जम्मू विद्यापीठ
जम्मू विद्यापीठ हे जम्मू व काश्मीर राज्यातील एक विद्यापीठ. पूर्वी जम्मू व काश्मीर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विद्यापीठाची दोन स्वतंत्र विद्यापीठे करण्यात आली, त्यापैकी एक. याची स्थापना जम्मू येथे १९६९ मध्ये झाली. याचे क्षेत्र जम्मूप्रांतापुरते मर्यादित असून त्यात जम्मू, उधमपूर, दोडा, कथुआ, पूंछ आणि राजौरी हे जिल्हे समाविष्ट होतात. विद्यापीठात दोन घटक महाविद्यालये असून १२ इतर महाविद्यालये संलग्न आहेत. विद्यापीठात मानव्यविद्या, भौतिकशास्त्रे, वाणिज्य, विधी, आयुर्वेद, वैद्यक, ललितकला, संगीत, पौर्वात्य भाषा वगैरे विषयांच्या विद्याशाखा आहेत. या विद्यापीठाचे वैशिष्ट्य म्हणजे ५०% गुणांचे अंतर्गतरीत्या मूल्यमापन केले जाते. त्रिवर्षीय अभ्यासक्रम येथे पाठनिर्देशांसह सुरू केला आहे.
विद्यापीठाचे संविधान इतर विद्यापीठांप्रमाणेच असून सवेतन कुलगुरू हाच सर्व विद्यापीठीय प्रशासनाचा प्रमुख असतो. त्याची नियुक्ती दर चार वर्षांनी केली जाते. विद्यापीठाचे वार्षिक उत्पन्न १९७१–७२ मध्ये ३२·४५ लाख रुपये होते. १९७१–७२ मध्ये ८,८६७ विद्यार्थी विद्यापीठात शिकत होते.