दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे विद्यार्थी साहित्य संमेलन
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि मिरज पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मिरजेत २५ डिसेंबर २०१३ रोजी.एक विद्यार्थी साहित्य संमेलन झाले. हे या संस्थांनी भरविलेले या प्रकारचे पहिलेच साहित्य संमेलन होते. संमेलनाध्यक्षपदी पेठ शिवापूर येथील पेडणेकर हायस्कूलची नववीतील विद्यार्थिनी, बालकवयित्री रमीजा जमादार ही होती.
संमेलनात कथाकथन, कविसंमेलन आणि प्रदर्शने झाली.
कथाकथन सत्राच्या अध्यक्षपदी रोहित पाटील हा काकडवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी होता. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील चार कथालेखकांनी आपआपल्या कथा सादर केल्या. कथाकथनानंतर गोविंद गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्या दिवशी दुपारी तीन वाजता कविसंमेलन झाले. बालकवयित्री गायत्री पाटील ही बिसूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी होती. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सुमारे साठ बालकवींनी आपाअपल्या कविता संमेलनात सादर केल्या. कविसंमेलनानंतर कवी विठ्ठल वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
संमेलनस्थळी बालभारतीच्या पुस्तकातील चित्रे ज्यांनी काढली ते चित्रकार अशोक जाधव, यांच्या पिंपळाच्या पानांवर काढलेल्या व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन, काष्ठशिल्पांचे प्रदर्शन व गांधीनगर जिल्हा परिषद शाळेतील चित्रकला-शिक्षक संतोष पाटील यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या शिवाय, चित्रप्रदर्शनांत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी रचलेल्या कवितांची सचित्र मांडणी करण्यात आली होती.
३रे विद्यार्थी साहित्य संमेलन मिरज जवळच्या कर्नाळ हायस्कूलमध्ये ३-१-२०१६ला झाले. संमेलनाध्यक्ष डिग्रजमधील यशवंतराव माध्यामिक विद्यालयाची सिमरन जमादार ही विद्यार्थिनी होती.