Jump to content

सुपारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारताच्या केरळ राज्यातील सुपारीच्या वृक्षाचे एक रोप.
सुपारीच्या वृक्षावर लटकत असलेल्या सुपाऱ्यांची फळे.
सुपारीचे पिकलेले फळ.
  • सुपारी(इंग्रजी नाव =Areka catechu linn आरेका पाम)
  • सुपारी (इंग्लिश: Areca/betel nut (अरेका/बीटल नट);)

उगम व स्थान

[संपादन]

सुपारीचा वृक्ष किंवा पोफळी हा मलेशियाचा रहिवाशी असून त्याचा विस्तार ब्रिटिश राजवट किंवा त्या काळाच्या अगोदरच्या काळात झाल्याचे मानले जाते. या झाडाचा भारतातील अस्तिवाचा उल्लेख drakesteyan वॉन-हिडच्या (१६७६) पहिल्या खंडापासून आढळतो. सुपारीचे शास्त्रीय नाव आरेका कटेच्यू असे आहे.मलबारी लोक सुपारीला हारेकावा असे म्हणतात आणि या हारेकावावरून सुपारीच्या प्रजातीचे नाव आरेका असे ठेवले गेले असावे. त्याचप्रमाणे कर्नाटकात सुपारीला अडका, अडकी या नावाने ओळखतात. काही संशोधकांच्या मते या कर्नाटकी नावापासून शास्त्रीय नाव उगम पावले असावे.

आकार व रचना

[संपादन]

पोफळीची झाडे शेलाटी आणि सरळसोट असून त्यांची उंची २० ते ३० फूट इतकी असते.खोडाचा रंग प्राथमिक अवस्थेत हिरवा असतो नंतर तो भुरकट राखाडी असतो.खोडाची रुंदी १ फूट असते. वाळलेल्या पानाच्या खोडावरील खुणा 'पेर' म्हणून ओळखल्या जातात. ही पेरे वर्तुळाकार आणि थोडी उंचावलेली असतात. पिसाच्या आकाराच्या कोवळ्या पानांच्या खालच्या बाजूला सोपटाच्या खालच्या भागातून हा फुलोरा उगवतो. फुलोरा नारळाच्या फुलोऱ्याप्रमाणेच असतो. त्याला अनेक शाखा असतात. या शाखांवर मांसल दांड्यात रुतलेली मादी फुले असतात आणि वरच्या भागात नर फुले असतात. पक्व फळे २-३ दुय्यम घडांत विभागलेली असतात. संपूर्ण घडात जवळपास २५० फळे असतात. फळात एकच बी तयार होते. बी कठीण असून त्याच्या अंतर्भागात पांढऱ्या शिरा पसरलेल्या असतात.

उपयोग

[संपादन]

सुपारी हा विड्याचे पानात टाकावयाचा एक पदार्थ. सुपारी भोजनानंतर तशीच फोडूनही खातात. सुपारी कातरण्यासाठी अडकित्ता वापरला जातो. सुपारीचे भरडा सुपारी, चिकणी, निमचिक्कणी, रोठा, ढप आदी अनेक प्रकारही आहेत. हे प्रकार सुपारीच्या फळांवर केलेल्या विविध प्रक्रियांवर अवलंबून असतात. पोफळीची लागवड बिया रुजवूनच केली जाते. फळे धरण्याचा काळ १५ ते ४० वर्षांचा असतो. दर दहा वर्षांनी झाडाची उपज करून वृद्ध झालेल्या झाडाची कमतरता भरून काढावी लागते.त्यामुळेच सुपारीच्या बागेत झाडांची गर्दी झाल्यासारखी दिसून येते. समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशात संपूर्ण कोकणच्या किनाऱ्यावर सुपारीच्या विपुल बागा आढळतात. केरळमध्ये कालिकत येथे भारत सरकारने यावरील संशोधनासाठी विशेष केंद्रे उभारली आहेत. सुपारीत भरपूर प्रमाणात टॅनिन असल्यामुळे कित्येक ठिकाणी त्याचा वापर कापसाचे कपडे रंगविण्यासाठी केला जातो. खासी पर्वतातील एका जमातीत एका ठिकाणापासून दुसरे लांबचे ठिकाण किती लांब आहे हे सांगण्यासाठी तिथवर पोहचायला किती सुपाऱ्या चघळाव्या लागतात याच्या मोजमापात सांगतात.

सुपारीला फुले आणि फळे वर्षभर येत असतात. जानेवारीत आलेली फुले ऑक्टोबरमध्ये परिपक्व फळे देतात; म्हणजे जवळजवळ त्यांना दहा महिन्याचा काळ लागतो. सर्वसाधारणपणे सुपारीची झाडे दहा वर्षापासून फुलायला-फळायला लागतात पण घराशेजारी असलेली झाडे मात्र वयाच्या सातव्या-आठव्या वर्षीच फुलू-फळू लागतात. मात्र बागेत मधेमधे लावलेली नवीन झाडे मात्र वीस वर्षाचा काळ फुलाफळावर येण्यास घेतात. एकदा फळावर आल्यावर सुपारीची झाडे वयाच्या पन्नाशी ते शंभरीपर्यंत उत्पन्न देऊ लागतात.

नाजूक खोड सुंदर हिरवीगार पाने आणि फळे धरल्यावर दिसणारे सुफळ संपूर्ण सौंदर्य यामुळे हे नाजुकसे झाड मुंबईत सुपारीच्या लोभापेक्षा शोभेसाठीच जास्त लावले जाते. बंगल्याभोवतीच्या, इमारतीच्या भोवतीच्या छोटेखानी बागांमध्ये हे झाड लावलेले दिसते. परंतु पूर्वी म्हणजे, शंभर एक वर्षापूर्वी जेव्हा मुंबईत नारळ सुपारीच्या बागा होत्या, तेव्हाच्या काही खुणा अजूनही सापडतात. समुद्रकाठच्या जुन्या बंगल्याच्या आवारात थोडी सुपारीची झाडे दिसतात. मुंबईत 'सुपारीबाग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात मात्र सुपारीच्या झाडाला एकही कोपरा मिळालेला नाही.

सुपारी से बने भगवान गणेश, रीवा, मध्यप्रदेश,भारत


[ संदर्भ हवा ]