Jump to content

अवेस्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अवेस्ता किंवा झेंड अवेस्ता हा पारशी धर्माचा धर्मग्रंथ आहे. पारशी धर्म - संस्कृतीबद्दलचे विखुरलेले ज्या ज्या ग्रंथात एकत्रित केलेले आहे त्याला ‘अवेस्ता’ असे म्हणले जाते.

हा ग्रंथ इराणची प्राचीन अवेस्ता भाषेत लिहिलेला आहे. या भाषेचे संस्कृत भाषेशी बरेचशे साम्य आहे. झोराष्ट्रियन या प्राचीन इराणी धर्माचा संस्थापक झरत्रुष्ट्र होते. त्यांनी स्थापित केलेल्या धर्माच्या नीती-नियमांबद्दलची माहिती या ग्रंथात आहे. इरत्रुष्ट्र यांनी ज्या रचना केल्या त्यास गाथा असे म्हणले जाते. रोमन ज्ञानकोशकार प्लिनी यांनी असे नमूद केले आहे की, अवेस्ताची संख्या २० लाख असावी, तर अरबी इतिहासकार अल् तबरी यांच्या मते या अवेस्ता १२ हजार चर्मपत्रांवर लिहिलेल्या होत्या.

इतिहास

[संपादन]

अवेस्ता हा शब्द 'अविस्ताक-ज्ञान, ज्ञानदेणारें पुस्तक' या पहलवी भाषेतल्या शब्दावरून बनलेला आहे. अवेस्ता ग्रंथ, हा नष्टप्राय झालेल्या धर्माचा मुख्य ग्रंथ आहे. जगातील इतर कोणत्याही धर्माचा या धर्माच्या इतका कमी प्रसार नसेल हे खरें, तरी पण या अवेस्ता ग्रंथाचे व त्यामध्ये सांगितलेल्या धर्माचे ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्व आहे. या धर्मग्रंथांत खिस्ती शकापूर्वी ५०० वर्षांपूर्वींच्या व ख्रिस्तीशकानंतर ७०० वर्षांच्या अवधींतील इराणी लोकांच्या धर्मकल्पना, समजुती, आचारविचार यांची माहिती सांपडते; इतकेच नव्हे तर या धर्मग्रंथाच्या व त्यांत सांगितलेल्या धर्माच्या साहाय्यानें, पर्शुभारतीय काळावर म्हणजे वैदिक आर्यांच्या भारतप्रवेशापूंर्वीच्या काळावर प्रकाश पडण्याचा पुष्कळ संभव आहे. हल्ली उपलब्ध असलेला अवेस्ता ग्रंथ हा एका काळच्या मोठ्या वाड्मयाचा केवळ अवशेष होय. मूळ अवेस्ताग्रंथाची १२०० प्रकरणें होतीं असें पहलवी दंतकथांवरून समजते. अवेस्ताग्रंथ १२०० गाईंच्या कातड्यावर कोरला होता असे टबरी व मसूदी या इतिहासकारांनी म्हणले आहे. या ग्रंथाच्या विस्ताराबद्दल प्राचीन सीरियन लेखक सुद्धा साक्ष देतात व प्लिनी नावाच्या रोमन पंडित झोरोआस्टरने २० लक्ष कविता रचल्या असे म्हणले आहे. खुद्द उपलब्ध अवेस्ताग्रंथाचे अंतरंगपरीक्षण केले तरी हेच दृष्टोत्पत्तास येते. पण सर्वात बलवत्तर प्रमाण म्हणजे पहलवी भाषेतील डिनकर्त या ग्रंथाचें व पर्शियन रिवायतग्रंथांचें होय. या ग्रंथांत प्राचीन अवेस्ताग्रंथाच्या विस्ताराबद्दल व त्यातील मजकुराबद्दलची संपूर्ण माहिती आलेली आहे.

पूर्वकाळी व विशेषतः अकिमेनियन राजांच्या अंमलाखाली या धर्मग्रंथाचे रक्षण मोठ्या आस्थेने होत होते. झोरोआस्टरचा सहाय्यक जो विष्तास्प राजा त्याने अवेस्ता ग्रंथ सोनेरी अक्षरांत लिहून काढवून तो ग्रंथ पर्सेपोलीस येथील आपल्या दफ्तरकचेरीत ठेवला होता असे टबरीने म्हणले आहे, व डिनकर्त ग्रंथावरूनही हीच गोष्ट दिसून येते. या ग्रंथाची दुसरी एक सोन्याच्या विटांवर कोरलेली १२०० प्रकरणात्मक प्रत समरकंदमधील अग्यारी (अग्निगृह) मधील खास खजिन्यांत ठेवली होती असें शात्रोइहा-इ ऐरान या पहलवी ग्रंथावरून समजते. पण या दोन प्रतींचा अलेक्झांडरच्या स्वारीमध्ये ज्यावेळीं पर्सेपोलीस व समरकंद हे ग्रीकांच्या हाती आले त्यावेळी नाश झाला.

अलेक्झांडरच्या मागून सेल्युकसच्या अंमलाखाली व पार्थियन अमदानींताहि, अवेस्ता ग्रंथाचा पुष्कळ भाग नामशेष झाला. तथापि अशा हालाखीच्या स्थितींतहि अवेस्ताचा बराच भाग शिल्लक होता व काही भाग पारशी उपाध्यायांच्या तोंडात शतकाच्या प्रारंभी शिल्लक राहिलेल्या अवेस्ता ग्रंथाचें एकीकरण करण्याचा प्रयत्‍न झाला. वष्कश राजानें उपलब्ध अवेस्ता ग्रंथ लिहून काढण्यांत यावे, अशी आज्ञा जाहीर केली. सस्सानियन घराण्याच्या संस्थापकाने हीच परंपरा सुरू ठेवली. त्यामुळे या एकत्रीकरणाच्या प्रश्नाला चालना मिळाली व दुसऱ्या शापूरच्या कारकीर्दीत (३०९-३८०) आदरबाद मारसपंद या मुख्य प्रधानाच्या देखरेखीखाली या उपलब्ध ग्रंथाने एकत्रीकरण झाले; व हा तयार झालेला ग्रंथ प्रमाण ग्रंथ म्हणून मानण्यांत येऊं लागला. पण अलेक्झांडरच्या स्वारीने जे पारशांचे व त्यांच्या धर्मग्रंथांचे नुकसान झाले नाही ते मुसलमानांच्या प्रशियावरील स्वारीने झाले. मुसलमानांनी इराण पादाक्रांत केल्यावर त्यांनी आपल्या नेहमींच्या पद्धतीप्रमाणें धर्मच्छल करण्यास सुरुवात केली. ज्या ज्या ठिकाणी धर्मग्रंथ सांपडतील ते सर्व गोळा करून त्यांचा नाश करावा असे फर्मान काढण्यांत आले व पारशांचा फार छळ करण्यांत आला. त्यामुळे पारशी लोकांना देशत्याग करणे भाग पडले. त्यांच्याबरोबर जेवढा अवेस्ता ग्रंथाचा भाग नाशातून वाचला तेवढा रक्षिला गेला. पारशी लोकांपैकी बऱ्याच लोकांनी बाटण्याच्या भीतीने भारताचा मार्ग धरला. भारतात असता राखण्यात आलेला अवेस्ता ग्रंथाचा भाग पुन्हा लिहून काढण्यात आला. त्या प्रतींपैकी कांही प्रती १३-१४ व्या शतकामधील असून त्या उपलब्ध आहेत. पण कोणत्याही एका प्रतीत समग्र अवेस्ता ग्रंथ एकत्र असलेला आढळत नाही.

अवेस्ता ग्रंथाचे स्वरूप

[संपादन]

ज्याला हल्ली झेंदावेस्ता म्हणून संबोधण्यात येते, त्याचे दोन मुख्य भाग आहेत. पहिला, ज्यालाच खरोखर अवेस्ता हें नांव देणें संयुक्तिक होईल त्यामध्ये वेंदीदाद, विस्पेरद व यश्न यांचा समावेश होतो. वेंदीदादमध्ये पौराणिक कथा व धर्माच्या आज्ञा यांचा संग्रह झालेला आहे विस्पेरदमध्ये, यज्ञाकरीता जरूर अशा अरिष्टशांतिप्रार्थनांचा संग्रह आहे. यश्नमध्ये अशाच प्रकारच्या अरिष्टशांतिप्रार्थनांचा अंतर्भाव असून शिवाय, प्राचीन गाथापंचकाचाही यांत समावेश करण्यात आला आहे. काही हस्तलिखित प्रतीत हे तिन्ही ग्रंथ परस्परांहून स्वतंत्र असून त्यांच्या शेवटी पहलवी भाषेतील भाषांतर जोडलेले आढळते. इतर हस्तलिखित प्रतीत हे तीन्ही ग्रंथ यज्ञांमधील प्रार्थनांच्या दृष्टीने सोईप्रमाणे, एकत्र करण्यात आले आहेत व त्यांच्या शेवटी भाषांतर अगर टीका वगैरे काही आढळत नाहीत. म्हणून त्याला 'शुद्ध वेंदीदाद' असे नांव देण्यात येते. दुसऱ्या भागाचे खोर्द अवेस्ता असे नांव असून त्याच्या मध्ये छोटी छोटी प्रार्थनासूक्ते ग्रथित झालेली आहेत. ही सूक्ते केवळ उपाध्यायांनीच नव्हे तर सर्व गृहस्थांनी विशिष्ट प्रसंगी विशिष्ट तऱ्हेंने म्हणावयाची असतात. याखेरीज या भागांत यश्त व इतर संकीर्ण कथांचा अंतर्भाव होतो. यश्त म्हणजे देवतांच्या स्तुतींचा केलेला संग्रह.

आज जे अवेस्तावाड्मय उपलब्ध आहे ते संपूर्ण नूसन बरेचसे वाड्मय लुप्त झालेले असावे असे या वाड्मयाच्याकडे विचारपूर्वक पाहिल्यास सहज दिसून येईल. शिवाय या मताला ऐतिहासिक पुरावाही पण सापडतो. अरबांच्या विजयामुळे सस्सानियन राजघराण्याला ओहोटी लागली. झेंद वाड्मयाचा बराच भाग उध्वस्त करण्यांत आला. वेंदीदादच्या पहलवी भाषांतरात असे पुष्कळ झेद भाषेतील उतारे सांपडतात की त्यांची माहितीच आपल्याला अद्यापी लागलेली नाही. निरंगिस्तान एओजेमेद, या ग्रंथांतही असे पुष्कळ अज्ञात पुस्तकांतील उतारे घेतलेले आहेत. यश्तांची संख्या ३० आहे अशी पारशी लोकांची समजूत आहे. पण त्यांपैकी १८ उपलब्ध आहेत. इतके तरी अवेस्ता वाड्मय शिल्लक राहिले याचे कारण त्यात श्रौतस्मार्तविधींचा संग्रह असून त्यांचा नेहमी व्यवहारांत उपयोग होत असल्यामुळे त्याचे रक्षण होणे स्वाभाविकच होते हे होय.

प्राचीन अवेस्तांचे स्वरूप

[संपादन]

सस्सानियन घराण्याच्या सत्तोखाली अवेस्ता वाड्मयाचा संग्रह करण्यात येऊन त्याचे २१ नस्क (भाग) पाडण्यात आले आहेत. यापैकी पहिल्या सात भागांना गाथा व दुसऱ्या सात भागांना दात अगर आचारभाग व उरलेल्या सात भागांना हधमाथ्र असे नांव पडले.

गाथा नस्कामध्ये स्तोतयश्त, सूत्कर, वर्श्त मानसर, बक, वश्तग, हाधोक्त, स्पंद या गाथांचा अंतर्भाव होतो. स्तोत यश्तांत यश्नाचे सार आलेले असून हे यश्त फार पवित्र मानण्यात येते. या स्तोत यश्तांची ३३ प्रकरणे असून, त्यांपैकी २२ प्रकरणे पद्यमय असून त्यांतील भाषा ही फार प्राचीन दिसते. बाकीची ११ प्रकरणे ही गद्यमय असून त्यांची भाषा तत्कालीन प्रचलित असलेली भाषाच आहे. सूत्कर, बर्श्त मानसर, व बक यांमध्ये प्रत्येकी २२ प्रकरणे असून या २२ गाथांवर यात टीका आलेली आहे व गाथांचे भाषांतरहि केलेले आहे. पण ही सर्व प्रकरणे उपलब्ध नाहीत, हाघोक्ताची तीन प्रकरणे आहेत, त्यांपैकी एक प्रकरण यश्नामध्ये घालण्यांत आले आहे.

धर्मकायदाविषयक नस्कामध्ये निकातम, गनबा सरनिगत, हूस्पारम, सकातुम, वेंदीदाद, कित्रदात, बकानयश्त इत्यादिकांचा अंतर्भाव होतो. या सात नस्कांपैकी पहिल्या पांच नस्कांत धर्मविषयक कायद्यांची माहिती आलेली आहे. शेवटच्या दोन नस्कांत, विश्वोत्पत्तिाविषयक व पौराणिक कथांचा संग्रह आहे. धर्मकायदाविषयक पांच नस्कांत वेंदीदाद हे नस्क पूर्णपणे उपलब्ध आहे. निकातम् गनबा सरनिगत, व सकातुम यांचा थोडा भाग उपलब्ध आहे. हुस्पारमचा महत्त्वाचा भाग, इरपतिस्थान व नीरंगिस्तानमध्ये राखून ठेवण्यांत आला आहे. कित्रदात नस्कांत मनुष्यजातांच्या व इराण देशाच्या उत्पत्तीची माहिती आली असून झोरोआस्टरच्या जन्मापर्यंतचा इतिहास त्यांत आढळतो. बकान यश्तांत निरनिराळ्या यझताच्या प्रार्थना असून हल्लीं १८ यश्तच उपलब्ध आहेत.

हधमाथ्र नस्कांत दामदात, नातर, पागग, रतदात इतग, बरीज, कस्किश्रव, विष्तास्प सास्त यांचा अंतर्भाव असून या नस्कांची नासाडी फार झालेली आहे. दामदातांत झोरोआस्टरच्या मतें जगाच्या उत्पत्तीची माहिती आलेली आहे पण हे नस्क संपूर्ण उपलब्ध नाही. नातरसंबंधी कांहीच माहिती उपलब्ध नाही. पागगमध्ये गाहानबार, श्रौतविधी, कालाचे भाग, इत्यादींची माहिती आलेली आहे. रतदात इतग याचे दोनच भाग उपलब्ध असून त्यांत यज्ञांचे विधिवर्णन केलेले आहे. बरीजमध्ये नीतितत्त्वांचे विवेचन आहे. कास्किश्रवामध्ये यज्ञ बिनचुक कसा करावा याविषयीची माहिती आली आहे. विष्तास्प सास्त यामध्ये झोरोआस्टरने विप्ताष्पाला आपल्या धर्मांत ओढून घेतल्याची कथा व नस्कांपैकी अर्गास्पविरुद्ध केलेल्या लढायांची हकीकत आली आहे.

प्राचीन अवेस्ता ग्रंथाच्या स्वरूपाचे थोडक्यांत वर्णन केल्यानंतर त्यापैकीं हल्लीं किती भाग उरला आहे याकडे वळूं. पूर्वी शिल्लक असलेल्या ग्रंथांचे स्वरूप सांगितलें आहे त्यावरून प्राचीन अवेस्ता ग्रंथातील मुख्य व महत्त्वाचा भाग अद्यापिही शिल्लक आहे असें दिसतें. कारण २१ नस्कांपैकी वेंदीदाद व स्तोतयश्त व बकान यश्ताचा महत्त्वाचा भाग हें तीन नस्क संपूर्ण उपलब्ध आहेत. बक, हाधोक्त, विष्तास्त सास्त व हूस्पारम या चार नस्कांचा महत्त्वाचा भाग अद्यापि उपलब्ध असून त्याशिवाय इतर नस्कांमधील थोडा थोडा भाग उपलब्ध आहे. याशिवाय बाकींचे नष्ट नस्क अवेस्तन भाषेत उपलब्ध नसले तरी पहलवी भाषेत भाषांतराच्या रूपाने ते अस्तित्त्वांत आहेत व या भाषांतराच्या सहाय्याने त्यांतील मजकूर कळतोच.

अवेस्तांतील विषय मांडणी व काळ

[संपादन]

हल्लीच्या उपलब्ध अवेस्ता ग्रंथाच्या अंतरंगाची माहिती ज्ञानकोश प्रस्तावना खंड, भाग ३, उत्तरभाग प्रकरण ८ पृष्ठे ९८-९९ यामध्ये दिलेली आहे. कालासंबंधीं वर दिलेल्या प्रकरणांतील १००-१०१ पाने पहा.

अवेस्तांतील वृत्ते

[संपादन]

अवेस्तांतील वृत्तांचे निरीक्षण केल्यास अवेस्तांतील भाग कोणकोणत्या वेळी लिहिले गेले याचे अनुमान करता येते. अवेस्तांतील अगदी जुना जो भाग आहे तो छंदाबद्ध आहे. व त्यानंतर मागाहून लिहिण्यात आलेला भाग हा गद्य आहे असे दिसते. गाथा वाड्मय हा छंदोबद्ध भाग असून त्याचे याहि बाबतीत वैदिक ग्रंथांशी साम्य आहे. अवेस्तामधील छंदोबद्ध भाग म्हणजे गाथावाड्मय. त्याशिवाय दुसरा कोणता छंदोबद्ध भाग नाही अशी प्राचीनांची समजूत होती पण यूरोपीयन पंडितांनी गाथावाड्मयानंतरच्या वाड्मयांतहि मधून मधून छंदोबद्ध भाग दृष्टीस पडतात असे सिद्ध केले आहे. अवेस्तांतील पद्यवाड्मय हे अष्टाक्षरी वृत्तांत लिहिलेले आढळते. याशिवाय इतर वृत्त वापरलेले क्वचितच आढळून येते.

अवेस्ताची भाषा

[संपादन]
मुख्य लेख: अवेस्तन भाषा

अवेस्ता ज्या भाषेत लिहिला गेला त्या भातिचे अवेस्तन नांव आहे. इंडोजर्मानिक भाषासमूहाच्या इराणी शाखेची ही भाषा असून तिचे संस्कृतशी विलक्षण साम्या आहे; व हे अवेस्ता ग्रंथाच्या प्रामाण्यनिश्चयाचे एक बलवत्तर साधन झाले आहे. ध्वनिशास्त्रदृष्ट्या अवेस्तन भाषेंतील व संस्कृत भाषेतील स्वरांमध्ये पुष्कळ साम्य आहे. ई व ओ या स्वरांचे अवेस्तन भाषेत पुष्कळ प्रकार होतात तसे संस्कृतमध्ये होत नाहीत. शब्दाच्या शेवटचे स्वर ओ खेरीजकरून सर्व ऱ्हस्व आहेत. संस्कृतमध्ये तसा प्रकार नाही. अवेस्तन भाषेतील काही व्यंजने संस्कृत व्यंजनांशी साम्य दाखवितात पण बऱ्याच व्यंजनांचे संस्कृत व्यंजनांशी ध्वनिसाम्य आहे. संस्कृत 'स' चे अवेस्तांत 'ह' हे रूप होते. अशा रीतीने संस्कृत व अवेस्तन भाषांमध्ये पुष्कळच साम्य असल्यामुळे अवेस्तन शब्दप्रयोगांचे संस्कृतांत सहज रूपांतर करतां येते. वैदिक संस्कृत भाषेप्रमाणेच अवेस्तन भाषेंतहि प्रत्ययांची समृद्धि आहे. वाक्यरचनेच्या बाबतींत, संस्कृतमध्ये व अवेस्तन भाषेमध्ये थोडा फार महत्त्वाचा फरक आढळून येतो.

अवेस्ता ग्रंथांत दोन पोटभाषांचे अस्तित्त्व दृग्गोच्चर होते. एक गाथांची जुनी भाषा व दुसरी नंतरच्या वाड्मयांत आढळून येणारी भाषा. पहिलीला गाथाअवेस्तन भाषा असे नाव आहे व दुसरीचे कनिष्ठ अवेस्तन नाव आहे. गाथाअवेस्तन भाषा आणि कनिष्ठ अवेस्तन भाषा या दोन भाषांमधील फरक वैदिकसंस्कृत व अभिजातसंस्कृत यांमधील फरकाप्रमाणे आहे. गाथांची भाषा फार शुद्ध असून वाक्यरचनाहि पण तितकीच शुद्ध असते. शब्दाच्या शेवटचा स्वर दीर्घ करण्यांत येतो. कनिष्ठ अवेस्तनभाषा मिश्र आहे. अपभ्रष्ट शब्द तीत बरेच येतात.

लिपी

[संपादन]

अवेस्तन भाषेच्या मानाने अवेस्तन लिपि ही बरीच मागाहूनची असावी असे दिसून येते या भाषेतील अक्षरे सस्सानियन काळांतील पहलवी लिपीपासून घेतली असावीत असे दिसून येते या लिपीत उर्दूप्रमाणेच उजवीकडून डावीकडे ओळ वाचावयाची असते. मूळच्या अवेस्तन लिपीसंबंधाची माहिती अद्यापि उपलब्ध नाही. अवेस्ता ग्रंथाचे पहलवीमध्ये रूपांतर सस्सानियन काळांत झाले. त्यावेळी अवेस्ता समजण्याची देखील अडचण पडू लागली होती. अवेस्तावर काही टीकाग्रंथ झाले होते असे दिसते; व अशा प्रकारचे टीकाग्रंथ मुसुलमानी अमदानीत म्हणजे ख्रिस्ती शकाच्या आठव्या नवव्या शतकांत देखील झाले होते याबद्दल पुरावा सापडतो. पहलवीमध्ये रूपांतर झालेल्या भागांपैकी, संपूर्ण यश्न, विस्परेद, वंदीदाद व इतर थोडा भाग उपलब्ध आहे. अवेस्ताचे शब्दशः भाषांतर व क्वचित् ठिकाणी विवरणार्थ टीपा असे या रूपांतराचे स्वरूप आहे. मूळ अवेस्तांतील वाक्यरचना देखील जशाच्या तशा भाषांतरात ठेवण्याचा प्रयत्‍न करण्यात आला आहे, व ज्या ठिकाणी अशक्य होईल त्या ठिकाणी तेवढे नवीन प्रत्यय निर्माण करण्यात आले आहे. या पहलवी भाषांतरावरून प्राचीन काळी या झरथुष्ट्रांच्या धर्मासंबंधीच्या आपल्या कोणत्या कल्पना होत्या, अवेस्तामधील धर्मविषयक कायद्यांचा तत्कालीन लोक कशाप्रकारे अर्थ लावीत असत, तत्कालीन आचारविचार काय होते यासंबंधीची माहिती मिळते व या दृष्टीने या भाषांतराचे फार महत्त्व आहे. याशिवाय अवेस्तांतील एखाद्या क्लिष्ट शब्दाचा अर्थ या पहलवी रूपांतरावरून समजतो, या दृष्टीनेहि या भाषांतराचे महत्त्व आहे. या भाषांतरात पुष्कळ अशुद्धे व चुका आहेत व त्यात काही काही ठिकाणी विचित्र अर्थ करण्यात आला आहे हे खरे तथापि त्यामुळे त्याचे महत्त्व कमी होत नाही. अवेस्तन वाक्यरचनेबरहूकूम पहलवी भाषांतरांतहि तशीच वाक्यरचना करण्याचा प्रयत्‍न करण्यात आल्यामुळे भाषांतर फार बाजड झाले आहे. इ.स. १२०० च्या सुमारास, धवल नावाच्या एका पारशी पाद्याच्या नेर्योसंघ नावाच्या मुलाने या पहलवी भाषांतराचे संस्कृतमध्ये रूपांतर केले. हे भाषांतर करताना याने ही पहलवी वाक्यरचना संस्कृतमध्ये तशीच ठेवण्याचा प्रयत्‍न केल्याने संस्कृत भाषांतर फार क्लिष्ट झाले आहे संस्कृतांतील संधि-नियमाकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले आढळते. सुमारे १६००-१८०० च्या सुमारास खोर्द अवेस्ताच्या पहलवी भाषांतराच्या कांही भागांचे अर्वाचीन पर्शुलिपीत रूपांतर करण्यात आले. तसेच १९ व्या शतकात या पहलवी रूपांतराची गुजराती भाषेत दोन रूपांतरे झाली व त्यात बरीच चांगली वठली आहेत.

त्यानंतर पाश्चात्य यूरोपीय पंडितांनी याकडे लक्ष्य वेधले. अवेस्ता ग्रंथाची मूळ लिपी शिकून त्या ग्रंथाचे भाषांतर करण्याचा पहिला मान अ‍ॅनक्कोटिल डू पेरा या फ्रेंच विद्वानास देणे जरूर आहे. त्याने हिंदुस्थानात येऊन अतिशय संकटात दिवस काढून मोठ्या खटपटीने इराणी भटजीजवळ या ग्रंथांचे अध्ययन केले; त्या ग्रंथाच्या काही प्रती मिळविल्या व त्या धर्मांतील विधींचाही त्याने थोडाफार परिचय करून घेतला. पारीस येथे परत आल्यानंतर त्याने सतत दहा वर्षें या ग्रंथाचे अध्ययन करून १७७१ साली या ग्रंथाचे सटीक भाषांतर केले.

या भाषांतरामुळे यूरोपमध्ये खळबळ उडून गेली. पुष्कळ लोकांनी डू पेराने मिळवलेल्या ग्रंथाच्या खोटेपणाबद्दल शंका प्रदर्शित केली. यामध्ये सर जोन्स हा प्रमुख होता. त्याने डू पेराला मिळालेली प्रत, साफ खोटी असून त्याला पारशांशी चकविले असे प्रतिपादन केले. त्याच्या उलट फ्रान्समध्ये डू पेराला पुष्कळ अनुयायी मिळाले व जर्मनीतील विद्वान क्लूकर याने तर या डू पेराच्या भाषांतराचे रूपांतर करून व त्यात भरपूर माहितीची भर घालून ते पुस्तक प्रसिद्ध केले.

इ.स. १८२५ च्या सुमारास पाश्चात्य संस्कृत पंडितांचे इकडे लक्ष्य वेधले. संस्कृत व अवेस्तन भाषेंत बरेंच साम्य आहे असे डू पेरा वगैरे विद्वानांनी सिद्ध केलेंच होते. पण रस्क नांवाच्या डॅनिश भाषाशास्त्रज्ञानें या दोन भाषांत काय साम्य आहे हें सप्रमाण दाखवून दिलें. हा पंडित स्वतःइराणमध्ये गेला होता व तेथून त्यानें अवेस्ता ग्रंथाच्या प्रती व पहलवी भाषांतरें जमवून आणलीं. १८२६ सालीं त्यानें एक छोटासा ग्रंथ लिहून त्यांत, अवेस्तन भाषा फार प्राचीन असून तिच्यामध्ये व संस्कृतमध्ये बरेंच साम्य आहे. ती भाषा संस्कृताहून भिन्न पण, निकटसंबद्ध आहे असें सिद्ध केलें व अवेस्ता ग्रंथांतील लिपीसंबंधाचेहि त्यानें बरेच शोध केले.

यानंतर बर्नाफ नांवाच्या फ्रेंच पंडितानें अवेस्ताचा अभ्यास चालविला होता. डू पेराच्या भाषांतरांत बऱ्याच चुका त्याला आढळल्यामुळें त्यानें नर्योसंघाच्या संस्कृत रूपांतराच्या सहाय्यानें अवेस्ता वाचला व डू पेराच्या भाषांतरांतील पुष्कळ चुका दुरुस्त केल्या. यानंतर या दिशेनें व विशेषतः अवेस्तन लिपीसंबंधानें वॉप, हॉग, विंडीशमन, वेस्तरगार्ड, रोट, स्पीजेल इत्यादी पंडितांनीं फार प्रयत्‍न केले. या पंडितांमध्ये, अवेस्ता ग्रंथाची माहिती करून घेण्याच्या कामीं, प्राचीन टीकाग्रंथाचा व तत्कालीन इतर उल्लेखांचा आश्रय करावयाचा अगर तौलनिक भाषाशास्त्राचें साहाय्य घ्यावयाचें यासंबंधीं वाद माजला होता. पण दोन्ही साधनें सापेक्ष व परस्परसाहाय्यकारी आहेत व त्या दोहोंचाहि उपयोग करून घेणें जरूर आहे हें मत हल्लीं प्रस्थापित झालें आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]

संदर्भग्रंथ

[संपादन]
  • मिलस-गाथाज (लिपझिग १८९२-९४);
  • बोर्नाफ-वेंदांदाद सादे (पारिस १८२९-४३)
  • अ‍ॅटिया-वेंदीदाद सादे (बॉंबे १९०१)
  • संजाना-नीरंगस्तान (मुंबई १८९४)
  • जमस्पजी अँड हॉग-ओल्ड झंद-पहलवी ग्लॉसरी
  • अ‍ॅन क्वेटिल डू पेरॉ-झेंद-अवेस्ता औव्रेजर झोरोआस्ट्रे २ व्हॉल्यूम्स, पारिस १७७१
  • क्ल्यूकर-झेंद-अवेस्ता, (इंग्रजी भाषांतरकार-ब्लीक ३ भाग, लंडन १८६४)
  • डॉर्मस्टेटर-झेंद-अवेस्ता (सेक्रेडबुक्स ऑफ दि ईस्ट सीरीज); जॅक्सन-अवेस्ता ग्रामर-स्टलर्ट १८९१
  • कांगा-प्रॉक्टिकल ग्रामर ऑफ दि अवेस्ता लॅंग्वेज (बांबे १८९१)
  • संजाना-दि पहलवी व्हर्शन ऑफ दि अवेस्ता वेंदीदाद (बॉंबे १८९५)
  • भरूचा-कलेक्टेड संस्कृत रायटिंग्ज ऑफ दि पारशीज (बांबे १९०६; वेस्ट-कंटेंटस ऑफ दि नस्क; हॉग-एसेज ऑन दि पारशीज, लंडन १८८४
  • ब्राऊन-लिटररी हिस्ट्रिरी ऑफ पर्शिया, लंडन १९०२
  • संजाना-झरुथुष्ट्र अ‍ॅड झरथुस्ट्रियानिझम इन अवेस्ता (लिपझिग १९०६)
  • मनोहर विष्णू काथवटे-पार्शांचा इतिहास