सुरेशचंद्र नाडकर्णी
डॉ. सुरेशचंद्र गंगाराम नाडकर्णी (इ.स. १९२९ - २२ जुलै, इ.स. २०११:पुणे) हे एक मराठी लेखक, गझलचे अभ्यासक, संगीततज्ज्ञ व प्राणिशास्त्राचे प्राध्यापक होते. ते मर्मज्ञ गझलकार होतेच, शिवाय विविध खेळांचे ते आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त क्रीडासमीक्षक होते. क्रिकेट खेळाडू बापू नाडकर्णी यांचे ते बंधू होत.
डॉ. नाडकर्णी यांचा गझल आणि रुबाई या दोन्ही काव्यप्रकारांचा मुळातून अभ्यास होता. उर्दू काव्यावर त्यांनी पीएच. डी. मिळवली होती. मराठी आणि उर्दू या दोन्ही भाषांत हे दोन्ही काव्यप्रकार विपुल प्रमाणात हाताळलेल्या नाडकर्णी यांच्या रचनांचे ' उंबराचं फूल ' हे पुस्तक, तसेच ' गजल ' हे गजल या काव्यप्रकाराला वाहिलेले पुस्तक प्रसिद्ध आहे. कविवर्य सुरेश भट हे नाडकर्णी यांचे मित्र आणि प्रेरणास्थान होते. उर्दू गझला तर ते खूप आधीपासूनच लिहीत होते. पण भट यांच्या आग्रहामुळेच नाडकर्णी यांनी मराठीत गझला आणि रुबाया लिहिल्या. भटांच्या गजलेची परंपरा नाडकर्णी यांनी समर्थपणे पेलली.
डॉ. सुरेशंद्र नाडकर्णी यांनी पुण्यातील नौरोसजी वाडिया महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभागप्रमुखपदावर दीर्घ काळ काम केले होते. त्यांनी अध्यापनाबरोबरच अनेक विषयांवर संशोधन आणि लेखन केले. नाडकर्णींची अनेक पुस्तके अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहेत. विद्यार्थी दशेपासूनच डॉ. नाडकर्णी हे उत्तम खेळाडू होते. त्यांना क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन, खो-खो, कबड्डी, कुस्ती, मल्लखांब, हॉकी आदी खेळात राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले होते..
साप्ताहिक ’स्वराज्य’मध्ये नाडकर्णी एकेकाळी हिंदी गाण्याचे रसग्रहण लिहीत असत. क्रीडाक्षेत्रातही त्यांनी समीक्षापर लेखन केले. 'क्रीडा ज्ञानकोश' आणि 'ॲथलेटिक्समधील सुवर्णपदकाच्या दिशेने' या ग्रंथातून त्यांनी भारतीय क्रीडाक्षेत्राची वेगळी दखल घेतली होती.
सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी लिहिलेली पुस्तके
[संपादन]- ॲथलेटिक्समधील सुवर्णपदकाच्या दिशेने
- अज्ञाताचे विज्ञान (मुळात लेखमालिका)
- उंबराचं फूल (कवितासंग्रह)
- क्रीडा ज्ञानकोश
- गझल
- नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी
- पृथ्वीवर माणूस उपराच! (२००४) (ह्या पुस्तकातले लेख ’सकाळ’मध्ये क्रमशः येत होते.)
- बहुरंग (लेखसंग्रह, प्रकाशन २६-५-२०१५)
- मुलगा वयात येतो
- सदानंद : सुखी माणसाचा सदरा