तेलंग स्वामी
तेलंग स्वामी (तैलंग वा त्रैलंग स्वामी अशीही नावे आढळतात) हे आपल्या वाराणसीचे एक योगी होत. ह्यांचे संन्यासाश्रमातील नाव स्वामी गणपती सरस्वती असे होते. यांच्या योगिक सामर्थ्याच्या व दीर्घायुष्याच्या अनेक आख्यायिका आहेत. काही कथनांनुसार तेलंग स्वामी २८० वर्षे जगले; इस १७३७ ते १८८७ या काळात ते वाराणशीत राहिले. भक्त त्यांना शिवावतार मानतात. श्री रामकृष्णांनी त्यांचा उल्लेख “वाराणशीचा चालताबोलता शिव” असा केलेला आढळतो.[ संदर्भ हवा ]
आरंभिक आयुष्य
[संपादन]बिरुदुराजू रामराजू यांनी लिहिलेल्या त्यांच्या चरित्रानुसार तेलंग स्वामींचा जन्म आंध्र प्रदेशातील विजियानगरम जिल्ह्यात कुंबिलपूरम इथे झाला. त्यांचे कौटुंबिक नाव शिवराम असे होते. जन्मसालाबद्दल एकमत नाही, एका चरित्रानुसार त्यांचा जन्म इस १६०७ मध्ये झाला. शिवराम ४० वर्षांचे असताना त्यांच्या वडलांचा मृत्यू झाला (नरसिंग राव), त्यानंतर त्यांनी सगळी मालमत्ता आपल्या भावास देऊन टाकली. त्यांच्या आईचा (विद्यावती देवी) असा विश्वास होता की काली साधना पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्या वडलांनी (म्हणजे शिवरामाच्या आजोबांनी) पुत्र म्हणून तिच्या पोटी जन्म घेतला आहे. ही गोष्ट आईकडून कळल्यावर शिवरामांनी आईकडूनच मंत्रदीक्षा घेऊन कालीसाधना केली.
१६६९ साली विद्यादेवींचा मृत्यू झाला. आईचे चिताभस्म अंगास फासून शिवरामांनी तीव्र साधना सुरूच ठेवली. या काळात स्मशानाजवळच्या एका झोपडीत ते राहत. सन १६८५ मध्ये भगीरथानंद सरस्वतींनी शिवरामांस संन्यासदीक्षा देऊन नावबदल केला. १७३७ मध्ये काशीत स्थिरस्थावर होण्यापूर्वी गणपती स्वामींनी बऱ्याच तीर्थयात्रा केल्या.