Jump to content

तोडा म्हैस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तोडा म्हैस ही तामिळनाडू राज्यातील निलगिरी टेकड्यांच्या टापूमधील म्हशींची एक विशिष्ट जात असून तेथील तोडा या आदिवासी जमातीच्या सांस्कृतिक जीवनामध्ये विशेषतः जन्म, मृत्यू, लग्नकार्य इ. प्रसंगांच्या वेळी या अभिजातीच्या म्हशींना महत्त्व आहे. म्हशीची ही जात जास्त पाऊस आणि जास्त आर्द्रता असलेल्या भागात चांगली वाढते. भारतीय द्वीपकल्पातील इतर म्हशींपेक्षा दिसायला ह्या अगदी वेगळ्या आहेत. शरीर (धड) लांब असून त्यांची छाती विस्तृत व भरदार असते. पाय आखूड पण मजबूत असतात व त्या चांगल्याच ताकदवान असतात. शिंगे लांब आणि अर्धगोलाकार आकारात बदलणारी असतात. शिंगे पायथ्याशी जाड असून प्रथम बाहेरच्या दिशेने वळून, थोडेसे खालच्या दिशेने जातात आणि वरच्या दिशेने बाहेर पडतात. शेवटी शिंगाचे टोक आतील बाजूस वळलेले असतात ज्यामुळे शिंगांचा वैशिष्ट्यपूर्णपणे चंद्रकोर आकार किंवा अर्धवर्तुळ बनतो. बछडे सामान्यतः जन्माच्या वेळी भुरकट रंगाचे असतात आणि सुमारे दोन महिन्यांच्या वयात, बछड्यांचा रंग राखाडी रंगात बदलतो. प्रौढ म्हशींमध्ये, कातडीचा मुख्य रंग भुरकट आणि राखाडी असतो. या म्हशींच्या मानेवर, वशिंडाच्या जागी (यांना वशिंड जवळजवळ नसतेच) व पाठीच्या कण्याजवळ आयाळीप्रमाणे दाट केस असतात, त्यामुळे त्या गव्यासारख्या दिसतात. दाट केसांचा एक अरुंद पट्टा मानेच्या शिखरापासून शेपटीच्या उगमस्थानापर्यंत वरच्या ओळीला झाकत जातो. यांचा स्वभाव तापट व खुनाशी असतो. वन्य म्हशीप्रमाणे या माणसावर चाल करून जातात. या म्हशी ८.२२% च्या सरासरी फॅटसह दिवसाला ४·५ ते ७ किग्रॅ. दूध देतात.[][]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "म्हैस". मराठी विश्वकोश. ६ मे २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "Toda". dairyknowledge.in (इंग्रजी भाषेत). ६ मे २०२२ रोजी पाहिले.

बाह्य दुवा

[संपादन]