अका जमात
ही भारतातील अरुणाचल प्रदेशातील कामेंग विभागाच्या दक्षिणेस रहात असलेली पहाडी जमात आहे. ३१० चौ.किमी. टापूत अदमासे २,००० अका लोक राहतात. त्यांची २१ खेडी आहेत व प्रत्येक खेड्यात ५० ते ६० लोक राहतात. हा सर्व प्रदेश जंगल, पर्वत व लहान लहान जलप्रवाहांनी व्यापलेला आहे. प्रामुख्याने बांबूची जंगले आहेत. अका स्वतःस ऱ्हूसो म्हणवतात. इतर लोक त्यांना ‘अका’म्हणतात. गौर वर्ण, चपटे नाक, वर आलेली गालाची हाडे, काळे केस, पिंगट किंवा निळे डोळे, मध्यम उंची ही त्यांची शरीरवैशिष्ट्ये आहेत. अका बोली तिबेटो-ब्रह्मी भाषापरिवारातील आहे.[१]
अका स्थलांतरित शेती करतात. मुख्य पिके मका, उडीद व रताळी आहेत. सामाजिक, धार्मिक कार्यात डुकराचे, बोकडाचे किंवा मिथानचे मांस खातात. स्त्रियांना कोंबडी व मिथानचा मेंदू आणि पाय वर्ज्य आहेत, तसेच दूध व दुधाचे पदार्थही निषिद्ध आहेत. वर्ज्य पदार्थ खाल्ल्यास चेहरा विद्रूप होतो, असा त्यांचा समज आहे. अका बांबूची घरे बांधतात. घरे खांबावर अधांतरी बांधलेली असतात. घरात पाहुण्यांकरिता ‘थुमोना’ नावाची खोली असते.
कुळे
[संपादन]हजारीखोबा
[संपादन]हजार घरांतून खाणारा आणि
कपासचोर
[संपादन]कापूस चोरणारा.
पूर्वी लुटालूट करून निर्वाह करण्याच्या सवयीमुळे त्यांची अशी नावे पडली असावीत. अका जमातीत बीजकुटुंबपद्धतीला प्राधान्य आहे. या जमातीत दोन राण्या आहेत. त्यांना ‘नुगुम’ असे म्हणतात व ग्रामपंचायतीच्या सभांना बोलावतात.
अका जमातीत आते-मामे भावंडांचे विवाह होतात. कनिष्ठ देवर विवाह व मेहुणी विवाह समाजात समंत आहेत. वधूमूल्य म्हणून मिथान, कपडे व भांडी देतात.
अकांचे देव
[संपादन]आकाशदेव (नैत्झ ऊ), पर्वतदेव (फु ऊ), पृथ्वीदेवता (नो आईन) व नदीदेवता (हु आईन). ऊ म्हणजे पिता व आईन म्हणजे माता. याशिवाय गुराढोरांचा सांभाळ करणारा, वन्य प्राण्यांचे रक्षण करणारा, जन्म ठरविणारा, लहान मुलांची काळजी घेणारा व वेगवेगळ्या रोगांपासून मुक्त करणारा-अशा वेगवेगळ्या देवदेवता आहेत. प्रत्येक गावात एक उपाध्याय- ‘मुगु’ –असतो. तो लोकांच्या धार्मिक जीवनात वेगवेगळ्या प्रकारे मदत करतो.
संदर्भ
[संपादन]- मराठी विश्वकोश
- ^ Sinha, Raghuvir (1962). The Akas: The People of NEFA (इंग्रजी भाषेत). Research Department, Adviser's Secretariat.