Jump to content

कीटक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कीटक
396–0 Ma
Early Devonian (but see text) – Recent
Clockwise from top left: dancefly (Empis livida), long-nosed weevil (Rhinotia hemistictus), mole cricket (Gryllotalpa brachyptera), german wasp (Vespula germanica), emperor gum moth (Opodiphthera eucalypti), assassin bug (Harpactorinae)
Clockwise from top left: dancefly (Empis livida), long-nosed weevil (Rhinotia hemistictus), mole cricket (Gryllotalpa brachyptera), german wasp (Vespula germanica), emperor gum moth (Opodiphthera eucalypti), assassin bug (Harpactorinae)
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: Arthropoda
Subphylum: Mandibulata
Superclass: Hexapoda
जात: Insecta
Linnaeus, 1758
युरोपीय प्रजातीची मधमाशी

कीटक संधिपाद प्राणी वर्गातील कायटिनचे बाह्य आवरण असलेल्या या बहुपेशीय प्राण्यांचे शरीर डोके, वक्ष आणि पोट अशा तीन प्रमुख भागांनी बनलेले असते. वक्षास पायांच्या तीन जोड्या असतात. डोळे बहुभिंगी असून डोक्यावर दोन शृंगिका असतात. सर्वाधिक विविधता असलेला हा वर्ग आहे. आजपर्यंत सुमारे दहालाख कीटकांच्या प्रजातीचे वर्गीकरण झाले आहे. हा आकडा आजपर्यंत वर्गीकरण न झालेल्या कीटकांच्या सुमारे पन्नास टक्के असावा.

प्राणिसृष्टीमध्ये सहा ते दहा दशलक्ष जाति असाव्यात. त्यापैकी नव्वद टक्के बहुपेशीय प्राणी आहेत. कीटक पृथ्वीवरील सर्व प्रदेशांत आढळतात. सागरातील कीटकांची संख्या नगण्य आहे. सागरामध्ये संधिपाद प्राण्यापैकी कवचधारी प्राण्यांचे प्राबल्य अधिक आहे. कीटकांच्या जीवनक्रमामध्ये थोडा फार फरक आहे. पण बहुतेक सर्व कीटकांची पहिली अवस्था अंडे ही आहे. कीटकांच्या वाढीस प्रत्यास्थित बाह्य आवरणाच्या मर्यादेमुळे वाढ अनेक टप्प्यांमध्ये होते. अंडे, अळी, कोश आणि पूर्ण वाढ झालेला कीटक. अशा टप्प्यांमध्ये अळी, कोश आणि पूर्ण वाढ झालेला कीटक यांच्या शरीररचना, अन्न, आणि अधिवास भिन्न असतो. पूर्ण बदल होण्यासाठी कोशावस्थेची गरज असते. काही कीटकांच्या वाढीच्या अवस्था अपूर्ण असतात. या प्रकारास अपूर्ण परिवर्तन म्हणतात. अपूर्ण परिवर्तन असलेल्या कीटकामध्ये कोशावस्था नसते. क्रमाक्रमाने त्यांच्या वाढीच्या अवस्था येत राहतात. पॅलिओझोइक कालखंडामध्ये असलेले कीटकांचे जीवाश्म ५५-७० सेमी आकाराचे आढळले आहेत. कीटकांमधील विविधता सपुष्प वनस्पतींच्या वाढीबरोबर विकसित झाली आहे. कीटकांची हालचाल प्रामुख्याने पायांमुळे व पंखांमुळे होते. पाण्यातील कीटक पोहू शकतात. कीटकाना असलेल्या सहा पायांमुळे शरीराचा तोल उत्तमप्रकारे सांभाळला जातो. त्यांचे पाय डाव्या आणि उजव्या बाजूस टेकून बदलत्या त्रिकोनामध्ये ते शरीर पृष्ठभागावर टेकवतात. कीटक हे एकमेव उड्डाणक्षम अपृष्ठवंशी प्राणी आहेत. अनेक कीटकांच्या पहिल्या वाढीच्या अवस्था पाण्यात पूर्ण होतात(उदा० डास, चतुर). पाण्यातील अवस्थेमध्ये क्लोमांच्या साहाय्याने श्वसन होते. काहीं प्रौढ कीटकांच्या शरीरांमध्ये पाण्यामध्ये राहण्यासाठी बदल झाले आहेत. निवळी (वॉटर सट्रायडर) सारखे कीटक पाण्यावर चालू शकतात. बहुतांश कीटक एकांडे असतात. मधमाशा, मुंग्या आणि वाळवी हे समुदायाने राहणारे कीटक आहेत. सुसूत्रपणे सहसंबंध असलेल्या मोठ्या समुदायामध्ये असे कीटक राहतात. कुंभारीण हा वास्प जातीचा कीटक अंडी आणि अळ्यांची काळजी घेतो. कीटकांचे संप्रेषण अनेक प्रकारानी होते. नरकीटक मादीच्या कामगंधाने कित्येक किलोमीटरपर्यंत आकर्षित होतात. क्रिकेट सारखा कीटक पंख परस्परांवर घासून मादीस आकर्षित करणे आणि दुसऱ्या नरास पिटाळून लावण्याचे काम करतो. काजवा प्रकाश संदेशाच्या साहाय्याने मादीबरोबर संपर्क साधतो. मानवाच्या दृष्टीने बहुतेक कीटक उपद्रवी अ‍सल्याने त्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी कीटकनाशके वापरली जातात. काही कीटक पिकांचे पाने, फुले आणि फळामधील रस शोषून नुकसान करतात. काहीं कीटक मानव आणि पाळीव पशूंचे रक्त शोषतात. रक्त शोषणारे आणि मानवास चावणारे कीटक अनेक रोगांचे वाहक आहेत. त्यातील काही पाळीव प्राण्यांच्या रोगांचे वाहक आहेत. कीटकांशिवाय फुलांचे परागीभवन घडून येत नाही. कीटकांच्या साहाय्याने झालेल्या परागीभवनामुळे पिकांचे उत्पन्न अधिक येते. आपण आपल्या अन्नासाठी कीटकांवर अवलंबून आहोत. कीटकभक्षी कीटकांमुळे उपद्रवी कीटकांची संख्या नियंत्रित राहते. रेशीम कीटक आणि मधमाशा पालन यामधून रेशीम आणि मध यांचे उत्पन्न मिळते.

कीटक विविधता प्रत्यक्षात असलेला कीटक बहुविधतेचा आकडा नक्की करणे कठीण असले तरी चवदा ते अठरा लाख कीटक पृथ्वीवर असावेत असा अंदाज आहे. हा आकडा सर्व जैवविविधतेच्या वीस टक्के एवढा आहे. दरवर्षी असलेल्या कीटकांच्या यादीमध्ये वीस हजार नव्या कीटकांची भर पडते आहे. अर्थात मोठ्या वेगाने हे काम चालू राहिले तर भविष्यात हा आकडा कमी होईल. प्राणिसृष्टीतील आठ लाख पन्नास हजार ते दहा लाख कीटकांचे वर्गीकरण झाले आहे. कीटकांच्या तीस गणांतील चार गणांमध्ये सहा लाख ते दहा लाख कीटक आजपर्यंत सामावलेले आहेत. हे चार गण म्हणजे कोलिओप्टेरा, डिप्टेरा, हायमनोप्टेरा आणि लेपिडोप्टेरा. भुंग्याच्या (कोलिओप्टेरा)गणामध्ये जेवढे कीटक आहेत तेवढी सर्व एकत्रित कीटकांची संख्या होते.

प्रकार

[संपादन]

शरीर रचना

[संपादन]

2. कीटक शरीररचना . कीटकांचे शरीर अनेक खंडानी बनलेले असते.(शीर्ष –सहा खंड; वक्ष- तीन खंड; उदर- अकरा खंड ) शरीरावर कायटिनने बनलेली त्वचा असते. याचे दोन भाग असतात. दृढ त्वचा आणि मृदु त्वचा. दृढ त्वचेस दृढके म्हणतात. दोन दृढकांमध्ये मृदु लवचीक त्वचेचा भाग असतो यास सेवनी असे म्हणतात. शरीराचे मुख्य तीन भाग असतात. शीर्ष, वक्ष आणि उदर. शीर्षावर शृंगिकांची एक जोडी आणि दोन संयुक्त नेत्र असतात. संयुक्त नेत्रांशिवाय काहीं कीटकांमध्ये एक ते तीन अक्षिका (साधे नेत्र) असतात. मुखांगांच्या तीन जोड्या शीर्षास जोडलेल्या असतात. वक्षास तीन पायांच्या जोड्या असतात. वक्षाच्या अग्रखंडास, मध्यखंडास आणि पश्चखंडास प्रत्येकी पायांची एक जोडी असते. पाय सहा भागांनी बनलेला असतो. ऊर्ध्व बाजूस काही कीटकांमध्ये दोन्ही बाजूंस एका पंखाची किंवा दोन पंखांची जोडी असते. ढेकणासारख्या कीटकांमध्ये पंख नाहीत. उदर अकरा खंडांनी बनलेले असते. काही कीटकांमध्ये उदराचे शेवटचे खंड पूर्णपणे विकसित नसतात किंवा त्यापासून उदराच्या शेवटी काही विशिष्ट अवयव बनलेले असतात. उदरामध्ये पचनसंस्था, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था आणि जनन संस्था असतात. शरीराच्या पंख, मुखांगे, पाय आणि शृंगिका यामध्ये आवश्यकतेनुसार अनुकूलन झालेले दिसते. 3. शरीर खंड रचना : शीर्ष शरीराचा अग्रभाग असून सहा खंडानी बनलेला असतो.शीर्ष खंड दृढकांनी सांधलेले असतात. त्यामुळे डोक्याची कवटी बनते. प्रत्यक्ष शीर्षाचे सहा खंड दृश्य नसतात. कीटकाच्या शीर्षाच्या पुढील बाजूस शृंगिका, संयुक्त नेत्र, किंवा नेत्रिका असतात शीर्षाच्या अधर बाजूस मुखांगे जोडलेली असतात. बहुघा शीर्ष धडाशी नव्वद अंशाचा कोन करते. शीर्ष आणि घड यामध्ये लवचीक मान असते. वक्ष तीन खंडांनी बनलेले असते. अग्रखंड मध्यखंड आणि पश्चखंड अशा तीन वक्ष खंडाना तीन पाय जोडलेले असतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या खंडावर अधर बाजूस दोन पंखांच्या जोड्या असतात. प्रत्येक खंडानंतर आंतर खंडीय कक्षा स्पष्ट दिसते. प्रत्येक खंडाचे चार भाग असतात. ऊर्ध्व बाजूस एक, अधर बाजूस एक दृढके आणि बाजूस दोन लवचीक सेवनी अशा रचनेमुळे खंडांची सीमित हालचाल होते. उदर हा शरीराचा शेवटचा भाग. उदर ११-१२ खंडांनी बनलेले असते. उदर खंड शीर्ष आणि वक्ष खंडाहून अधिक पातळ दृढकांनी झाकलेले असतात. दृढके लवचीक सेवनीने परस्परांशी सांधलेली असतात. ऊर्ध्व दृढकाच्या बाजूस जेथे अधर दृढक जोडलेले असते, तेथे ऊर्ध्व बाजूस श्वासरंध्रे असतात. जीवनविकास प्रक्रियेमध्ये प्रारंभीच्या काळात उदर खंडांची संख्या अकरा असते. पण काही कीटकांमध्ये उदर खंडांची संख्या कमी झालेली आढळते. आदिम गणातील कीटकांना पंख नसतात. कीटकांमध्ये उदर खंड बारा तर कोलंबोला गणामधील कीटकांमध्ये सहा उदरखंड असतात. बाह्यकंकाल : कीटकांच्या शरीरावरील आवरण क्युटिकलने बनलेले असते. बाह्यकंकालाचे दोन भाग होतात. पातळ आणि मेणासारखे बाह्यावरणामध्ये कायटिन नसते. बाह्यावरणाखाली असलेल्या आंतरावरणास प्रोक्युटिकल असे म्हणतात. बाह्यावरणाहून प्रोक्युटिकल बहुतांशी कायटिनने बनलेले आणि अधिक जाड असते. प्रोक्युटिकलचे दोन भाग असतात बाह्य आणि आंतर. बाह्य प्रोक्युटिकलच्या खाली असलेला थर कायटिन, प्रथिने आणि आडव्या उभ्या तंतुमय कायटिन धाग्यानी बनलेला असतो. मृदु शरीराच्या अळी अवस्थेमध्ये बाह्य प्रोक्युटिकलची जाडी कमी असते. पण प्रौढ कीटकांमध्ये प्रोक्युटिकल दृढ होते. अपृष्ठ्वंशी प्राण्यामधील कीटक हे एकमेव उड्डाणक्षम प्राणी आहेत. कीटक सर्वत्र पसरण्यात त्यांच्या उड्डाणक्षमतेचा मोठा वाटा आहे. प्रेरक चेता पेशीकडून आलेल्या एका संकेतानंतर त्यांचे स्नायू दर सेकंदास अनेक वेळा आकुंचन पावतात. अशाने पंखांची अतिशय वेगाने हालचाल होते. स्नायू बाह्य कंकालास परिणामकारकपणे जोडलेले असतात. संधिपाद क्रस्टेशिया गटातील प्राण्यांची हालचाल याच पद्धतीने होते. याला अपवाद अ‍ॅरॅकनिडा गटातील (कोळी वर्ग़ीय) प्राण्यांचा आहे.त्यांच्या पायाची हालचाल शरीरातील द्रवाच्या जलीय दाब पद्धतीने होते. आंतर रचना 3.1 चेतासंस्था कीटकांची चेतासंस्था मेंदू मध्यवर्ती चेता संस्था आणि अधर मज्जारज्जू (तंत्रिका रज्जू) अशा दोन भागामध्ये विभागलेली असते. शीर्ष सहा खंडानी बनलेले असून प्रत्येक खंडासाठी एक गुच्छिका अशा सहा गुच्छिकेने शीर्षामधील चेतासंस्था बनलेली असते. त्यातील पहिल्या पाच गुच्छिकेचा समूह म्हणजे मेंदू शीर्षामध्ये ऊर्ध्व बाजूस स्थित असतो. यापासून निघालेली अधोग्रसिका गुच्छिका अधर बाजूस येऊन दुहेरी मध्यस्थित मज्जारज्जूमध्ये मिळते. मेंदू पूर्वमस्तिष्क, मध्यमस्तिष्क आणि पश्चमस्तिष्क अशा तीन भागामध्ये विभागलेले असते. संयुक्त नेत्र, अक्षिका, शृंगिका आणि अनुकंपी तंत्रिका यांच्या साहाय्याने शरीराचे नियंत्रण होते. वक्षखंडामधील तीन गुच्छिका आकाराने मोठ्या असून यापासून तीन पायांच्या जोड्या व पंखाना चेता जातात. चालणे, पळणे आणि पंखांची हालचाल नियंत्रित करण्यासाठी या वक्ष गुच्छिकांचा उपयोग होतो. उदर खंडामधील शेवटच्या गुच्छिका एकत्र येऊन जनन गुच्छिका बनलेली असते. बहुतेक कीटकामध्ये सहा उदर गुच्छिका असतात. सहावी गुच्छिका सर्वात मोठी असते. गांधीलमाशीच्या वक्षामध्ये दोन गुच्छिका आणि उदरामध्ये तीन गुच्छिका असतात. घरमाशीच्या वक्षातील सर्व वक्ष गुच्छिका एकत्र येऊन एकच गुच्छिका बनलेली असते. फार थोड्या कीटकामध्ये वेदनासंवेदी चेता असतात. 2003 मध्ये फळमाशीच्या अभ्यासामध्ये फळमाशीच्या अळीस गरम तारेचा स्पर्श केला असता अळ्या ठराविक पद्धतीने शरीराचे खंड स्वल्पविरामाच्या आकाराचे करून प्रतिसाद देतात असे आढळून आले. याउलट नुसत्या तारेचा स्पर्श झाल्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. जरी वेदना संवेदी चेता कीटकामध्ये असल्याचे नोंदवले गेले असले तरी यावर अजून शास्त्रज्ञांचे एकमत झालेले नाही.

कीटक मुखांगे कीटकांची मुखांगे अन्नाच्या प्रकाराप्रमाणे बदलतात. सामान्यपणे कीटकंच्या मुखांगात उत्तरोष्ठ , अधरोष्ठ, जंभ, जंभिका वा जिव्हा हे प्रमुख भाग असतात. उत्तरोष्ठ व अधरोष्ठ तोंडाच्या पोकळीच्या वरील वा खालील बाजूस असतात. त्यांच्या साहाय्याने तोंडाचे आवरण बनते. जंभ आणि जंभिका तोडामध्ये बाजूस असतात. जंभ चर्वणासाठी असून जंभिका हे साहाय्यक जबडे असून खाताना भक्ष्य धरून ठेवण्यासाठी त्यांची मदत होते. 3.2 पचन संस्था : पचन संस्थेमध्ये आहार नाल प्रमुख असून अन्नातील अन्नद्रव्ये बारीक करून त्यामधील शोषण करण्यासारखा भाग अन्नमार्गामधून घेण्यासाठी बनलेला असतो. प्रथिने, बहुशर्करा कर्बोदके, मेदाम्ले आणि न्यूक्लि इक आम्ले याचा अन्नमध्ये समावेश असतो. त्यांचे शोषणयोग्य रेणूमध्ये विकरांच्या साहाय्याने पचन करणे हे पचनसंस्थेचे प्रमुख कार्य आहे. आहार नाल मुखापासून गुदद्वारापर्यंत पसरलेला असतो. पचन नालामधील अन्न तोंडाकडून गुदमार्गाकडे ढकलण्याचे कार्य पचननालाच्या स्नायूमुळे होते. पचन नालाचे तीन प्रमुख भाग आहेत. अग्रांत्र (आतड्याचा पुढील भाग) मध्यांत्र (आतड्याचा मध्य भाग) आणि पश्चांत्र (आतड्याचा शेवटचा भाग) . या तीनही भागांची रचना आणि कार्य यामध्ये चांगलाच बदल असतो. पचन नालाशिवाय अग्रांत्रामध्ये मुख गुहिकेमध्ये उघडणाऱ्या जिव्हेच्या बुडाशी उघडणाऱ्या लाळ ग्रंथी असतात. लाळेचा अन्न पचनासाठी उपयोग होतो. रेशीम कीटकामध्ये या ग्रंथीच्या रसापासून रेशीम घागा तयार होतो. कीटकामधील लाळ ग्रंथीमधून बाहेर येणारी लाळ मुखपूर्व पोकळीमध्ये अन्नावर प्रक्रिया करते. माशा आणि डासासारख्या कीटकामध्ये लाळ अन्न्पचनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. अन्न नाल किंवा अन्न नलिका हा कीटकांच्या पचनसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. अग्रांत्र: अग्रांत्राचे ग्रसनी (घसा) ग्रसिका (अन्ननलिका) , अन्नपुट ( ग्रसिकेचा अन्न साठविण्यासाठी झालेला पिशवीसारखा विस्तार) आणि पेषणी ( अन्न बारीक करणारा स्नायूमय कोष्ठ ) असे चार भाग असतात. द्रवरूप अन्न घेणाऱ्या कीटकात ग्रसनीचा पंपासारखा उपयोग होतो वा अन्न तोंडात घेतले जाते. ग्रसिका बारीक असून तिचा पश्च भाग पिशवीसारखा विस्तारलेला असतो, त्याला अन्नपुट म्हणतात. मध्यांत्रात जाण्यापूर्वी अन्न अन्नपुटात साठवले जाते. अग्रांत्राचे आतील आवरण कायटिन व प्रथिनानी आच्छादलेले असते. कठीण आणि टोकदार अन्न कणापासून अंतःत्वचेचे त्यामुळे संरक्षण होते. मुखपूर्व पोकळीमध्येच लाळेमधील अमायलेझ या विकराच्या साहाय्याने स्टार्चचे विघटन होते. लाळेमुळे अन्नावर एक संरक्षक पुट चढवले जाते. ग्रसिका आकाराने बारीक असते. ग्रसिकेमधून अन्न अन्नपुटात जाते. वनस्पतिजन्य आहार घेणाऱ्या कोलिओप्टेरा आणि झुरळासारख्या कीटकामध्ये अन्न पुटाचा आकार मोठा असतो. कीटकांच्या तोंडामध्ये दात नसतात. मुखांगे विविध प्रकारच्या अन्नाप्रमाणे विकसित झालेली असतात. रक्त, वनस्पतींचा रस, फुलातील मकरंद अशा द्रव अन्नावर जगणाऱ्या कीटका शिवाय घन अन्न घेणाऱ्या कीटकांच्या अन्नपुटानंतर पेषणी नावाचा अवयव असतो. पेषणी मध्ये अन्न बारीक होते. त्यानंतर अन्न मध्यांत्रामध्ये प्रवेश करते. मध्यांत्र : पेषणीमध्ये बारीक झालेले अन्न मध्यांत्रामध्ये येते. अग्रांत्र आणि मध्यांत्राच्या संधिस्थानवर सहा जठरनाल उघडतात. मध्यांत्राच्या अग्र टोकापासून निघालेल्या जठर अंधनालास जठर अंधनाल असे म्हणतात. बाहेरच्या टोकास बंद असल्याने त्याना अंधनाल असे म्ह्णतात. जठर अंधनालामधून स्त्रवलेल्या विकरामुळे अन्नाचे पचन होते. झुरळामध्ये अंधनालाची संख्या सहा असते. मध्यांत्र आणि जठर अंधनालाच्या आतील बाजूस कायटिनचे आवरण नसल्याने पचलेले अन्न मध्यांत्रामध्ये शोषून घेतले जाते. पश्चांत्र : अन्न नालाच्या शेवटच्या भागास पश्चांत्र म्हणतात. मध्यांत्र आणि पश्चांत्राच्या संधिस्थानावर मालपिघी नलिका उघडतात. पश्चांत्र प्रारंभी बारीक पण पश्च टोकाकडे फुगीर झालेले असते. या फुगीर भागास मलाशय म्हणतात. शरीरातील नायट्रोजन युक्त क्षेपद्रव्य मालपिघी नलिकेमधून पश्चांत्रामध्ये सोडले जाते.ना पचलेले अन्न आणि नायट्रोजन क्षेपद्रव्य पश्चांत्रामधून मलाच्या स्वरूपात गुद द्वारामधून बाहेर पडते. बहुतेक कीटकामध्ये क्षेपद्रव्य यूरिक आम्लाच्या स्वरूपात असते. श्वसन संस्था श्वसन संस्था : कीटकांचे श्वसन फक्त विशिष्ट वायुनलिकांच्या साहाय्याने होते. श्वसनासाठी आवश्यक वायूंची विसरणाने शरीरामध्ये आणि शरीरामधून देवाण घेवाण होते. शरारांतर्गत वायुनलिकामुळे हवा शरीराच्या प्रत्येक उतीपर्यंत पोहोचते. रुधिराभिसरण संस्था श्वसन वायूचे वहन करीत नाही. ऑक्सिजन प्रत्यक उतीपर्यंत पोहोचतो. श्वसनासाठी आवश्यक पृष्ठ्भाग फक्त उती आणि वायुनलिकांच्या शेवटी उपलब्ध असतो. श्वासरंध्रे आणि मोठ्या वायुनलिका हवा शरीरामध्ये खेळवतात. श्वासनलिकांचा अंतर्भागास असलेल्या कायटिनच्या आवरणामुळे श्वसन वायूंचे विसरण होत नाही. श्वासनलिकाना श्वासनाल म्ह्णतात. श्वासनालापासून निघालेल्या बारीक शाखाना श्वासनलिका म्हणतात. बाह्य शरीरावर दोन्ही कडाना श्वासनालात हवा घेण्यासाठी रंध्रे असतात. त्याना श्वास रंध्रे म्ह्णतात. वक्षावरील श्वासरंध्रांच्या तोंडाभोवती असलेल्या स्नायूमुळे आणि झडपामुळे श्वास रंध्र उघडता वा मिटता येते. कीटकामध्ये श्वासरंध्राच्या दहा जोड्या असून दोन वक्षावर आणि आठ उदरावर असतात. सर्वससाधारणपणे कीटकाना श्वासरंध्राच्या दहा जोड्या असतात. काहीं कीटकात त्यांची संख्या कमी असते. श्वसंसाठीचा उपलब्ध पृष्ठभाग आणि चयापचयाचा वेग यांचा सरळ संबंध आहे. फुफ्फुसांचा एकूण पृष्ठभाग जेवढा अधिक तेवढे ऑक्सिजन वहन अधिक होते आणि चयापचयाचा वेग वाढतो. त्यामानाने श्वासनलिकांच्या फक्त अंत्र्भागामध्ये श्वसन वायूंची देवाण घेवाण झाल्याने उपलब्ध ऑक्सिजन कमी असतो. या मुळे सर्व कीटक लहान आकाराचे असतात. प्रत्यक्ष कोणत्याही माध्यमाशिवाय ऑक्सिजन उतीपर्यंत पोहोचल्याने कीटकांची शरीराच्या मानाने कार्यक्षमता अधिक असते. ब-याच जलचर कीटकांच्या डिंभामध्ये श्वासरंध्राऐवजी श्वासनाल क्लोम (कल्ले) असतात. जलचर कीटकात श्वसन क्लोमांच्या साहाय्याने बाह्यत्वचेतून होते. ज्या पद्धतीने ऑक्सिजन विसरणाने उतीपर्यंत येतो त्याच पद्धतीने कार्बन डाय ऑक्साइड बाहेर टाकला जातो.


अभिसरण संस्था: कीटकांच्या शरीरात पृष्ठवाहिका ही मुख्य रुधिर वाहिका असते. ती साधारणपणे शरीराच्या लांबीइतकी असते. मुख्य रुधिरवाहिकेचे पश्चटोक बंद असते. हिचे दोन भाग असून पुढील भाग आखूड आणि मागील भाग लांब असतो. महारोहिणी हा पुढचा आखूड भाग. मागचा लांब भाग आणि किंचित फुगीर भाग अनेक कोष्ठांचा बनलेला असून स्पंदनशील असतो. या भागास हृदय म्हणतात. प्रत्येक कोष्ठाच्या दोन्ही बाजूस एक याप्रमाणे द्वारांची एक जोडी असते. देहगुहा ही खरी देहगुहा नसून त्यास रुधिरगुहा असे म्हणतात. सर्व संधिपाद प्राण्यामध्ये रक्त रुधिरगुहेमध्ये येते. रुधिर गुहेतील रक्त कोष्ठ द्वारा हृदयात शिरते. हृदयाच्या स्पंदनामुळे क्रमश: मागील कोष्ठातून ते पुढील कोष्ठात जाते. पहिला कोष्ठ महारोहिणीमध्ये उघडतो. महारोहिणीमधून रक्त प्रथम अनियमित आकाराच्या शीर्ष कोटरामध्ये जाते वा ते परत रुधिर गुहेमध्ये येते. रुधिर परिवहनाचे कार्य सतत चाललेले असते. कीटकांचे रक्त रुधिरगुहेतून व वाहिन्यामधून वाहते. अशा प्रकारच्या अभिसरण संस्थेस अनावृत्त अभिसरण संस्था असे म्हणतात. अभिसरण संस्थेचे कार्य पचलेले अन्न शरीराच्या सर्व पेशीपर्यंत पोहोचविणे. पेशी वा उतकामधील उत्सर्जित पदार्थ उत्सर्जन संस्थेपर्यंत वाहून नेतात. शरीरांतर्गत संप्रेरके योग्य त्या ठिकाणापर्यंत नेण्याचे कार्य अभिसरण संस्थेचे आहे.

जनन संस्था: ठळक अपवाद सोडले तर कीटकामध्ये लिंग भिन्नता आहे. आकारमान, रंग इत्यादी लक्षणावरून नर, मादी ओळखता येतात. गौण लक्षणावरून लिंग भेद कळतो. नर आणि मादीची जननेंद्रिये उदर पोकळीमध्ये हृदयाच्या खाली व अन्न नालाच्या बाहेरील उदरपोकळीमध्ये असतात. जननेंद्रियाने बरीच उदरगुहा व्यापलेली असते. नरामध्ये जनन ग्रंथींची एक जोडी असून वृषणात अनेक शुक्रनलिका असतात. त्यात शुक्राणू तयार होतात. शुक्राणू वृषणातून शुक्रवाहकात येतात वा रेतोसेचनीच्या मार्गाने मैथुनाचे वेळी शिस्नातून बाहेर पडतात. काहीं कीटकामध्ये शुक्रवाहिनी पश्च भागाकडे रुंद होऊन बनलेल्या शुक्राशयात जमा होतात. बहुतेक कीटकामध्ये जनन संस्थेशी संलग्न असणाऱ्या साहाय्यक ग्रंथी असतात. मादीमध्ये अंडाशयाची एक जोडी असून प्रत्येकात नलिकेसारखे कित्येक अंडाशय असतात. निरनिराळ्या जातीच्या कीटकात अंडाशयकांची संख्या वेगवेगळी असते. दोन्ही पार्श्व अंडवाहिन्या एकमेकीना मिळून एक समाइक अंडवाहिनी तयार होते. अंडवाहिनी योनिमार्गात उघडते. पक्वअंडी अंडाशयातून पार्श्व अंडवाहिनीमधून समाइक अंडवाहिनीमध्ये आणि तिच्यातून योनिमार्गामध्ये जातात. योनिमार्ग अंडनिक्षेपकातउघडत असल्याने कीटक अंडनिक्षेपकातून अंडी घालतात. समाइक अंडवाहिनीशी असलेल्या एका शुक्रवाहक पिशवीमध्ये साठविलेल्या शुक्राणूमधील शुक्रजंतूमुळे अंड्यांचे फलन होते. अंडवाहिनीच्या दोन्ही बाजूस असलेल्या श्लेष्म ग्रंथीमधील स्त्रवलेल्या चिकट द्रावाचा उपयोग अंडी झाकण्यासाठी वा चिकटवण्यासाठी होतो.

संदर्भ व नोंदी

[संपादन]