Jump to content

प्रदीप लोखंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रदीप लोखंडे (इ.स. १९६३ - ) हे महाराष्ट्रासह भारताच्या ग्रामीण भागांत ग्रंथालयांचे जाळे निर्माण करणारे एक समाज कार्यकर्ते आहेत. ते मूळचे वाईचे असून कॉमर्सचे पदवीधर आहेत. त्यांच्याकडे मार्केटिंगचा डिप्लोमा आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीत काम करीत असताना त्यांनी गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतून त्यांच्या सहकाऱ्यांसह बराच विदा गोळा केला आहे. गावात किती दुकाने आहे, त्यांतून काय विकले जाते, किती घरांत टी.व्ही. आहेत, इंटरनेट किती लोक वापरतात, इ. विदाबिंदू त्यांनी गोळा केले. गावांत अतिरिक्त ज्ञान मिळवण्याची काहीच साधने नाहीत व शाळेत नेमलेली क्रमिक पुस्तके सोडली तर कुठलीच पुस्तके लोकांनी वाचलेली नाहीत असे दिसल्याने त्यांनी २००१मध्ये माध्यमिक शाळांमध्ये ग्रंथालये बनवायला सुरुवात केली. ही ग्रंथालये विद्यार्थ्यासाठी असून शाळेतील एक विद्यार्थीच यांची व्यवस्था पाहतो.

२००९सालापर्यंत त्यांनी महाराष्ट्राबाहेर आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, तेलंगण, मध्य प्रदेश, इ. राज्यांतून अशी ग्रंथालये उघडली. याशिवाय लोकांकडून देणग्या मिळवून २० हजार गावांत २८ हजार संगणक बसवले. गावांना पुरवण्यासाठी आज ते एकतर नवे संगणक विकत घेतात किंवा आयटी कंपन्यांतून जुने कालबाह्य झालेले संगणक मिळवतात.

२०१७ साली प्रदीप लोखंड्यांनी उघडलेली ३,६०० ग्रंथालये सुरू आहेत. त्यांना ६,२५,००० पुस्तके दिली गेली आहेत. प्रत्येक ग्रंथालयात१८० च्या आसपास पुस्तके आहेत. त्यांचा फायदा साडेआठ लाख मुले घेत आहेत. या पुस्तकांमध्ये व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, फिजिकल ट्रेनिंग, भारताची घटना यांशिवाय नाटके, ललित लेखसंग्रह, इतकेच नाही तर लैंगिक शिक्षणावरची पुस्तकेही आहेत. ही पुस्तके देशी भाषांमधील आहेत.

लोखंडे यांनी उभारलेल्या या ग्रंथालयांचा लाभ गावातले आणि आसपासच्या गावातले सरासरी २७० विद्यार्थी घेतात. एक ग्रंथालय स्थापन करण्यासाठी दात्याला प्रकाशकाच्या नावाने फक्त ६,७०० रुपयांची देघमी देणे अपेक्षित आहे. विकत घेतलेल्या पुस्तकावर दात्याचा नाव-पत्ता असतो. पुस्तक आवडले तर विद्यार्थी थेट दात्याला पोस्ट कार्ड टाकून त्याचे आभार मानतात. त्यांच्या कामामुळे ते पुण्यात प्रसिद्ध झाले असून केवळ प्रदीप लोखंडे, पुणे १३ या पत्त्यानिशी त्यांना टपाल मिळते.

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]
  • मराठी लेखक सुमेध वडावाला यांनी लोखंड्यांवर पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाचे नाव आहे : प्रदीप लोखंडे, पुणे-१३.
  • ग्रामीण भागात केलेल्या समाजकार्याबद्दल रोटरी नेतृत्व प्रावीण्य पुरस्कार.

या क्षेत्रातील इतर कार्यकर्ते

[संपादन]
  • दिल्लीमध्ये एक बिनसरकारी संघटनेतील एका कार्यकर्त्याने दिल्लीच्या २०० सरकारी शाळांमध्ये इ.स.२००३ सालापासून अशी १४ वर्षे वाचनालये चालवली आहेत. एका ग्रंथालयात २०० ते ३०० पुस्तके असून सुमारे ५०,००० मुलांनी या ग्रंथालयांचा फायदा घेतला आहे.