पावसाळ्यात सहज आढळणारी ही वनस्पती तीन पानांच्या रचनेमुळे व पिवळ्या फुलांमुळे चटकन लक्षात येते. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ऑक्झॅलिस कॉर्निक्युलेटा असे आहे.
शास्त्रीय नाव - Oxalis corniculata (ऑक्झॅलिस कॉर्निक्युलेटा)
कूळ - Oxalidaceae ऑक्झॅलिडीएसी
अन्य नावे :
Indian Sorrel (इंग्रजी))
चांगेरी (मराठी-हिंदी)
त्रिपत्रिका, तिनपतिया (हिंदी)
ही वनस्पती ‘आंबुटी’, ‘आंबोती’, ‘चांगेरी’ अशा विविध नावाने ओळखलली जाते. हिला इंग्रजीमध्ये इंडियन सॉरेल असे म्हटले जाते. ही वनस्पती प्रामुख्याने ओलसर जागी, जसे की बोर मध्ये बगीच्यात, हरळीत तसेच कुंड्यांतून वाढणारे एक तण आहे. ही वर्षायू वनस्पती असून महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. हिचे खोड, नाजूक गोलाकार पसरत वाढणारे, लोमश असून, खोडाच्या पेरांपासून नवीन तंतुमय मुळे उगवतात. हिची पाने संयुक्त, एकाआड एक, त्रिपर्णी असतात. एकूण तीन पर्णिका, त्रिकोणी आकाराच्या असून, १.२ ते २.५ सें.मी. लांबीच्या उलट्या हातासारख्या दिसतात. फुले, पिवळी, नियमित, द्विलिंगी असून पानाच्या बगलेतून येतात. हिची फळे बोंडवर्गीय, लांबट-गोलाकार, रेषाकृती, पंचकोनी, लोमश, चंचुयुक्त असून यातील बिया अनेक, अंडाकृती, आडवे पट्टे असलेल्या, करड्या-तपकिरी रंगाच्या असतात.[१]
ही वनस्पती आयुर्वेदानुसार गुणाने रूक्ष आणि उष्ण असते. ही पचनास हलकी असून, भूकवर्धक असते. गुणांनी रोचक, दीपन, पित्तशामक, दाहप्रशमन, रक्तसंग्राहक, शोथघ्न असते. आंबुशीच्या अंगरसाने धमन्यांचे संकोचन होऊन रक्तस्राव बंद होतो. कफ, वात आणि मूळव्याध आदी विकारात तसेच आमांश, अतिसार, त्वचारोग आणि चौघारे तापात, घृत गुदभ्रंश, योनिभ्रंशात उपयुक्त आणि गुणकारी आहे.[१]