Jump to content

अग्निरोधन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एखाद्या जळू शकणाऱ्या वस्तूवर रासायनिक प्रक्रिया करून ती पेट घेऊ शकणार नाही, असे करण्याच्या क्रियेला ‘अग्निरोधक’ म्हणतात. परंतु अशा वस्तू पूर्णपणे अज्वालाग्राही करण्याचा उपाय सापडलेला नाही. म्हणून अग्निरोधन ही संज्ञा वस्तुतः चूक आहे. कापूस, कापड, लाकूड, कागद इत्यादींवर काही प्रक्रिया करून, ते ज्वालेचा संपर्क झाला तर तिला काही अंशी प्रतिरोध करतील व सहज पेट घेणार नाहीत असे मात्र करता येते व यालाच अग्निरोधन ही संज्ञा किंचित सैल अर्थाने लाविली जाते.

अंग्निरोधनाच्या पदार्थाचे स्वरूप : ज्यांचे अग्निरोधन करावयाचे असेल, त्यांच्या पृष्ठांवर योग्य अशा रसायनाची पुटे देतात किंवा ते रसायन त्या पदार्थांत मुरवून घालतात. यासाठी कधी कधी अशी रसायने वापरली जातात की, जी तापविली गेल्यावर त्यांच्यापासून अज्वालाग्राही वायू तयार होऊन ते बाहेर पडतात. त्यांचा परिणाम जणू गुदमरविण्यासारखा किंवा कोंडमारा करण्यासारखा होऊन, त्या वस्तूला स्पर्श करणाऱ्या ज्वालेला प्रतिरोध होतो. काही रासायनिक द्रव्यांपासून वस्तूंच्या पृष्ठावर असे अभेद्य पुट तयार होते की, त्याच्यातून ज्वाला वस्तूत शिरू शकत नाही. काही रसायने अशी असतात की, ज्यांच्यामुळे तंतुमय वस्तूंच्या धाग्यात अज्वालाग्राही पदार्थाचे पुरण पुरेपुर भरले जाते.

अग्निरोधन-द्रव्यांची निवड: अग्निरोधनासाठी उपयुक्त अशी द्रव्ये शोधून काढण्यासाठी शेकडो रासायनिक द्रव्यांवर प्रयोग करून पाहण्यात आले आहेत. बोरॅक्स (टाकणखार), बोरिक अम्ल, अमोनियम फॉस्फेट, अमोनियम कार्बोनेट, अमोनियम सल्फेट, अमोनियम क्लोराइड (नवसागर), सोडियम टंगस्टेट, लेड ॲसिटेट, पोटॅशियम किंवा अमोनियम-युक्त तुरट्या ही संयुगे अतिशय उपयुक्त आहेत, असे दिसून आलेले आहे.

नाट्यगृहातील देखावे, कागद, सजावटीच्या ज्वालाग्राही वस्तू, रेयॉन व सुती कापड किंवा त्यांचे गठ्ठे यांच्या अग्निरोधनासाठी १०० भाग पाण्यात ६ भाग टाकणखार व ५ भाग बोरिक अम्ल असलेला विद्राव अतिशय उपयुक्त असा अग्निरोधक असल्याचे आढळून आले आहे. कोरड्या कापडाच्या अग्निरोधनासाठी ८ ते १२% विद्राव पुरेसा होतो. कापड न धुता कोरडे ठेवलेले असेल तर ६ किंवा १२ महिन्यांच्या अंतराने वरील विद्रावाने केलेले संस्करण पुरेसे असते. अमेरिकेच्या ‘ब्यूरो ऑफ स्टॅंडर्डस’ या संस्थेने पुढील पर्याय सुचविलेला आहे. १०० भाग पाण्यात २४ भाग सोडियम टंगस्टेट व ६ भाग डाय-अमोनियम फॉस्फेट असलेल्या विद्रावात कापड भिजवून हाताने पिळल्यावर, कापडाच्या ३० % भाराइतकी रासायनिक द्रव्ये कापडात अडकून राहतात. विद्रावाचे तापमान २० से. ठेवतात. भिजविलेल्या कापडातील विद्राव निघून गेल्यावर ते वाळवितात. या प्रक्रियेमुळे कापडाचा मूळचा नरमपणा बदलत नाही, कापड ओलसर किंवा मळकट होत नाही. या मिश्रणातील रसायने विषारी नाहीत आणि ती बुरशीच्या वाढीस मदत करीत नाहीत.

धाग्यावर अवक्षेपांचे पुट बसविणे ही अग्निरोधनाची एक पद्धती आहे. अग्निरोधनाचा आणखी एक प्रकार म्हणजे कापडाच्या धाग्यावर अग्निरोधक द्रव्याचा अवक्षेप बसवून कापड ज्वालारोधी करणे. यांपैकी अगदी साधी कृती पुढील होय. १०% कॅल्शियम क्लोराइड असलेल्या कोमट विद्रावात कापड चिंब भिजवून नंतर ते पिळून, त्याच्यातील विद्राव काढून टाकतात. नंतर ते कापड १०%  सोडियम फॉस्फेटाच्या गरम विद्रावातून हळूहळू सरकत जाऊ दिले जाते व नंतर ते पिळून वाळविले जाते. या प्रक्रियेत कापडाच्या धाग्यात कॅल्शियम फॉस्फेट अवक्षेपित होते. या प्रक्रियेला ‘ग्रोव्ह-पामर-प्रक्रिया’ म्हणतात.