स्नेहप्रभा प्रधान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्नेहप्रभा प्रधान (जन्म : बहुधा [इ.स.१९२०][ संदर्भ हवा ]; - डिसेंबर ७, इ.स. १९९३ या एक मराठी नाट्यसिने अभिनेत्री, गायिका आणि लेखिका होत्या. त्त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलराव प्रधान आणि आईचे ताराबाई प्रधान. वयाच्या पहिल्या दहा वर्षांपर्यंतचे त्यांचे बालपण नागपूर, पुणे, मुंबई, कलकत्ता, लाहोर आणि अन्य शहरांत गेले. परिणामी १८ वर्षाच्या होईपर्यंत त्यांना चार भाषा अस्खलित बोलता येऊ लागल्या. त्यांना कुत्र्या-मांजराचे आणि अन्य प्राण्यांचे खूप प्रेम होते. आपण डॉक्टर बनावे अशी त्यांची फार इच्छा होती. पण त्यांना कॉलेजमध्ये जाण्याचे सुख मिळाले नाही. वडिलांनी कुटुंबाचा त्याग केलाआणि स्नेहप्रभा प्रधानांची सर्व जबाबदारी त्यांच्या सतत आजारी असणाऱ्या आईवर पडली. अशा वेळी त्यांचे कुटुंबस्नेही व बॉम्बे टॉकीजचे चित्रपट निर्माते चिमणभाई देसाई मदतीला धावले आणि स्नेहप्रभा प्रधानांची चित्रपटांतील अभिनयाची कारकीर्द सुरू झाली.

स्नेहप्रभा प्रधान यांना १९४०मध्ये प्रकाशित झालेल्या ’सजनी’, ’सिव्हिल मॅरेज’ आणि ’सौभाग्य’ या चित्रपटांत चिमणभाई देसाईंच्या ओळखीमुळे कामे करायला मिळाली. त्याच वर्षी किशोर शाहू यांच्या नायिका म्हणून स्नेहप्रभा प्रधान यांना बॉम्बे टॉकीजच्या ’पुनर्मिलन’ या चित्रपटात भूमिका मिळाली. चित्रपटात त्यांनी गायलेले ’नाचो नाचो प्यारे मन के मोर’ हे गाणे अफाट गाजले. किशोर शाहू त्यांच्या प्रेमात पडले, त्यांचे लग्न झाले पण ते लग्न जेमतेम एक वर्ष टिकले.

२५ डिसेंबर १९४६ रोजी स्नेहप्रभा प्रधान यांच्या आईंचे निधन झाले, आणि स्नेहप्रभाबाई पूर्णपणे खचल्या. त्यांनी एकदा आत्महत्येचाही अपयशी प्रयत्न करून पाहिला. आयुष्यभर समाजसेवा करणाऱ्या, आणि तीही भारतीयांमध्ये साक्षरतेचाचे प्रसार करण्याच्या कार्यक्षेत्रात, आणि ते करताना स्वतःचे सांसारिक जीवन धडपणे न उपभोगता येणाऱ्या आईबाबांची मुलगी असलेल्या स्पष्टवक्त्या आणि कणखर स्नेहप्रभा, मात्र शेवटपर्यंत स्वतंत्र, पुरोगामी आणि बिनधास्त जीवन जगल्या.

इ.स. १९५० च्या सुमारास स्नेहप्रभा प्रधान यांचे डॉ. शिरोडकरांशी लग्न झाले, आणि त्या मुंबईत स्थिरावल्या. त्यांनी पुढची काही वर्षे मराठी नाट्यसेवेसाठी व इतर सामाजिक कार्यासाठी खर्च केली. नंतरची आयुष्याची शेवटची वर्षे ४० वर्षे मात्र, त्यांनी आपले जीवन प्रसिद्धिपराङ्‌मुखपणे व शांतपणे व्यतीत केले.

स्नेहप्रभा प्रधान या मो.ग. रांगणेकर यांच्या नाट्यनिकेतन या नाट्यसंस्थेच्या नाटकांतून कामे करीत.

इ.स. १९९३साली स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन झाले.

स्नेहप्रभा प्रधान यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • पळसाला पानं तीन (ललित लेखसंग्रह)
  • रसिक प्रेक्षकांस सप्रेम (स्नेहप्रभा प्रधान यांच्या भूमिकांचे विश्लेषण करणारे लेख)
  • सर्वस्वी तुझाच (नाटक)
  • स्नेहांकिता (आत्मचरित्र)

स्नेहप्रभा प्रधान यांची भूमिका असलेले चित्रपट[संपादन]

  • पुनर्मिलन (हिंदी-१९४०)(नायक किशोर शाहू)
  • पहिली मंगळागौर (१९४२) (या चित्रपटात लता मंगेशकर यांनी स्नेहप्रभा प्रधान यांच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली होती.)
  • सजनी (हिंदी-१९४०)
  • सिव्हिल मॅरेज (हिंदी-१९४०)
  • सौभाग्य (हिंदी-१९४०)

स्नेहप्रभा प्रधान यांनी गायलेली गाणी[संपादन]

  • नटली चैत्राची नवलाई (चित्रपट: पहिली मंगळागौर, सहगायिका लता मंगेशकर)
  • नाचो नाचो प्यारे मन के मोर(चित्रपट: पुनर्मिलन, कवी प्रदीप)