटस्फोट घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र पोप तिसरा क्लेमंट या गोष्टीला परवानगी देणार नाही, हे स्पष्ट झाल्यावर इंग्लंडातली कॅथलिक चर्चाची सत्ता मोडकळीस आणण्याच्या घडामोडी सुरू झाल्या.

अ‍ॅनेचे प्रस्थ आठव्या हेन्रीच्या लेखी वाढायला लागल्यावर त्याचा मुख्यमंत्री, यॉर्काचा आर्चबिशप थॉमस वूल्झे याची रवानगी अ‍ॅनेच्या सांगण्यावरून त्याच्या मूळ प्रांतात करण्यात आली. इ.स. १५३२ साली आठव्या हेन्रीने तिला महत्त्वाची पदे देऊ केली. बुलिन घराण्याचा पुरोहित, थॉमस क्रॅन्मर याला कॅंटरबरीचा आर्चबिशप नेमण्यात आले. जानेवारी २५, इ.स. १५३३ साली हेन्री आणि अ‍ॅन विवाहबद्ध झाले. मे २३, इ.स. १५३३ रोजी क्रॅन्मराने हेन्री आणि कॅथरिनेचा विवाहविच्छेद झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर पाचच दिवसांत त्याने अ‍ॅन व हेन्रीचा विवाह धर्मसंमत असल्याची द्वाही फिरवली. यानंतर लगेचच, पोपाने हेन्री व क्रॅन्मराला धर्मबहिष्कृत करण्याची शिक्षा जाहीर केली. या घटनेमुळे पहिल्यांदाच इंग्लंडातले चर्च व रोमातली धर्मसत्ता यांच्यातील संबंधांना तडे गेले व आठव्या हेन्रीने इंग्लंडातील चर्च स्वतःच्या आधिपत्याखाली आणले.

जून १, इ.स. १५३३ रोजी अ‍ॅनेचा इंग्लंडाची राणी म्हणून राज्याभिषेक झाला. त्याच वर्षी, सप्टेंबर ७ रोजी तिने इंग्लंडाची भावी राणी पहिली एलिझाबेथ हिला जन्म दिला. राज्याला वारस म्हणून तिने मुलास जन्म न दिल्याने हेन्री काहीसा नाराज झाला तरी त्याला मुलाची आशा होती व एलिझाबेथेवर त्याचे प्रेम होते. यानंतर तीनदा अ‍ॅनेचा गर्भपात झाला आणि त्याच सुमारास हेन्री जेन सीमोर हिच्यावर भाळला होता. एप्रिल-मे इ.स. १५३६मध्ये हेन्रीने राजद्रोहाच्या आरोपाखाली अ‍ॅनेची चौकशी चालवली. मे २ रोजी तिला अटक करून टॉवर ऑफ लंडन येथे ठेवण्यात आले. १५मेला ज्युरींपुढे तिच्यावर खटला चालून ती दोषी असल्याचा निर्वाळा देण्यात आला. टॉवर ग्रीन येथे अवघ्या चारच दिवसांनंतर तिचा शिरच्छेद करण्यात आला. आधुनिक इतिहासकारांच्या मते त्यावेळी तिच्यावर ठेवले गेलेले व्यभिचार व जवळच्या नात्यांत ठेवलेले लैंगिक संबंध हे आरोप अविश्वसनीय होत. तिची मुलगी, एलिझाबेथ ही इंग्लंडाची राणी बनल्यावर अ‍ॅनेला हुतात्म्याचा दर्जा मिळाला आणि ती इंग्लिश सुधारणा चळवळीची नायिका मानली जाऊ लागली. शतकानुशतके अनेक कला व सांस्कृतिक आविष्कारांची ती प्रेरणास्थान बनली आहे. तिच्यामुळे आठव्या हेन्रीने राणी कॅथरिनेशी काडीमोड घेतला व रोमातील धर्मसत्तेपासून इंग्लंडातले चर्च वेगळे केले म्हणून ती 'इंग्लंडाची सगळ्यांत महत्त्वाची व प्रभावी राणी' मानली जाते.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत