शेतकऱ्यांचा उठाव (इंग्लंड)
major uprising across large parts of England in 1381 | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | peasant revolt, rebellion | ||
---|---|---|---|
स्थान | इंग्लंड | ||
तारीख | नोव्हेंबर, इ.स. १३८१ | ||
आरंभ वेळ | मे ३०, इ.स. १३८१ | ||
शेवट | नोव्हेंबर, इ.स. १३८१ | ||
| |||
शेतकऱ्यांचा उठाव, पेझंट्स रिव्हॉल्ट तथे वॉट टायलरचे बंड हा १३८१ साली इंग्लंडच्या अनेक भागांमध्ये राजा दुसऱ्या रिचर्डविरुद्ध झालेला एक मोठा उठाव होता. १३४० च्या दशकात काळ्या प्लेगमुळे निर्माण झालेले सामाजिक-आर्थिक आणि राजकीय तणाव, शंभर वर्षांच्या युद्धादरम्यान फ्रांसशी झालेल्या संघर्षामुळे निर्माण झालेला उच्च कर आणि लंडनच्या स्थानिक नेतृत्वातील अस्थिरता, इ. या बंडाची विविध कारणे होती.
३० मे, १३८१ रोजी एसेक्समध्ये शाही अधिकारी जॉन बॅम्प्टनचा हस्तक्षेप हे बंड उसळण्याचे कारण होते. ब्रेंटवूड गावात अद्याप न भरलेला कर गोळा करताना त्याची नागरिकांशी बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यवसान हिंसक संघर्षात झाले. लगेचच हिंसाचार देशाच्या आग्नेय भागात वेगाने पसरला. अनेक स्थानिक कारागीर आणि ग्राम अधिकाऱ्यांसह ग्रामीण समाजाचा मोठा भागाने शस्त्रांनिशी हल्ले करून न्यायालयाच्या नोंदी जाळल्या आणि स्थानिक तुरुंग उघडले. बंडखोरांनी कर आकारणी कमी करणे, दासत्व संपवणे आणि राजा दुसऱ्या रिचर्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी आणि न्यायालये काढून टाकण्याची मागणी केली.
कट्टरपंथी धर्मगुरू जॉन बॉल यांच्या प्रवचनाने प्रेरित होऊन आणि वॅट टायलरच्या नेतृत्वाखाली केंटिश बंडखोरांची तुकडी लंडनवर चालून गेली. त्यांना राजाचे प्रतिनिधी ब्लॅकहीथ येथे भेटले पण हल्लेखोरांना परतवण्यास ते अयशस्वी ठरले. १४ वर्षांच्या रिचर्डने टॉवर ऑफ लंडन मध्ये आसरा घेतला. या वेळी बहुतेक शाही सैन्य परदेशात किंवा उत्तर इंग्लंडमध्ये होते.
१३ जून रोजी बंडखोरांनी लंडनमध्ये प्रवेश केला. अनेक स्थानिक शहरवासी त्यांना सामील झाले व त्यांनी तुरुंगांवर हल्ला केला, सॅवॉय पॅलेस नष्ट केला आणि अनेक इमारतींना आग लावली. या दरम्यान आडवे आलेल्या किंवा दिसलेल्या राजाला धार्जिण्या लोकांना ठार मारले. दुसऱ्या दिवशी, रिचर्ड माइल एंड येथे बंडखोरांना भेटला आणि त्यांच्या गुलामगिरी रद्द करण्यासह बहुतेक मागण्या मान्य केल्या. दरम्यान, बंडखोरांनी टॉवर ऑफ लंडन मध्ये प्रवेश केला आणि तेथे आसरा घेतलेल्या सायमन सडबरी आणि रॉबर्ट हेल्स यांची हत्या केली.
१५ जून रोजी, रिचर्ड स्मिथफील्ड येथे टायलर आणि बंडखोरांना भेटण्यासाठी शहराबाहेर आला. तेथे रिचर्डच्या सैनिकांनी टायलरचा खून केला. रिचर्डने बंडखोरांना थोपवून धरलेले असताना लंडनचे महापौर विल्यम वॉलवर्थनी शहरातून एक शिबंदी गोळा करून बंडखोर सैन्याला पांगवले. रिचर्डने ताबडतोब लंडनमध्ये पुन्हा व्यवस्था प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आणि बंडखोरांना दिलेला शब्द फिरवला. हे बंड पूर्व अँग्लियामध्येही पसरले होते. तेथे केंब्रिज विद्यापीठावर हल्ला झाला आणि अनेक राजेशाही अधिकारी मारले गेले. २५ किंवा २६ जून रोजी हेन्री डिस्पेंसरने नॉर्थ वॉल्शॅमच्या लढाईत बंडखोर सैन्याचा पराभव करून शांतता कायम केली. उत्तरेला यॉर्क, बेव्हरली, आणि स्कारबोरो आणि पश्चिमेला सॉमरसेटमधील ब्रिजवॉटरपर्यंत बंडाचे लोण पसरले होते. रिचर्डने ४,००० शिबंदी गोळा करून बंडखोरांचा पाठलाग केला. त्यांच्यातील नेत्यांना शोधून काढून त्यांचा वध करण्यात आला. नोव्हेंबरपर्यंत, किमान १,५०० बंडखोर मारले गेल्यावर हे बंड शांत झाले.