Jump to content

ना.वा. टिळक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ना.वा. टिळक
जन्म नाव नारायण वामन टिळक
जन्म ६ डिसेंबर, इ.स. १८६१
करजगाव, रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ९ मे, इ.स. १९१९
जे. जे . रुग्णालय , भायखळा , मुंबई
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी
वडील वामन सखाराम टिळक
आई जानकीबाई वामन टिळक
पत्नी लक्ष्मीबाई नारायण टिळक
अपत्ये देवदत्त नारायण टिळक
टीपा नारायण वामन टिळक यांचा जीवनप्रवास BBC article

नारायण वामन टिळक (जन्म - ६ डिसेंबर, इ.स. १८६१ - ९ मे, इ.स. १९१९) हे मराठी लेखक होते.

बालपण

[संपादन]

नारायण वामन टिळक उर्फ रेव्हरंड टिळक यांचा जन्म रत्‍नागिरी जिल्ह्यातील करजगाव येथे दि. ६ डिसेंबर, इ.स. १८६१ रोजी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या जन्माची वेळ, तिथी वगैरे पाहून वडील वामनराव यांना हा मुलगा अपशकुनी वाटला आणि त्यांनी तसे बोलूनही दाखविले. त्यामुळे वडिलांनी कायमच तुच्छतेची वागणूक दिल्याने ना. वा. टिळकांना या प्रकारास हिंदू विचारच कारणीभूत असल्याची समजूत झाली. मुळात ना. वा. टिळक अतिशय हुशार, एकपाठी व तीक्ष्ण बुद्धीचे होते. ते मराठी, संस्कृत, हिंदी आणि इंग्लिश या भाषांचे जाणकार होते. त्यांचा फलज्योतिष, आयुर्वेद या विषयांचाही अभ्यास होता. ते शीघ्रकवी होते.

जीवन

[संपादन]

वयाच्या १५ व्या वर्षी टिळकांचा विवाह मनकर्णिका नारायण गोखले यांच्याशी झाला. (लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई नारायण टिळक असे झाले. लक्ष्मीबाई आपल्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत). टिळकांनी आयुष्यभरात अनेक ठिकाणी वास्तव्य केले, ठिकठिकाणी शाळा काढल्या. पण एका गावी कायमचा मुक्काम केला नाही. नागपूर येथे श्रीमंत अप्पासाहेब बुटी यांच्या आश्रयाने राहत असतांना त्यांच्या मासिकासाठी संपादक म्हणूनही टिळकांनी काम केले. एकदा रेल्वेने प्रवास करीत असतांना एका ख्रिस्ती माणसाने टिळकांना बायबल वाचायला दिले. गाडीत वेळ जावा या उद्देशाने टिळकांनी तो ग्रंथ वाचला. बायबल वाचून टिळक फारच प्रभावित झाले. दि. १० फेब्रुवारी इ.स. १८९५ या दिवशी टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.

इ.स. १८९५ पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत २४ वर्षे टिळकांनी ख्रिश्चन धर्मप्रसारक म्हणून काम केले. या काळात त्यांनी १००हून अधिक भक्तिगीते, ओव्या व अभंगांची रचना केली. त्यांनी एकूण २,१००हून अधिक कविता रचल्या आणि ख्रिस्तायन नावाचे महाकाव्यही लिहिले. ते उत्तम वक्ता होते ते ख्रिश्चन धर्मावर कीर्तने करीत.

दि. ९ मे इ.स. १९१९ रोजी टिळकांचे निधन झाले.

रेव्ह. ना.वा. टिळकांचे लेखन

[संपादन]
  • दशावतारी नाटकांसाठी काही आख्याने आणि पदे
  • सं. गोदुःख विमोचन (हे मराठीतले आद्य पथनाट्य)
  • शीलं परं भूषणम्‌ (विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले नाटक)
  • स्व-राज्य हे खरे स्वराज्य
  • स्वराज्य आणि स्त्रिया (ख्रिस्ती मुलींसाठी लिहिलेली नाटुकली)
  • ख्रिस्तायन (महाकाव्य)

सन्मान

[संपादन]

रेव्ह. टिळक हे मुंबईत १९१५ भरलेल्या ११व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते.