शंकर सारडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शंकर सारडा (जन्म : महाबळेश्वर, ४ सप्टेंबर १९३७; मृत्यू: पुणे, २८ जानेवारी २०२१) हे साहित्यिक आणि समीक्षक होते. दीर्घकाळ साहित्याच्या, समीक्षेच्या क्षेत्रांत घालवल्यावर व पत्रकारिता केल्यावरही त्यांचा 'स्नेहशील' या शब्दाने गौरव होत असे. असे भाग्य फारच थोड्या लोकांना लाभते.

सन १९६८ च्या सुमारास सारडा हे 'साधना'चे अतिथी संपादक होते, तेव्हा त्यांच्या काळात त्यांनी ह.मो. मराठे यांची 'निष्पर्ण वृक्षाखाली' ही कादंबरी प्रकाशित केली. भा.रा. भागवत यांच्या 'फास्टर फेणे'च्या निर्मितीमागे शंकर सारडा यांची प्रेरणा होती. प्रत्येक साहित्य संमेलनाला हजर लावून त्याचे वृत्तांकन करणारा सारडांसारखा पत्रकार विरळाच.

बालसाहित्यिक असल्याने, त्यातून झिरपणारी स्नेहाळ वृत्ती त्यांच्यात होती. इंग्रजी साहित्याचे अभ्यासक अनेकदा देशी साहित्याकडे तुच्छतेने पाहतात; परंतु सारडा यांच्यात ती भावना नव्हती. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या सुरुवातीच्या काळात, रविवारच्या 'मैफल' पुरवणीला आकार देण्यात, साहित्याच्या क्षेत्रात 'मटा'ची नाममुद्रा उमटवण्यात सारडा यांची मोठी भूमिका होती. पुढे त्यांनी विविध विभागीय संमेलने भरवण्यात जो पुढाकार घेतला, ती साहित्यप्रसारकाची भूमिका ही त्यांची मूळ वृत्ती होती. 'महाराष्ट्र टाइम्स'ला सांस्कृतिक पुढारपण मिळवून देण्यात ते एक प्रमुख होते. समीक्षणांना त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. लेखक म्हणून त्यांनी १९५०पासून सातत्याने बालसाहित्य लिहिले.

शंकर सारडा यांचे पहिले पुस्तक संस्कृत पंडित आणि लेखक वि.कृ. श्रोत्रिय यांच्या मार्गदर्शनामुळे प्रकाशित झाले.

सारडा हे पत्रकार, समीक्षक आणि बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध होते. किशोरवयापासूनच त्यांचे लेखन आनंद, बालमित्र, साधना, मुलांचे मासिक यांसारख्या अंकांमधून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली होती. महाराष्ट्र टाइम्सची रविवार पुरवणी, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, साधना, दैनिक देशदूत, लोकमित्र पुरवणी, लोकमत रविवार पुरवणी, ग्रंथजगत अशा विविध वृत्तपत्रांमधील कामाचा त्यांचा दीर्घ अनुभव आहे. विशेषतः महाराष्ट्र टाइम्सच्या पुरवणीतून सारडा यांनी ‘चक्र,’ ‘माहीमची खाडी,’ ‘वासुनाका’ अशा पुस्तकांवर लिहिलेला विस्तृत लेख आणि इतरही महत्त्वाच्या कविता-कादंबऱ्यांची केलेली परीक्षणे गाजली होती. ‘मटा’ सुरू झाल्यानंतर त्याचं रूप घडवण्यात संपादक द्वा. भ. कर्णिकांना सारडा यांची चांगलीच साथ लाभली होती. त्यांनी सुरुवातीच्या काळात सदानंद रेगे, वसंत बापट, वा. ल. कुलकर्णी यांच्यासारख्यांना ‘मटा’शी जोडण्याचं महत्त्वाचे काम केले होते.

सारडा यांनी ६०हून अधिक पुस्तके लिहिली असून, दोन हजांराहून जास्त पुस्तकांचे समीक्षण केले आहे. टॉल्स्टॉय, गिबन यांसारख्या प्रख्यात लेखकांच्या कादंबऱ्यांचा त्यांनी अनुवाद केला आहे.

साहित्य संमेलने[संपादन]

शंकर सारडा यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या मुख्य संमेलनाखेरीज अन्य विभागीय संमेलने भरवण्याचे प्रघात पाडले. महाबळेश्वर येथील विभागीय साहित्य संमेलन, महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अधिवेशन, सातारा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पहिले अभिजात साहित्य संमेलन, अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, वेदगंगा ग्रामीण साहित्य संमेलन व अंकुर साहित्य संमेलनांचे आयोजन त्यांनी केले.

महाबळेश्वरला होणाऱ्या साहित्य संमेलनाध्यक्षाच्या निवडणणुकीत आनंद यादव पहिले आले आणि शंकर सारडा दुसरे. आनंद यादव यांच्या एका संतसूर्य तुकाराम या कादंबरीतील तुकारामाबद्दल केलेल्या तथाकथित आक्षेपार्ह विधानाबद्दल त्यांना आरोपी ठरवून अध्यक्ष होऊ दिले नाही. त्यावेळी महाबळेश्वराचे भूमिपुत्र म्हणूम शंकर सारडांचा विचार व्हायला हवा होता, पण तो झाला नाही. संपूर्ण संमेलन आशा भोसले यांनी अध्यक्षाविना चालवले.

शंकर सारडा यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • गुराख्याचे पोर (बालसाहित्य)
  • ग्रंथ विशेष
  • ग्रंथ वैभव
  • ग्रंथ संवत्सर
  • झिपऱ्या आणि रत्नी (बालसाहित्य)
  • जेव्हा चुंबनाला बंदी होते... (कादंबरी)
  • दूरदेशीचे प्रतिभावंत
  • नंदनवनाची फेरी (बालसाहित्य)
  • पुस्तकांचे जग
  • बेस्टसेलर बुक्स
  • मर्कटराजाच्या लीला (बालसाहित्य)
  • मातीची भांडी (करमणूकपर)
  • मांत्रिकाची जिरली मस्ती (बालसाहित्य)
  • राक्षसाने उचलली टेकडी (बालसाहित्य)
  • विजयेन्द्र काबरा : व्यक्तिदर्शन (व्यक्तिचित्रण, माहितीपर)
  • विश्वसाहित्यातील फेरफटका
  • सर्वोत्कृष्ट गिरिजा कीर (कथासंग्रह)
  • स्त्रीवादी कादंबरी (सदरलेखन संग्रह, संपादित)
  • श्रेष्ठ भारतीय बालकथा - पंजाबी (बालसाहित्य, अनुवादित)