लाजवंती
लाजवंती(स्लेअंडार लोरिस) ही लोरिडे कुटुंबातील एक निशाचर प्रजाती आहे. हा प्राणी भारत आणि श्रीलंकेत आढळतो. हे उपोष्णकटिबंधीय आणि उष्णकटिबंधीय कोरड्या जंगलात आणि उपोष्णकटिबंधीय किंवा उष्णकटिबंधीय आर्द्र सखल प्रदेशात राहतात. नावाप्रमाणे हा लाजवट आणि निशाचर प्राणी आहे. ही प्रजाती आय.यू.सी.एन. लाल यादी च्या वर्गवारी नुसार निकट-असुरक्षित (Near Threatened किंवा NT) म्हणजेच जवळच्या भविष्यात चिंताजनक व्हायची शक्यता आहे.[१]
या प्राण्यांच्या शरीराची लांबी ५ ते १० इंच असून, वजन फक्त ३०० ग्रॅमपर्यंत असते. लाजवंती गटातील प्राण्यांना शेपटी नसते. त्याचे डोळे मोठे व नाक लांबट असते. अंगावरील लव अगदी मऊ लोकरीसारखी असते. लाजवंतीचे हात-पाय फांद्या पकडण्यासाठी अगदी योग्य असतात.हा पूर्णवेळ झाडावरच राहतो. दक्षिण भारतातील पश्चिम घाटामधील सदाहरित आणि पानझडीच्या जंगलामध्ये याचा प्रमुख अधिवास आहे. अन्न शोधायला ते रात्री बाहेर पडतात. घुबडाप्रमाणेच त्याचे डोळे मोठे असतात. त्यामुळे रात्री त्यांना उत्तम दिसते. लाजवंती सर्वभक्षक असून, किडे, पक्ष्यांची अंडी, पाली हे त्यांचे आवडते खाद्य आहे. त्यांची भक्ष्य पकडण्याची पद्धत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते भाक्षाचा नकळत हळुवार जवळ जातात आणि एकदम हातांनी पकडतात. बऱ्याचदा एकएकटा फिरणारा हा प्राणी उन्हाळा आणि हिवाळ्यात प्रजनन करतो. मादी एका वेळेस एकाच पिलाला जन्म देते. लाजवंतीचे पिलू माकडाप्रमाणेच आईचा पोटाला घट्ट चिटकून राहते. लाजवंती अतिशय भित्रा प्राणी आहे. अंतरराष्ट्रीय संवर्धन संस्थांनी लाजवंतीला भविष्यात दुर्मिळ होणाऱ्या प्रजातींचा यादीत सामाविष्ट केले आहे. लाजवंतीचा संवर्धणासाठी अधिवासाचे संरक्षण, तस्कीरवर आळा घालणे महत्त्वाचे आहे.
संदर्भ
[संपादन]डॉ प्रमोद पाटील[ दुजोरा हवा]
- ^ Dittus, W.; Singh, M.; Gamage, S.N.; Kumara, H.N.; Kumar, A.; Nekaris, K.A.I. (2020). "Loris lydekkerianus". IUCN Red List of Threatened Species. 2020: e.T44722A17970358. doi:10.2305/IUCN.UK.2020-3.RLTS.T44722A17970358.en. 17 November 2021 रोजी पाहिले.