Jump to content

विकिपीडिया:मासिक सदर/जून २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कारगिल युद्धाची व्याप्ती व परिसीमा
कारगिल युद्धाची व्याप्ती व परिसीमा

कारगिल युद्ध हे भारतपाकिस्तान यांच्या दरम्यान १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगील व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकार्‍यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले. १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगीलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिलद्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले.

हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्‍कृष्ट उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला. हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष हे युद्ध कसेकसे पुढे चालले आहे याकडे होते. परंतु भारताने हे युद्ध कारगीलपुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. म्हणूनच, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला व याउलट, सैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला. या युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केली. तर पाकिस्तानात राजकीय अस्थिरता माजली. परिणामी, काही महिन्यांतच (ऑक्टोबर ९९ मध्ये) पाकिस्तानात जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली.

पुढे वाचा...