अतुल चिटणीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अतुल चिटणीस

अतुल चिटणीस (२० फेब्रुवारी १९६२ - ३ जून २०१३ ) हे जर्मनीत जन्मलेले भारतीय संगणक अभियंता होते. भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युजर्सना "लिनक्‍स सॉफ्टवेअर' वापराची ओळख करून देण्याचा मान प्रथम चिटणीस यांच्याकडे जातो. त्यांनी प्रसिद्ध नियतकालिक "पीसीक्वेस्ट'साठी सहा वर्षे सल्लागार संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.[ संदर्भ हवा ]

कारकीर्द[संपादन]

तंत्रज्ञानामुळे पारदर्शक कारभाराची गुरूकिल्ली हाती येते ; तरी कित्येकदा तंत्रज्ञानही मक्तेदारीमध्ये जखडून ठेवण्याची खेळी प्रस्थापितांकडून केली जाते. या जोखडातून संगणक तंत्रज्ञानाची सुटका करून ते सर्वांना उपलब्ध व्हावे ,याचा पाठपुरावा करण्यात ओपन सोर्सचे प्रणेते अतुल चिटणीस यांनी आपली कारकीर्द घडवली. फ्री आणि ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे प्रणेते म्हणून १९९४पासून अतुल चिटणीस हे नाव भारताला ठाऊक झाले. साधारण त्याच काळात उद्योगव्यवहारांमध्ये वह्यापेन्सिली आणि कागदी फायलींची जागा कम्प्युटर घेऊ लागला होता. कदाचित त्यावेळी , सॉफ्टवेअर कुणा कंपन्यांच्या मक्तेदारीत बांधलेले नसावे , या विचाराचे मोल सर्वांना तितकेसे उमजत नसावे. नंतर भारतीय भाषांच्या वापरातील अडचणी , परवान्यासाठी मोजावी लागणारी किंमत तसेच भारतीय डेटाची सुरक्षितता व परावलंबित्वाचे प्रश्न यामुळे ओपन सोर्सची गरज सर्वांना पटू लागली. अतुल चिटणीस यांनी मात्र १९८०पासूनच कम्प्युटर तंत्रज्ञानावर हुकुमत मिळविली होती. त्यामुळेच लिनक्स सॉफ्टवेअर तसेच फ्री व ओपन सोर्सचा नारा त्यांनी पुकारला. अतुल यांचे वडील भारतीय , तर आई जर्मनीची. त्यांचा जन्म आणि प्राथमिक शिक्षणही बर्लिनमध्ये झाले. त्यानंतर मात्र त्यांचे शिक्षण बेळगाव मिलिटरी स्कूलमध्ये झाले व गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून त्यांनी बीई-मेकॅनिकल केले. वर्षभरातच त्यांचा प्रवास कम्प्युटरनिगडित तंत्रज्ञानाकडे झाला. कम्प्युटरनिगडित अनेक गोष्टींचा प्रथम पुरस्कार त्यांनी केला. मोडेमचा वापर शिकविला. इंटरनेटचा प्रसार होण्यापूर्वीच्या काळात डेटाकम्युनिकेशन ,नेटवर्किंग यांची सुरुवात त्यांनी केली.[ संदर्भ हवा ]
सीआयएक्स- बुलेटिन बोर्ड सिस्टिम ही भारतातील पहिली ऑनलाइन सेवा त्यांनी सुरू केली. ऑनलाइन संपर्क आणि समूहसंवादाचे ते आद्य माध्यम होते. १९९३ ते १९९७ या काळात त्यांनी पीसी-क्वेस्ट या कम्प्युटरआधारित नियतकालिकातून कम्प्युटरजागृतीचा वसा घेतला. भारत सरकारने बुलेटिन बोर्ड सिस्टिमला करांच्या कक्षेत आणण्याचा घाट घातला असताना चिटणीस यांनी इलेक्ट्रॉनिक चळवळीद्वारे त्यावर प्रहार केले. ही पहिलीच ऑनलाइन चळवळ यशस्वी ठरली. विविध व्यासपीठांवर त्यांनी लिनक्स आणि ओपनसोर्सविषयी जनजागरण केले. २१व्या शतकातील नव्या तंत्रज्ञानानुसार त्यांनी मोबाइल कम्प्युटिंग , कन्व्हर्ज्ड कम्युनिकेशन यांतही उडी घेतली. पीसी क्वेस्टचे सल्लागार संपादक म्हणून विपुल लिखाण केले. ते स्वतः हौशी संगीतकारही होते व संगीताची तंत्रज्ञानाशी सांगड घालण्याचे कसबही त्यांच्या अंगी होते. रेडिओव्हर्व हे इंटरनेट रेडिओ स्टेशन त्यांनी सुरू केले होते. त्यांच्या अकाली निधनाने एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.  त्यांना कर्करोग झाल्याचे निदान ऑगस्ट २०१२ झाले होते. त्यांचे केमोथेरपीच्या उपचारादरम्यान ३ जून २०१३ रोजी निधन झाले. [१]

संदर्भ[संपादन]