अमेरिकीतील क्रांतिकारी चळवळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमेरिकेतील क्रांतिकारी चळवळीचे सूत्रधार लाला हरदयाळ होत. हरदयाळ यांना लंडन येथे शिक्षण घेण्यासाठी शासकीय शिष्यवृत्ती लाभली होती. तेथे गेल्यावर त्यांना भारतातील ज्वलंत समस्यांची व क्रांतीकारकावरील अन्यायाची जाणीव झाली व त्यांनी शिष्यवृतीचा त्याग केला आणि ते भारतात आले. लाहोर येथे त्यांनी क्रांतीच्या प्रचारास आरंभ केला. तथापि ब्रिटिश प्रशासनाच्या करड्या नजरेखाली असे कार्य करता येणार नाही याची त्यांना कल्पना आली व त्यांनी १९११ मध्ये सानफ्रान्सिस्कोला प्रयाण केले. तेथे त्यांनी समविचारी भारतीयांचे संघटन करून १९१३ मध्ये ' हिंदी असोसिएशन ॲाफ अमेरिका ' या नावाचे केंद्र सुरू केले. भारतीय क्रांती लढ्याकडे अमेरिकन जनतेचे व शासनाचे लक्ष आकृष्ट करण्यासाठी त्यांनी गदर नावाचे साप्ताहिक सुरू केले. गदर या नावावरूनच त्यांना क्रांतिकारी संघटना म्हणून ओळखले जाऊ लागले. गदर संघटना अल्पावधीतच लोकप्रिय झाली व तिची सदस्य संख्या ५००० च्या वर गेली. अमेरिका व कॅनडा येथे उत्तम प्रतिसाद मिळून ६२ शाखा उघडल्या गेल्या भरपूर निधी उपलब्ध झाला. तेव्हा गदरनी आपली काही उद्दिष्टे जाहीर केली. त्यामध्ये भारतातील ब्रिटिश सत्ता , शस्त्रास्तरांचा वापर करून नष्ट करणे, ब्रिटिश अधिकाऱ्यांचे खून करणे, सरकारी तिजोरी लुटणे यांचा अंतर्भाव होता . तसेच भारतीय सैनिकांची सहानुभूती प्राप्त करणे , हे त्यामधील प्रमुख अंग होते.

या चळवळीचा वाढता प्रभाव लक्षात येताच ब्रिटिश सरकारने अमेरिकन सरकारवर दडपण आणून लाला हरदयाळ यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालविण्यास भाग पाडले. तथापि अमेरिकन न्यायाधीशाने त्यांना निर्दोष मुक्त केले. यामध्ये भारताविषयी सहानुभूती बाळगणाऱ्या ब्रियन या परराष्ट्र सचिवाचा हात असावा असे बोलले जात होते. त्यानंतर हरदयाळ स्विझर्लंडला निघून गेले . तथापि गदर पक्षाचे कार्य १९२३ पर्यंत चालू असल्याचे दिसते.