कानफाटे
कानफाटे हे नाथपंथी जोगी आहेत. ज्या पंथात मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ आणि निवृत्तीनाथ यांसारखे असामान्य पुरुष ज्या पंथात होऊन गेले, त्या पंथातील हे जोगी. हे, कानाच्या पाळ्या चिरून त्यात स्फटिकाच्या, लाकडाच्या किंवा हाडाच्या कड्या अडकवून, गोपीचंदाची व भर्तृहरीची गाणी म्हणत गावोगाव भीक मागत फिरत असतात. ते कमरेला साखळी व लंगोट, आणि अंगावर वाघाचे कातडे पांघरतात. त्यांच्या पायात खडावा असतात. हातात त्रिशूळ असतो. काही कानफाटे डमरूही बाळगतात. म्हणून त्यांना डौरी (डमरू) गोसावी (डवऱ्या गोसावी) म्हणतात. भिक्षा मागताना ` ते ‘आलख' व `आदेश' असे ओरडतात. ते कुका नावाचे एकतारी वाद्यही वाजवतात.
कानफाटे सर्व भारतभर पसरलेले आहेत. गुजराथमधील कच्छच्या रणात, तसेच कर्नाटकात व महाराष्ट्रात त्यांची विशेष वस्ती आहे. ते जातपात मानीत नाहीत. ते मद्य पितात आणि मांसाहार करतात. त्यांतले काही मठांत राहतात. कानफाटे हे कालभैरवाची व भैरवनाथाची उपासना करतात. गोरखनाथाचा आजेगुरू आदिनाथ याने या पंथाची स्थापना केली, असे कानफाटे सांगतात.