वाळूक
वाळूक (द्विनाम पद्धती:कुकुमिस मेलॉन, कुकुमिस प्युबिसिंस) (इतर नावे:चिबूड, शेंदरी, शेंदाड, छेन्नी, मगं)[१][२] हे कुकर्बिटेसी (कर्कटी) कुटुंबातील एक फळ आहे. ही एक जंगली वार्षिक वेल वर्गीय वनस्पती आहे, जी पावसाळ्यात आपोआप उगवते किंवा हीची बियांद्वरे लागवड केली जाते.
ही प्रजाती दुष्काळास सहनशील आहे आणि कमी पाऊस आणि उष्ण हवामानात चांगली वाढते. पावसाळ्याच्या सुरुवातीस शेतीच्या बांधावर असलेल्या मातीतील सुप्त रूपातील बियाण्यातून उगवते. सहसा शेताच्या बांधावर अथवा घरावर हिला वाढवले जाते.
कुकुमिस मेलॉन हा खरबुजाशी मिळताजुळता एक प्रकार असून तो खरबुजापेक्षा अधिक चिवट आहे. याची लागवड भारतात सर्वत्र होते. त्याचे दोन प्रकार असून एक पावसाळी हंगामात व दुसरा उन्हाळी हंगामात लावतात. शेंदाडाचे फळ आखूड, गुळगुळीत, अंडाकार किंवा दंडगोलाकार तसेच सु. ३०–६० सेंमी. व ७·५–१५ सेंमी. व्यासाचे असते. ते बरेचसे काकडीसारखे दिसते. कोवळे फळ गर्द हिरवे असून पिकल्यावर लिंबासारखे पिवळे होते व आपोआप फुटते. त्याचा गर पिठूळ, काहीसा बेचव व थोडासा आंबट असतो. बिया लहान असतात. अन्य शारीरिक लक्षणे कुकर्बिटेसी (कर्कटी) कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात.[३]
पावसाळी लागवड मे–जुलैमध्ये व उन्हाळी लागवड जानेवारी–मार्चमध्ये करतात. वेल जमिनीवर पसरू देतात. लागवडीनंतर ३-४ महिन्यांत फळे पक्व होतात. फळांचे हेक्टरी ७ ते ८ हजार किग्रॅ. उत्पन्न येते. पक्व फळे खरबुजाप्रमाणे खातात वा कोवळ्या फळांची भाजी करतात. काकडीप्रमाणेच याचे किडीपासून रक्षण करतात.[३]
फळांचा आकार, रंग, गुणवत्ता आणि चव यामध्ये प्रचंड वैविध्य असलेले मिश्र पीक म्हणूनही याची लागवड केली जाते. काकडी वर्गातील असल्याने पाणीदार लगदा किंवा गर यात असल्यामुळे फळांचे शेल्फ लाइफ कमी असते. पिकलेल्या फळांचा लगदा गोड आणि रसाळ असतो. तर कच्ची फळे कडू आणि तुरट असतात. पिकलेली फळे सहसा काकडी प्रमाणे ताजी वापरली जातात. याचा वापर फळ म्हणून अथवा जेवणातून सांबार, लोणची, सॅलड म्हणून अथवा मीठ लावून खाण्यासाठी केला जातो.[२]