अबू बक्र
अबू बक्र अस्-सिद्दिक (अब्दल्ला इब्न अबी कहाफा) (अरबी : أبو بكر الصديق or عبد الله بن أبي قحافة) (५७३ - ऑगस्ट २३, ६३४) हा इस्लाम धर्माचा प्रेषित मोहम्मद पैगंबराचा मित्र व जवळचा सल्लागार, पाठिराखा होता. पैगंबरानंतर त्याच्या राजकीय व संघटनात्मक कार्याचा कारभार अबू बक्राने सांभाळला. रूढ लोकसमजुतीनुसार अबू बक्र इस्लामाचा पहिला पुरुष अनुयायी मानला जातो; मात्र या समजुतीच्या ऐतिहासिक सत्यतेबद्दल इतिहासकारांमध्ये एकमत नाही. सत्याची पाठराखण करण्याच्या गुणविशेषावरून पैगंबराने त्याला 'अस्-सिद्दिक' (अर्थ : खरा) हा किताब बहाल केला. पैगंबराच्या निधनानंतर तो पहिला मुस्लिम राज्यकर्ता (६३२ - ६३४) झाला. सुन्नी इस्लामानुसार तो राशिदुनांपैकी (अर्थ : उपदिष्ट खलिफे) पहिला होता. शिया इस्लामानुसार मात्र तो राजकीय संधिसाधू मानला जातो. अबू बक्राची खिलाफत दोन वर्षे व तीन महिने चालली. या काळात त्याने इस्लामी राज्याची बांधणी केली. पैगंबराच्या निधनानंतर ज्या अरब टोळ्यांनी इस्लामी मताविरुद्ध बंड पुकारले होते, त्यांच्याविरुद्ध त्याने रिद्दा युद्धे लढून संपूर्ण अरबी द्वीपकल्प जिंकला व इस्लामाच्या अमलाखाली आणला. त्याने सास्सानी पर्शियन साम्राज्यावर व बायझंटाइन साम्राज्यावर आक्रमण करून वर्तमान सीरिया व इराकाचा भूप्रदेश काबीज केला. त्याच्याच कारकीर्दीत कुराणातील वचनांचे वर्तमानातील प्रचलित स्वरूपामध्ये संकलन केले गेले.