वि.वि. करमरकर
विष्णू विश्वनाथ करमरकर (जन्म: नाशिक; ११ ऑगस्ट १९३८) हे मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक समजले जातात. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण नाशिकमध्येच झाले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. झाले.
करमरकरांचे वडील डॉ. वि.अ. करमरकर हे निष्णात डॉक्टर होते आई सुशीलाताई यांनी करमरकरांना संस्कारित केले. रत्ना थोरात व माणिक मराठे या त्यांच्या भगिनी.
विष्णू विश्वनाथ करमरकर यांनी पत्रकारितेची सुरुवात पत्रकारितेची सुरुवात नाशिकचे रसरंग साप्ताहिक आणि मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते एस.एम. जोशी चालवत असलेल्या दैनिक लोकमित्रमधून केली. जून १९६२मध्ये करमरकर महाराष्ट्र टाइम्सच्या क्रीडा विभागाचे प्रमुख झाले. सहसंपादक (क्रीडा) या नात्याने ते महाराष्ट्र टाइम्समधील क्रीडा पानावे संपादन करू लागले. त्यांची ही पत्रकारिता खेळाच्या बातम्या, क्रीडासमीक्षणे व स्तंभलेखन यांविषयी मराठी माणसाची जिज्ञासा पुरी करू लागली. आणि याचा परिणाम म्हणून सर्वच मराठी वृत्तपत्रांत हळूहळू क्रीडा पत्रकारांना मानाचे स्थान व हक्काचे पान उपलब्ध झाले.
वर्तमानपत्रातून दैनंदिन क्रीडा समीक्षा लेखन करणारे वि.वि.करमरकर यांचे स्तंभलेखन वाचकांना आवडू लागले. पुढे पुढे, खेळाचे हौशी स्वरूप बदलत गेले आणि तो एक पैसे मिळविण्याचा उद्योग झाला. अनेक उद्योगसमूह क्रीडाक्षेत्रात रस घेऊ लागले. अशांनी बांधलेली स्टेडियम्स, त्यांवरील अफाट खर्च, आणि त्यासाठी होणारा भ्रष्टाचार यावर इ.स. १९९३पासून करमरकरांचे लिखाण प्रकाश टाकू लागले. सुरेश कलमाडी यांच्या खोट्या क्रीडाप्रेमावर ते सतत टीका करत. इ.स. १९८२साली दिल्लीत आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी स्टेडियमे बांधताना सुमारे शंभर मजूर मरण पावले, त्यांची नावेही समजली नाहीत. ’रक्तरंजित’ या मथळ्याखाली त्यांनी या मजुरांची हकीकत वाचकांना माहीत करून दिली.
भारतीय खेळाडू हे जगातील जमेका, क्यूबासारख्या अगदी छोट्या छोट्या देशांतील खेळाडूंपेक्षा किती अधिक मागासलेले आहेत हे करमरकरांनी वाचकांच्या नजरेस आणले. जगातील अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक, क्रीडा वैद्यक तज्ज्ञ यांच्या जिवंत अनुभवांचे करमरकरांनी शब्दांकन करून प्रसिद्ध केले.
क्रीडाप्रसार
[संपादन]देशी व ऑलिंपिक खेळाच्या प्रचार-प्रसार आणि विकासासाठी त्यांनी पदरमोड करून कोकणात खेड्यापाड्यांत भटकंती केली. खेळांच्या स्पर्धाचे आयोजन एवढाच उद्देश न ठेवता खेळाडूंची बौद्धिक, मानसिक व शारीरिक जडणघडण व्हावी, त्यागी-निष्ठावान खेळाडू घडावेत, याचा अखंड ध्यास घेऊन महाराष्ट्र क्रीडा विकास संस्थेची त्यांनी निर्मिती केली. त्या संस्थेमार्फत ते सतत दहा वर्षे रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांत देशी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करीत राहिले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी हा वसा अविरत चालू ठेवला.
खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ यांच्या सहभागाशिवाय खेळाचे पान कसदार होणार नाही. याची जाणीव करमरकरांना पहिल्यापासून होती. कितीतरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, संघटक, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ यांच्या जिवंत अनुभवाचे त्यांनी शब्दांकन स्वतः केले. याचप्रमाणे सहकाऱ्यांमार्फत करून घेतले. बड्या क्रीडा स्पर्धांदरम्यान, विशेष पुरवण्यांनी क्रीडा पान सतत सजवले. आकाशवाणी, दूरदर्शन, विविध टी. व्ही. चॅनल्सवरील करमरकर यांनी केलेली सामन्यांची धावती समालोचने व समीक्षणे खूप गाजली. क्रिकेटप्रमाणे कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस आदी खेळांच्या मराठीतील धावत्या समालोचनाने मराठी समीक्षेतील उणीव समर्थपणे दूर केली. निवृत्तीनंतर लोकसत्तासह इतर अनेक वृत्तपत्रांत त्यांनी लेखमाला लिहिल्या.
खेळासाठी झोकून काम करणाऱ्या पत्रकार करमरकरांनी क्रीडा कार्यकर्त्यांची भूमिकाही बजावली. जे मनात घेतले तसे व्हायलाच हवे, हा हट्ट त्यांनी कायम धरला. वागण्यात कोणतीही लवचीकता न ठेवता ते सतत सत्याचा ध्यास धरत राहिले.
या त्यांच्या कामगिरीबद्दल विष्णू विश्वनाथ करमरकर यांना मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक मानले जाते.