Jump to content

डफरिन (जहाज)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डफरिन : सागरी व्यापाराला आवश्यक असे नाविक प्रशिक्षण देणारे पहिले जहाज. १९२७ ते १९७२ या काळात ते वापरात होते. १९४८ सालानंतर अभियांत्रिकी प्रशिक्षणाची सोय कलकत्ता येथील सागरी अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आली. डफरिनची कार्यक्षमता संपल्याने १६ एप्रिल १९७२ पासून त्यास बाद करण्यात आले व त्याऐवजी नवे प्रशिक्षण जहाज राजेंद्र हे वापरात आले. जानेवारी १९७६ मध्ये डफरीन जहाजाचा लिलाव करण्यात आला.भारतीय पुढाऱ्यांनी १९२२–२८ या काळात हिंदी व्यापारी नौदलाच्या विकासासाठी त्या वेळच्या कायदेमंडळात ठराव-चर्चाद्वारे बरीच खटपट केली. परिणामतः ब्रिटिश सरकारने ५ ऑक्टोबर १९२७ रोजी डफरिन (बांधणीवर्ष १९०४–०५) जहाजावर नाविक प्रशिक्षणाची सोय केली. मुळात डफरीन हे सैनिक-वाहतुकी जहाज होते. कॅप्टन सेयर हे पहिले कॅप्टन-सुपरिटेंडंट होते. १९३० साली हार्व्ही यांच्या कारकीर्दीत अधिकाऱ्यांची पहिली तुकडी तयार झाली. ॲड्‌मिरल रामदास कटारी, अजितेंदू चक्रवर्ती, भास्कर सोमण, सदाशिव करमरकर व सॅम्सन या सुप्रसिद्ध नाविक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण डफरीनवर झाले. हार्व्हीनंतर डफरिनच्या प्रमुखपदी नेमलेले कॅप्टन हजारी हे पहिले भारतीय होत. १९२७–७२ या काळात मुंबईच्या माझगाव धक्क्यापाशी डफरीनने नांगर टाकला होता. या काळात २,२५७ भारतीय व १२३ परदेशी उमेदवारांनी तेथे प्रशिक्षण घेतले. पंचम जॉर्ज यांनी डफरिनमधील ज्या टेबलावर भोजन केले होते, ते टेबल आता मुंबईच्या लालबहादूर शास्त्री नॉटीकल कॉलेजमध्ये डफरिनची एक स्मृती म्हणून जतन करण्यात आले आहे. इतर खलाशी व सारंग यांच्या प्रशिक्षणासाठी भद्र (कलकत्ता), मेखला (विशाखापटनम्), आणि नवलाक्षी (गुजरात) या नाविक जहाजशाळा आहेत.

संदर्भ

[संपादन]

Government of India, The Publication Division, The Story of the Dufferin, Delhi, 1956.