चौथी पंचवार्षिक योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ही चौथी भारतीय पंचवार्षिक योजना आहे. ही योजना १ एप्रिल १९६९ ते ३१ मार्च १९७४ या कालावधीत राबविण्यात आली. या योजनेचा मुख्य भर स्वावलंबनावर होता. या योजनेचे घोषवाक्य 'स्थैर्यासह आर्थिक वाढ' हे होते. या योजनेचे उपनाव 'गाडगीळयोजना' असे होते.

प्रतिमान[संपादन]

ॲलन एस. मान आणि अशोकरुद्र यांनी तयार केलेल्या "खुल्या सातत्य प्रतिमानावर" आधारित या चौथ्या योजनेचा आराखडा धनंजयराव गाडगीळ यांनी तयार केला होता. म्हणून या योजनेचे उपनाव गाडगीळ योजना असे ठेवण्यात आले.

खर्च[संपादन]

या योजनेचा प्रस्तावित खर्च १५,९०० कोटी रु. इतका होता आणि वास्तविक खर्च १५,७९९ कोटी रु. एवढा होता. या योजनेच्या प्रस्तावित खर्चापेक्षा वास्तविक खर्च कमी होता.

उद्दिष्ट्ये[संपादन]

या योजनेअंतर्गत एकूण तीन उद्दिष्ट्ये ठेवण्यात आली होती.हते म्हणजे पहिले उद्दिष्ट स्वावलंबन, दुसरे उद्दिष्ट सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ आणि तिसरे उद्दिष्ट समतोल प्रादेशिक विकास हे होते.

कार्यक्रम व प्रकल्प[संपादन]

या योजनेअंतर्गत ४ कार्यक्रम व प्रकल्प सुरू करण्यात आले होते. ते म्हणजे १९७३चा अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम, १९७२ बोकारो पोलाद प्रकल्प, १९७३ मधील भारतीय पोलाद समिती आणि १९७४ ते १९७५ मधील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेला 'लघु शेतकरी विकास अभिकरण'.

योजनेचा घटनाक्रम[संपादन]

या योजनेच्या काळात काही विशेष घटना घडल्या. त्यांचा घटनाक्रम खालील प्रमाणे आहे. १)१९६९ च्या जून महिन्यात '१४ बँकांचे राष्ट्रीयीकरण' करण्यात आले. २)१९७२ मध्ये साधारण विमा व्यवसाय हा कायदा संमत करण्यात आला. ३)१ जानेवारी १९७३ रोजी भारतीय साधारण विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली. ४)१९७३ मध्ये परकीय चलन विनिमय कायदा (FERA) संमत करण्यात आला. ५)१९७३ ते १९७४ मध्ये नियोजन मंडळाने(नीती आयोग) दारिद्र्य रेषेचे मोजमाप कॅलरीच्या स्वरूपात करण्यास प्रारंभ केला.

मूल्यमापन[संपादन]

या योजनेने पहिल्या दोन वर्षात चांगली प्रगती केली मात्र नंतरच्या तीन वर्षात अपयशाचा सामना करावा लागला. या अपयशाची कारणे १९७१ चे भारत - पाकिस्तान युद्ध व बांगलादेशी निर्वासितांचा प्रश्न आणि १९७३चा तेलाचा झटका.