Jump to content

उत्तेजनक्षमता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जिवंत स्थितीत जीव आणि त्यांच्या शरीराचे भाग सभोवतालच्या परिस्थितीत होणाऱ्या बदलांना अनुसरून प्रतिक्रिया व्यक्त करतात. परिस्थितीतील बदल उद्दीपकाचे कार्य करतात आणि त्यांना अनुसरून जीव योग्य ती अनुक्रिया व्यक्त करतात. परिस्थितीतील भौतिक किंवा रासायनिक फेरबदलांना अनुसरून आंतरिक बदलांच्या योगाने त्यांना उत्तर देण्याचे जीवांच्या अंगी जे सामर्थ्य असते, त्याला उत्तेजनक्षमता म्हणतात. सजीवांची जी काही मुख्य लक्षणे आहेत त्यांपैकी उत्तेजनक्षमता हे एक आहे. उद्दीपन बाह्य अथवा आंतरिक असते. उष्णता, प्रकाश, आर्द्रता, दाब किंवा स्पर्श ही बाह्य उद्दीपनाची काही उदाहरणे होत. आंतरिक उद्दीपन प्राण्याच्या शरीरातच उत्पन्न होणारे असते. या गुणधर्मापासूनच प्राण्यांची काही विस्मयजनक विशेष लक्षणे उत्पन्न झाली आहेत. विविध प्रकारच्या बाह्य उद्दीपनांना प्राणी वेळोवेळी ज्या प्रतिक्रिया व्यक्त करतात, त्या सगळ्यांना मिळून प्राण्यांचे वर्तन म्हणतात. अर्थात कोणत्याही प्राण्याचे वर्तन उत्तेजनक्षमतेमुळेच शक्य होते. उत्तेजनामुळे (उद्दीपन-उत्तर प्रतिक्रिया) सबंध प्राणी कोणते तरी कार्य करतो अथवा त्याच्या शरीराचा एखादा भाग कार्यान्वित होतो. उदा., प्राण्याचे धावणे, त्याच्या एखाद्या स्नायूचे संकुचन होणे, एखाद्या ग्रंथीपासून स्राव होणे इ. प्रतिक्रियेच्या व्याप्तीचे प्रमाण उद्दीपनाच्या कमी अधिक तीव्रतेवर सामान्यतः अवलंबून नसते वस्तुतः उद्दीपनाच्या वेगवेगळ्या तीव्रतेला प्राण्यांकडून अगदी भिन्न प्रकारची उत्तरे मिळतात. सामान्यतः परिस्थितीच्या बदलाला प्राणी जी प्रतिक्रिया व्यक्त करतो ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्राण्याला उपयुक्त अशीच असते, अथवा थोडे वेगळ्या प्रकाराने सांगावयाचे तर असे म्हणता येईल की, ती अनुकूली असते. गती किंवा संचलन जरी सामान्यतः उद्दीपनामुळे घडून येत असले, तरी गती किंवा गतीचा अभाव जिवंतपणाचे गमक होऊ शकत नाही. कारण वारा, लाटा, मोटारगाडी इ. निर्जीव पदार्थांना गती असते, तर शीतसुप्तीत (हिवाळ्यात अंशतः किंवा पूर्णपणे निष्क्रिय अवस्थेत) असणारे प्राणी व बिया गतिहीन असतात.

सर्व जीवद्रव्य थोडेफार उत्तेजनक्षम उत्तेजनक्षम असते, परंतु प्राणि-जीवनाची एकेक पायरी चढून आपण जसजसे वर जाऊ लागतो तसतसे सामान्य संवेदनक्षमतेच्या भरीला, गुंतागुंतीची रचना असणाऱ्या प्राण्यांच्या शरीरातील काही कोशिकांचे (पेशींचे) केवळ या कार्याकरिताच विशिष्टीकरण होऊन त्यांची तंत्रिका तंत्रे (मज्जा संस्था) तयार होतात. विलगित (अलग असलेल्या) तंत्रिका-कोशिका अथवा त्यांचे समूह यांच्यापासून तो उच्च पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेले) प्राणी अथवा मनुष्य यांत आढळणाऱ्या अत्यंत गुंतागुंतीच्या रचनांपर्यंत सर्वांचा या तंत्रांत समावेश होतो. पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की, उच्च कोटीतील प्राण्यांच्या तंत्रिका तंत्रीय सक्रियता (हालचाली) जीवद्रव्याच्या अशाच सक्रियतांसारख्या पण शीघ्र गतीने होणाऱ्या आणि तीव्र प्रतिक्रिया असतात.