भातांगळी
भातांगळी हे लातूर जिल्ह्यातील मांजराया नदीच्या काठावरील एक गाव आहे. तालुका व जिल्हा मुख्यालयापासून हे गाव १२ कि मी अंतरावर लातूर - नांदेड या राज्य मार्गावर आहे. मांजरा, रेणा नदी, व गोणा नदी या तीन नद्यांच्या संगमावर वसलेला संगमेश्वर हे भातांगळी या गावाचे ग्रामदैवत आहे. या गावात कुठल्याही मंदिरावर कळस नाही.
लोकसंख्या
[संपादन]जनगणना २०११ प्रमाणे भातांगळी गावाचे क्षेत्रफळ १७९८ हेक्टर आहे. गावात एकूण ७४३ निवासी घरे असून गावाची एकूण लोकसंख्या ४०८४ इतकी आहे. तिच्यापैकी २०७१ पुरुष तर २०१३ स्त्रिया आहेत. गावातील अनुसूचित जातीचे लोक ५१३ तर अनुसूचित जमातीचे लोक २४२ आहेत. गावात २४८३ लोक साक्षर असून, ही साक्षरता ६४ टक्के होते.
स्वातंत्र्यलढ्यातील योगदान
[संपादन]भातांगळी गाव हे हैद्राबाद संस्थानात होते. हैद्राबादच्या मुक्तिसंग्रामात गावातील लोकांनी भाग घेतला. गावातील श्री प्रभुप्पा संभाजी डिघोळे हे स्वातंत्र्यसैनिक आहेत.
शाळा / महाविद्यालये
[संपादन]गावात एकूण चार शाळा आहेत. पैकी एक प्राथमिक व एक माध्यमिक अशा दोन जिल्हा परिषदेच्या आहेत. गावात मातृभूमी विद्यालय ही खासगी माध्यमिक शाळा व एक इंग्रजी माध्यमाची पूर्व प्राथमिक शाळा आहे.
गावाचा शैक्षणिक प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत आहे. गावातील अनेक सुशिक्षीत तरुण विविध व्यवसायांत व शासकीय सेवांत उच्चपदस्थ म्हणून कार्य करत आहेत.
शासकीय कार्यालये
[संपादन]गावात टपाल कार्यालय असून, जनता सहकारी बँकची शाखाआहे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र व तलाठी कार्यालय आहे. तसेच खाजगी तत्त्वावर चालवले जाणारे 'सेतु सुविधा केंद्र' आहे. गावातील शेतकऱ्यांना 'विविध कार्यकारी सेवा' नावाची सोसायटी अनेक सुविधा देते. भातांगळी हा तलाठी सज्जा असून या अंतर्गत भातांगळी, भातखेडा, श्रीरामनगर (ममदापूर पाटी) ही गावे येतात.
धार्मिक स्थळे
[संपादन]गावात हनुमान मंदिर संकुलात विठ्ठल रुक्मिणीचे देऊळ मंदिर तसेच गुरूमाऊली परमपुज्य वासुदेव महाराज वाईकर यांची समाधी आहे. गावानजीक मांजरा नदितीरावर 'संगमेश्वर' हे देवस्थान आहे. दर सोमवारी या ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने जातात. मुस्लिम धर्मियांचे प्रार्थनास्थळ मस्जिद गावात आहे. तसेच श्री बालाजी मंदिर तसेच देवीचे मंदिर गावात आहे. गावात विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. हिंदू व मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले 'बाराईमाम' हे देवस्थान भातांगळीपासून दोन कि मी अंतरावर असलेल्या चिकलठाणा या गावात आहे.
वैद्यकीय सुविधा
[संपादन]गावात प्राथमिक आरोग्यकेंद्र आहे. तसेच गावचे भुमिपुत्र श्री. रामदास उटेकर हे गावात तत्पर वैद्यकिय सेवा सुविधा देतात.
राजकारण
[संपादन]भातांगळी गावाचा कारभार ग्रामपंचायत मार्फत चालवला जातो. भातांगळी हा पंचायत समिती गण आहे. हे गाव लातूर ग्रामीण विधानसभा क्षेत्रात तर लातूर लोकसभा क्षेत्रात येते.
वाहतूक व दळणवळण
[संपादन]हे गाव राज्य महामार्गापासून सुमारे दोन कि. मी. अंतरावर वसलेले आहे. गावात मध्य रेल्वेचे रेल्वेस्थानक आहे. प्रवासी रेल्वेगाड्यांचा हा थांबा आहे. गावातून तालुका मुख्यालयाकडे जाण्यासाठी खाजगी वाहने तसेच बस सुविधा आहे. गावापासून २८ कि मी अंतरावर विमानतळ आहे.