राजू तुलालवार
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
राजू तुलालवार हे सन १९७९ सालापासून मराठी बालरंगभूमीवर काम करीत आहेत. व्यावसायिक मराठी बालरंगभूमीवर सर्वाधिक काल कार्यरत असणारे ते रंगकर्मी आहेत.
१९७९ साली राजू तुलालवार यांनी शालेय रंगभूमीसाठी 'अशी कार्टी नक्को रे बाप्पा 'ही बालनाटिका लिहिली. पुढील पाच वर्षे ते शालेय रंगभूमीवर बालनाटिका लिहून बसवत होते. त्यांच्या नाटकांना आंतरशालेय स्पर्धांत बरेच पुरस्कार मिळाले..१९८५ साली 'चिंगू चिंगम बबली बबलगम 'हे बालनाट्य दिग्दर्शित करून तुलालवारांनी व्यावसायिक बालरंगभूमीवर पदार्पण केले. त्यात अपेक्षित यश मिळताच १९८८ साली स्वतःची "चिल्ड्रेन्स थिएटर" ही बालनाट्य संस्था काढून बालनाट्य निर्मितीस सुरुवात केली. पुढील २७ वर्षात या संस्थेद्वारे राजू तुलालवार यांनी ८०हून अधिक बालनाट्ये लिहून,बसवून,त्यांचे व्यावसायिक बालरंगभूमीवर २००० च्या वर प्रयोग केले. या प्रयोगांत ५०००पेक्षा जास्त बालकलाकारांनी काम केले. महाराष्ट्रातील लाखो बालप्रेक्षकांनी विविध नाट्यगृहातून या बालनाट्यांचा आनंद घेतला.
राजू तुलालवारांनी एकाच तिकिटात ३ बालनाटिका सादर करण्याचा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला. बालनाट्य दोन अंकांवरून एकांकिकेवर आणण्यास राजू तुलालवारांचे प्रयत्न कारणीभूत ठरले. सुट्टीत मनोरंजक बालनाटिका सादर करून त्यांनी दोन पिढ्यांचे मनोरंजन केले.
मुलांना आवडतील असेच विषय, विनोदी पद्धतीने सादर करतांना, दर्जेदार नेपथ्य,वेशभूषा,रंगभूषा,प्रकाश योजना व संगीत यांच्या वापरामुळे तुलालवारांचे बालनाट्य नेहमीच प्रेक्षणीय आणि मनोरंजक ठरले आहे. त्यांच्या बालनाट्याना होणारी गर्दी त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देते.
आई बाबा हरले, करामती रोबो, जादूची खेळणी, जोकर आणि जादुगार, फटाक्यांना घाबरणारे डॉक्टर, फुग्यातला राक्षस, भित्रे भूत, मिकीमाउस हरवला, -ही राजू तुलालवारांच्या बालनाट्याची नावे मुलांना आकर्षित करतील अशीच आहेत.
तुलालवारांच्या बालनाट्यांमध्ये अनेकदा फक्त प्राणी असतात. गाढवाचा दवाखाना, चॉकलेटखाऊ सिंहोबा, टीव्ही वेडा वाघोबा, नापासघोडे उंदीरमामा, वाघोबाची दिवाळी, ससोबा काढतोय सिनेमा, हत्तीचे लग्न, ही त्यांची काही लोकप्रिय बालनाट्ये आहेत.
राजू तुलालवार हे बालनाट्य अभ्यासक व नाट्यकला प्रशिक्षक आहेत. त्यांनी विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन केले आहे. अनेक स्पर्धात ते परीक्षक असतात. तसेच बालरंगभूमीवर माहिती देणारे त्यांचे अनेक लेख नामवंत मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
मराठी बालरंगभूमीबरोबरच तुलालवारांनी हिंदी व इंग्रजी बालनाट्ये करण्यास सुरुवात केली आहे. १३ नोव्हेंबर २०१५ रोजी दुबईमध्ये व्यावसायिक इंग्रजी बालनाट्य सादर करून त्यांनी त्यांच्या बालनाट्याला परदेशाचे द्वार उघडे करून दिले .
राजू तुलालवार यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
[संपादन]- राजू तुलालकर हे बालरंगभूमी विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत.
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने १९९७ साली त्यांना विशेष पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
- बालनाट्य गुरू, ठाणे नवरत्न पुरस्कार असे मानसन्मानही त्यांच्या वाट्याला आले आहेत.