Jump to content

नंदू होनप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नंदू होनप (इ.स. १९५३ - १७ सप्टेंबर, इ.स. २०१६:मुंबई, महाराष्ट्र) हे एक मराठी संगीतकार आणि व्हायोलिनवादक होते.

पु. ल. देशपांडे अकादमीत मिनी थिएटरमध्ये चाललेल्या 'सूरसाधना' या कार्यक्रमात शैलेश भागवत यांचे सनईवादन आणि नंदू होनप यांचे व्हायोलिनवादन अशी जुगलबंदी सुरू होती. कार्यक्रम ऐन टिपेला गेल्यानंतर होनप यांनी त्यांचे अत्यंत लोकप्रिय असे, 'निघालो घेऊनि दत्ताची पालखी' हे गीत वाजविले. त्यानंतर पुढे 'दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा' व्हायोलिनवर वाजविण्यास सुरुवात केल्यानंतर, त्यांचे भान हरपले आणि अशी सूरसमाधी लागली असतानाच, ते अचानक कोसळले. तो हृदयविकाराचा तीव्र धक्का होता. त्यातच होनप यांनी अखेरचा श्वास घेतला.

होनप हे कॅसेटच्या जमान्यात भक्तिसंगीताला उभारी देणारे कलावंत होते. 'निघालो घेऊनि दत्ताची पालखी', 'अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली', 'स्वामी कृपा कधी करणार' अशी शेकडो गाणी आणि ९६ चित्रपटांना संगीत अशी त्यांची कारकीर्द आहे. गीतकार आणि कवी प्रवीण दवणे यांची अनेक गाणी त्यांनी संगीतबद्ध केली होती.

अजित कडकडे, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, गुलशन कुमार अशा गायकांना घेऊन त्यांनी एकापेक्षा एक अभंग, भजनांचा सांगितिक नजराणाच संगीतरसिकांना दिला. संगीतकार म्हणून होनप यांनी सर्वाधिक भक्तीगीतांना स्वरसाज चढवला असला, तरी त्यांनी संगीताचे अनेक प्रकार हाताळले. लावणी, भारुडं, स्तोत्र, मंत्र, भावगीते, प्रेमगीते आदींनाही त्यांनी संगीत दिले.विशेष म्हणजे, गुरू जितेंद्र अभिषेकींकडूनही त्यांनी दोन कॅसेटसाठी गाणी गाऊन घेतली. आशा भोसले, उषा मंगेशकरही त्यांच्यासोबत गायिल्या. नंदू होनप यांनी बऱ्याच नवोदित कलाकारांना गाण्याची संधी दिली.

गायक अजित कडकडे आणि संगीतकार नंदू होनप यांच्या भक्तिसंगीताने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. तब्बल ३५ वर्षे या जोडीने एकत्र काम केले. त्यांच्या साथीला गीतकार प्रवीण दवणे होते. राजा परांजपे, ग.दि. माडगूळकर व सुधीर फडके या त्रिमूर्तीने तीन दशके जसा मराठी चित्रपट, संगीताचा प्रांत गाजवला, तशीच कामगिरी होनप-कडकडे-दवणे या तिघांनी एकोणीसशे एेंशीच्या दशकापासून केली.


दत्ताची पालखी

[संपादन]

‘दत्ताची पालखी’ हे गाणे प्रवीण दवणे यांनी साध्या-सोप्या शब्दांत बांधले आहे. अजित कडकडे यांनी ते गायले. ‘दत्ताची पालखी’ या कॅसेटमध्ये कडकडे व अनुराधा पौडवाल यांनी प्रत्येकी चार गाणी गायिली. ही कॅसेट लाखांच्या संख्येने खपली. होनप यांचे वैशिष्ट्य म्हणजे होनप हे ते गाण्यांची आउटलाइन तयार करून पुढे गायकांना मोकळे सोडायचे. ताना, आलाप घेण्याची गायकांना पूर्ण मुभा असे.


नंदू होनप यांच्या व्हायोलीनची साथ असलेली हिंदी चित्रपट गीते

[संपादन]
  • दगाबाज रे…
  • सावन आया है…
  • सुन रहा है ...
  • सुनोना संगे मरमर…