ग्रहणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लघ्वांत्राच्या (लहान आतड्याच्या) पहिल्या भागाला ‘ग्रहणी’ म्हणतात. हा भाग सु. २५ सेंमी. लांब असून तो लघ्वांत्राचा सर्वांत लहान आणि सर्वांत जाड भाग आहे. ग्रहणी उदराच्या पश्चभित्तीला घट्ट बांधल्यासारखी असून तिला आंत्रबंध (आतड्याला उदराच्या मागच्या भित्तीस बांधणारा उदराच्या आवरणाचा दुहेरी पदर) नसतो. ग्रहणीच्या अगदी थोड्या भागावरच पर्युदराचा (उदरातील इंद्रियांवर पसरलेल्या पडद्यासारख्या भागाचा) थर असतो.

ग्रहणी अपुऱ्या वर्तुळाच्या आकाराची असून त्या वर्तुळाच्या मध्यभागी अग्निपिंडशीर्ष (उदराच्या मागच्या बाजूला असलेल्या मोठ्या व लांबट ग्रंथीचे, स्वादुपिंडाचे डोके) असते. त्या शीर्षाभोवती ग्रहणीचे वेटोळे घट्ट बसविलेले असते. ग्रहणीची सुरुवात जठराच्या खालच्या टोकाशी होऊन ती लघ्वांत्राच्या दुसऱ्या भागाशी म्हणजे रिक्तांत्राशी संपते [→ आंत्र]. ग्रहणीचे चार भाग कल्पिले आहेत.

  1. पहिला किंवा ऊर्ध्व भाग सु. ५ सेंमी. लांब असून तो जठराच्या खालच्या टोकाशी म्हणजे जठरद्वाराशी सुरू होतो. जठर आणि ग्रहणी यांच्या संधिस्थानापाशी जाड स्नायूंचा थर असून त्याला जठरनिर्गमी परिसंकोची (वलयाकार आणि मधील भोक आकुंचनाने बंद करणारा स्नायुभाग) म्हणतात. जठरातील अर्धवट पचलेले अन्न हे परिसंकोची मधूनमधून सैल पडले म्हणजे ग्रहणीत येते. हा ग्रहणीचा पहिला भाग सुरू झाल्याबरोबर उजव्या बाजूकडे आणि मागे पाठीच्या बाजूकडे आडवा जातो. या भागाच्या अग्रभागी पर्युदराचा थर असून पश्चभाग यकृत आणि पित्ताशय यांना टेकलेला असतो.
  2. दुसरा किंवा अधोगामी भाग सु. ८ ते १० सेंमी. लांब असून तो पृष्ठवंशाच्या (पाठीच्या कण्याच्या) उजव्या बाजूने सरळ खाली गेलेला असतो. या भागाची सुरुवात बाकदार असून शेवटीही त्याला बाक येऊन तेथे तिसरा भाग सुरू होतो. या भागाच्या पश्चभित्तीतून पित्ताशय नलिका आणि अग्निपिंड नलिका आत येऊन जेथे उघडतात तो भाग श्लेष्मकलेत (आतड्यातील अस्तरासारख्या थरात) उंचवट्यासारखा कुंभाकार दिसतो. त्याला ‘फाटर कुंभिका’ असे म्हणतात. या भागाच्या पार्श्वपृष्ठाला उजवे वृक्क (मूत्रपिंड) टेकलेले असते.
  3. तिसरा किंवा आडवा भाग सु. १० सेंमी. लांब असून त्याच्या अग्रभागावर पर्युदराचा थर असतो. या भागाचा पश्चभाग पृष्ठवंशावर टेकलेला असतो.
  4. शेवटचा चौथा किंवा ऊर्ध्वगामी भाग सु. २·५ सेंमी. असून तो पुढच्या बाजूकडे वळून रिक्तांत्राला मिळतो. ग्रहणीच्या या चार भागांपैकी पहिल्या म्हणजे ऊर्ध्व भागाची थोडीबहुत हालचाल होऊ शकते. परंतु बाकीचे भाग आजूबाजूच्या अंतस्त्यांना (इंद्रियांना) व पृष्ठवंशाला घट्ट चिकटलेले असतात. पोटात बेरियम देऊन क्ष-किरण चित्र काढले असता ग्रहणी त्रिकोणाकृती दिसते. तिला ग्रहणीशीर्ष असे म्हणतात.


ग्रहणीच्या भित्ती व सूक्ष्मरचना आंत्रासारखीच असते [→ आंत्र].

  • कार्ये : (१) एंझाइमयुक्त (शरीरातील रासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त संयुगाने युक्त असलेल्या) पाचकरसाची निर्मिती, (२) अन्नपदार्थाचे शोषण, (३) जठरातील अर्धवट पचलेले अन्न मधूनमधून ग्रहणीत आल्यावर त्यातील अम्लाचे उभयरोधन (हायड्रोजन आयनांचे म्हणजे विद्युत् भारित अणूंचे प्रमाण कायम ठेवणे) व उदासीनीकरण (अम्लीय गुणधर्म नाहीसे करणे) आणि (४) जठरातून बाहेर पडणाऱ्या अर्धवट पचलेल्या अन्नाच्या ग्रहणीत येणाच्या क्रियेचे नियंत्रण ही होत.
  • विकार :ग्रहणीमध्ये होणाऱ्या विकारांमध्ये ⇨पचनज व्रण (अम्लीय पाचकरसामुळे होणारी जखम) हा प्रमुख आहे. अंकुशकृमी (तोंडात आकड्यासारख्या संरचना असलेल्या कृमी, हूक वर्म) बहुधा ग्रहणीतच असतात [→ अंकुशकृमि रोग]. ग्रहणीमध्ये कर्करोग होत नाही असे सामान्यतः मानले जाते.